Thursday, April 25, 2024
Homeनगरकोते परिवाराने दुःखाच्या काळात आम्हाला साथ दिली- रघुवीर खेडकर

कोते परिवाराने दुःखाच्या काळात आम्हाला साथ दिली- रघुवीर खेडकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

मागील वर्षी आमच्या कुटुंबावर कोसळलेल्या मोठ्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यासाठी शिर्डीतील माजी नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांच्या परिवाराने आम्हा कलावंतावर दाखवलेले प्रेम, माया पाहून माझे अंत:करण भरून आले असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध तमाशा सम्राट मास्टर रघुवीर खेडकर यांनी दिली.

- Advertisement -

मागील वर्षी करोनाची लाट उसळली होती. या लाटेत तमाशा सम्राट कै. तुकाराम खेडेकर यांच्या पत्नी तसेच रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री कांताबाई सातारकर, बहिण बेबीताई खेडकर, भाऊ अभिजित या तिघांचा मृत्यू झाला. एकापाठोपाठ एक आई, बहिण, भाऊ यांच्या आपत्कालीन निधनाने रघुवीर खेडकर पूर्णतः खचून गेले होते. एकप्रकारे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता.

श्री साईबाबांप्रती श्रध्दा व निःस्सीम भक्ती असल्याने त्यांनी बाबांना या दुःखातून सावरण्यासाठी प्रार्थना केली. एकिकडे कुटुंबातील जबाबदार माणसं दगावली तर दुसरीकडे दोन वर्षे करोना काळात अक्षरशः उपासमार ओढावली होती. या भयानक अशा परिस्थितीतून मार्ग काढत असताना योगायोगाने यंदाच्या वर्षी ऐतिहासिक श्री रामनवमी उत्सवात परंपरेनुसार तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांना आमंत्रित करण्यात आले. खेडकर कुटुंबाचे पंच्याहत्तर वर्षापासून शिर्डीशी अतूट नाते जुळले असल्याने श्री रामनवमी यात्रा कमिटीचे सदस्य नितीन उत्तमराव कोते यांनी रघुवीर खेडकर यांच्या परिवारास गोड तोंड करण्यासाठी निमंत्रित केले असता त्यांनी क्षणाचा विलंब न करता होकार दिला.

अर्चनाताई कोते यांच्या निवासस्थानी रघुवीर खेडकर यांच्या परिवारास पुरणपोळीचे जेवण देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी अर्चनाताई कोते, नितीन कोते, सायली कोते, केतन कोते यांच्या हस्ते खेडकर परिवारातील सदस्यांना सन्मानित करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या