Friday, April 26, 2024
Homeनगरकोल्हार-कोपरगाव महामार्ग गिळतोय शेतजमिनी

कोल्हार-कोपरगाव महामार्ग गिळतोय शेतजमिनी

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

ब्रिटीशकालिन काँक्रिटचा सिंगल वे असलेला कोल्हार-कोपरगाव रस्त्याचे स्वातत्र्यानंतर एकदाही भूसंपादन झालेले नाही. भूसंपादन न होताच हा रस्ता शेतकर्‍यांच्या शेतजमिनी गिळत आहे. शासनाने नियमाप्रमाणे संपादन करून शेतकर्‍यांना जमिनीची भरपाई द्यावी अन्यथा शेतकर्‍यांना आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा पिंपरी निर्मळ सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष नारायण घोरपडे यांनी दिला आहे.

- Advertisement -

नगर-कोपरगाव रस्त्याचे सध्या राष्ट्रीय महामार्ग योजनेतून चौ-पदरीकरणाचे काम सुरू आहे.हा रस्ता ब्रिटीश काळात सुरुवातीला बारा फूट काँक्रिटचा होता. स्वांतत्र्यानंतर राज्य महामार्ग क्र. 10 नावाने ओळखला जाणारा हा रस्ता मध्यंतरी जागतिक बँक प्रकल्पाकडे वर्ग झाला. विभागाने या रस्त्याचे चौपदरीकरण अंतर्गत मध्यापासून एका बाजूला साडे सात मीटर डांबरीकरण केले. त्यानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करण्यात आला.

एनएच-160 हा क्रमांक मिळाल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याचे सध्या नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. स्वातंत्र्यकाळात जशी गरज वाढेल तशी या रस्त्याची रूंदी वाढविण्यात आली. मात्र एकदाही भूसंपादन करण्यात आले नाही. भूसंपादन न होताच हा रस्ता जवळपास शंभर फूट रुंदीचा करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांच्या शेतजमिनी रस्त्यासाठी परस्पर गिळंकृत करण्यात येत आहेत. रोडलगतच्या शेतजमिनी उतार्‍यावरील जमिनीपेक्षा कमी भरत असून शासनाने या रस्त्यासाठी जमिनीचे सर्वेक्षण करून आवश्यक जमिनीचे संपादन करावे व बाजार भावाप्रमाणे शेतकर्‍यांना मोबदला द्यावा, अन्यथा अन्यायग्रस्त शेतकर्‍यांसह अंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा पिंपरी निर्मळ सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष नारायण घोरपडे यांनी दिला आहे.

कोल्हार-कोपरगाव महामार्गासाठी एकदाही संपादन झाले नाही. पूर्वी ब्रिटीशांनीही संपादन केले नव्हते. स्वांतत्र्यांनंतरही विना भू-संपादन रस्ता वीस फुटांवरून शंभर फुटाचा झाला. रस्ता नेमका कोणाच्या जमिनीतून जातो, कोणत्या शेतकर्‍यांचे किती क्षेत्र जाते हे शेतकर्‍यांना माहीत नाही. रस्ता वारंवार वाढल्याने लगतच्या जमिनी कमी भरत आहेत. शासनाने भूसंपादन बाबतची आकडेवारी जाहीर करावी.

– नारायण घोरपडे, शेतकरी पिंपरी निर्मळ

- Advertisment -

ताज्या बातम्या