Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोन दृष्टीकोन : मिनिस्टर साहब के तोल मोल के बोल

कोन दृष्टीकोन : मिनिस्टर साहब के तोल मोल के बोल

संदीप रोडे-

होय साहेब, खरंय… जिल्ह्यातील राजकीय संस्थानिकांनी फक्त त्यांच्याच संस्थानांचा विकास केलाय.

- Advertisement -

मात्र, नगर शहर भकासच आहे. अगदी बरोबर बोललात… याची कारणमिमांसा करताना चार बोट संस्थानिकांकडे गेली तरी एक बोट आपल्याकडे वळतेच हे विसरून कसे चालेल. संस्थानिकच नव्हे तर पालकमंत्र्यांनीही शहराला देताना हात आखडता घेतलाय हे शहरवासीयांचं दुर्देवच म्हणावं लागेल.

आता तुम्हीच पालकमंत्री नात्याने शहर भकासावर भाष्य केलंय. तुमच्याच पक्षाचा नगर शहरात आमदार आहे. त्यांनाही शहर विकासाचं पडलंय. तुम्ही मात्र आता भरभरून द्याल याच आशेवर नगर विकास घोडदौड करेल. शहराच्या आमदारकीचा आजपर्यंतचा इतिहास पाहता सरकार विरोधी पक्षाचं असायचं. विद्यमान आमदार संग्राम जगतापांनी पहिल्या टर्मला तो अनुभव घेतलाय.

आता सोयीचं सरकार अन् स्वपक्ष सत्तेत असल्याने नुसतंच बोलून भागणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल. तरच शहरात हरवलेला विकास गवसेल. नगरपालिकेतून महापालिकेत रुपांतर होताना सरकारकडे केलेली कोट्यवधी रुपयांची मागणी अजूनही लालफितीत अडकून आहे. रिटायरमेंटच्या वाटेवरील अधिकार्‍यांना महापालिका आयुक्त म्हणून बसविणं कुठंतरी थांबलं पाहिजे, तेव्हाच विकासाची पहाट दिसेल.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर शहराच्या भकासतेवर थेटपणे वक्तव्य करत नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील संस्थानिक नेत्यांनी त्यांच्या भागाचाच विकास केला. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहराच्या विकासाकडे लक्ष दिले नाही असे सांगत जाहीरपणे विखे, थोरात, घुले, राजळे, पाचपुते, काळे यांचा संस्थानिक म्हणून नामोल्लेख केला.

मंत्री मुश्रीफ यांनी जाहीरपणे असे वक्तव्य करण्याची पालकमंत्री नात्याने ही पहिलीच वेळ. मुश्रीफ साहाब अनेक बैठका, कार्यक्रमानिमित्त नगर शहरात आले, जिल्ह्यातही फिरले. त्यावेळी त्यांना जिल्ह्याचा विकास दिसला तसा नगर शहराचा भकासपणाही डोळ्यात भरला. त्यावर मंत्री साहब थेट बोलले अन् सही बोलले.. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. पण त्यावर उपाययोजना काय? असा प्रश्नाही उपस्थित केला गेला.

चौदा तालुके आणि बारा विधानसभा मतदारसंघ, दोन विधान परिषदेचे आमदार, दोन खासदार असा जिल्ह्याचा राजकीय पसारा. यातील विखे, थोरात, राजळे, काळे, गडाख, तनपुरे आणि पाचपुते यांचा त्यांच्या मतदारसंघात कायमच वरचष्मा राहिला. सहाजिकच त्यांनी त्यांच्या मतदारसंघात विकासात्मक कामे उभी केली. नगर शहरात स्व. अनिल राठोड यांनी सर्वाधिक पंचवीस वर्षे सत्ता गाजविली. त्यांची एक टर्म वगळता राज्यात विरोधी पक्षाचे सरकार राहिले. एक टर्म तेही 13 महिन्यांसाठी अनिलभैय्यांना लालदिवा मिळाला.

