Thursday, April 25, 2024
Homeनगरकुकडी आवर्तन : नेत्यांनी राजकीय पोळी भाजू नये

कुकडी आवर्तन : नेत्यांनी राजकीय पोळी भाजू नये

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) –

तालुक्यातील राजकीय मंडळी कुकडी कालव्याचे आवर्तनाबाबत प्रत्येक वेळी आपण प्रयत्न केल्यामुळे पाणी आल्याच्या घोषणा

- Advertisement -

करतात यात अनेकवेळा शेतकर्‍यांच्या हितापेक्षा राजकारणच जास्त वेळा दिसत असल्याने पाण्याच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम तालुक्यातील सर्वच पक्षातील नेते करत आहेत. तालुक्याच्या भल्यासाठी तरी सर्वांनी एकत्र या, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या नेत्या जिल्हा परिषद सदस्या अनुराधाताई नागवडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

तालुक्यातील राजकीय पुढारी स्वतःच्या राजकारणासाठी दरवर्षी उन्हाळ्यात कुकडीचे पाणी माझ्या मुळेच आले, असे सांगत श्रेय घेणार्‍या राजकीय पुढार्‍यांनी कुकडीच्या पाण्याचे राजकारण न करता शेतकर्‍यांच्या तसेच तालुक्याच्या विकासासाठी अन् पाण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती अनुराधा नागवडे यांनी रविवारी नागवडे साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष स्मितल वाबळे, वांगदरी गावचे सरपंच आदेश नागवडे, विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.

तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या विश्राम गृहावर अनुराधा नागवडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी नागवडे म्हणाल्या, तालुक्यातील शेतकरी, महिला, तरुण यांनी फोनवरून संपर्क करून कुकाडीच्या पाण्यासंदर्भात मनातील भावना मोकळ्या केल्या. तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिल्याने पुरता खचून गेला आहे. तालुक्यातील पुढार्‍यांनी कुकडीच्या पाण्यासाठी चालविलेले राजकारण थांबवावे. मी पत्र दिले, मी फोन केला, मी भेटलो म्हणून पाणी आले, असे सांगत लोकांच्या भावनेशी खेळून आपली राजकीय पोळी भाजू नये. पाणी सुटणार असे समजताच शेतकरी बी-बियाणे, खते आणून ठेवतात मात्र त्या दिवशी पाणी नाही सुटले तर शेतकरी आर्थिक नुकसानीत जातो. पुढे बोलताना अनुराधा नागवडे यांनी सांगितले की कुकडीचे पाणी द्यायचे असेल तर याच महिन्यात द्या. पुढच्या महिन्यात नको, तालुक्यातील पुढार्‍यांचे राजकारणात वजन असताना आपण तालुक्यासाठी पाणी मिळवू शकत नाहीत, याची खंत वाटते. त्यामुळे कुकडीच्या पाण्याचे राजकारण न करता शेतकर्‍यांच्या तसेच तालुक्याच्या विकासासाठी, पाण्यासाठी एकत्र यावे, तालुक्यातील शेतकर्‍यांना पाण्याचे नियोजन असे करावे की सर्वसामान्य शेतकर्‍यांना झळ पोहोचणार नाही, असे करावे. त्यासाठी सर्वांनी उपाययोजना सुचवाव्या पाण्यासाठी कोणी बरोबर नाही आले तरी मी हे सर्व शेतकर्‍यांसाठी करणार आहे. यात कोणी राजकारण करणार असेल तर त्यांच्याकडे जनता पाहून घेईल, असे ही अनुराधा नागवडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या