त्यापूर्वी एम.आय आसीर यांना एकदा तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुलेच्या मंत्रीमंडळात मंत्री पदाची संधी मिळाली होती. कुमार सप्तर्षी हे जनता पक्षाचे तर नवनीतभाई बार्शीकर हे दोनदा अपक्ष आणि दादाभाऊ कळमकर यांनी एकदा विधानसभेत नगर शहराचे प्रतिनिधीत्व केले. आता राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे विधानसभेत दुसर्‍यांदा नगरचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

हा इतिहास इतक्यासाठीच की नगर शहराला मंत्रिमंडळात कधी संधी मिळालीच नाही, मिळाली तर तीही औटघटकेची. मग विकासाचे दोन-चार थेंब झिरपतील तरी कसे? विखे-थोरात, पाचपुते यांनी अनेक टर्म लालदिव्यातून प्रवास केला. त्यामुळे शासन निधीचे जास्तीचे दोन थेंब या संस्थानिकांच्या मतदारसंघात झिरपले अन् तेथे विकासाचे पीक जोमात बहरले. नगरचं मात्र तसं काही झालं नाही. जिल्ह्याचे मुख्यालय असले तरी या संस्थानिकांना शहराचा उमाळा कधीच आला नाही, असे लोक जाहीरपणे बोलतात.

गट-तट आणि उणीदुणी काढताना शहराला निधी मिळणार नाही याचा बंदोबस्त मात्र थेटपणे झाला. मुश्रीफ साहब, तुम्ही नगरकरांच्या मर्मावर अगदी थेटपणे बोट ठेवलंय, इतकंच काय तर कोणाची तमा न बाळगता थेटपणे भाष्यही केले. मात्र नुसतंच भाष्य करून चालणार नाही. तुम्ही पालकमंत्री आहात, जिल्हा नियोजनचा निधी व इतर शासकीय योजनांच्या निधीतून नगर शहराला भरभरून देण्याची ताकद तुमच्यात नक्कीच आहे. शहराचे आमदार जगताप तुमच्याकडे मागणं मागतात. त्यांचा हट्ट पुरा करण्याची दानत मात्र तुम्हाला दाखवावी लागेल.

जिल्हा नियोजनच्या बैठकीत तुम्ही 20 कोटी रुपयांचा निधी नगर शहरासाठी देण्याची जाहीर केले. पण ते वीस कोटी म्हणजे दात कोरून दिल्यासारखं आहे. त्यातील दहा कोटी तर नाट्यगृहासाठीच आहेत. मग राहिलेल्या 10 कोटीत काय कात जळणार! नगर शहराचा 84 चौरस किलोमीटरवरील पसारा आणि त्यातील सुविधा पाहिल्या तर हजार-दोन हजार कोटी रुपयांचा बॅकलॉग आहे.

तुम्ही फक्त कलेक्टर ऑफिसला जाण्या-येण्याचे रस्ते पाहिलेत. उपनगरात तुम्ही फिरलाच नाहीत. तुम्ही फिरा असे आम्ही म्हणत नाही, पण किमान महापौर, आमदारांकडून माहिती तरी जाणून घ्या, म्हणजे तुम्हाला नगरची खरी गरज समजेल. मुश्रीफ साहब, आप बोले तोल मोल के सही बोल… मगर हाथ जरा सैल छोडे… म्हणजे नगर शहराचं भलं तरी होईल, हीच नगरकरांची भोळीभाबडी अपेक्षा!

पवार, मुश्रीफ.. फक्त शब्दांचा झोल

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनीही नगरच्या या संस्थानिकांचा जाहीरपणे किल्लेदार असा उल्लेख केल्याचे नगरकरांच्या आजही स्मरणात आहे. किल्लेदारांनी त्यांच्या सुभेदार्‍या जपल्या, त्यापलिकडे काही केले नाही असे त्यावेळी शरद पवार म्हणाल्याचे नगरकरांना आजही आठवते. पवारांचे

शिष्य म्हणून मंत्री मुश्रीफ यांनी जाहीरपणे त्यावर बोलणे म्हणजे वेगळे असे काही नाही. फक्त गुरूने किल्लेदार शब्द प्रयोग केला तर शिष्याने संस्थानिक असा इतकाच काय तो फरक. पवार कोणाला समजले नाही, समजणारही नाही असे कायमच म्हटले जाते. ते पवार मंत्री मुश्रीफ यांना कळाले तर नगर शहराच्या वाट्याचे बकालपण जाऊन विकास दिसेल हीच भोळीभाबडी आशा नगरकरांना आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या