Friday, April 26, 2024
Homeनगर‘खेलो इंडिया’त नगर आऊट

‘खेलो इंडिया’त नगर आऊट

अहमदनगर (प्रतिनिधी) –

ऐतिहासिक आणि राज्यता सर्वात मोठा जिल्हा… मुंबई, पुणे आणि नाशिकनंतरचे भव्य क्रीडा संकुल… अनेकविध खेळ प्रकारात नगरच्या खेळाडूंची कामगिरी.. मात्र हे सगळे बेदखल.

- Advertisement -

केंद्राच्या निधीतून चार वर्षे चालणारे ‘खेलो इंडिया’चे सेंटर राज्यातील 23 जिल्ह्यांना मंजूर करण्यात आले असून त्यातून नगर जिल्हा मात्र आऊट झाला आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाचा पाठपुरावा कमी पडल्याने नगर या सेंटरला मुकल्याची भावना खेळाडूंमध्ये निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ऑलिम्पिक स्पर्धेत मराठमोळ्या खेळाडूंचा टक्का वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने प्रत्येक जिल्ह्यात ‘खेलो इंडिया’चे सेंटर देण्याचा निर्णय घेतला. त्या माध्यमातून खेळाडूंना पारंगत करून पदकाची लयलूट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रशिक्षण सेंटरचा सगळा खर्च केंद्र सरकारमार्फत केला जाणार आहे. स्पेशल कोचही नियुक्त केला जाणार आहे. चार वर्षे हे सेंटर केंद्र सरकारमार्फत चालविले जाणार आहे. हे सेंटर मिळावे यासाठी नगरमधूनही प्रस्ताव गेला होता. कबड्डी, अ‍ॅथेलेटिक्स, स्विमिंग, कुस्ती, व्हॉलीबॉल, ज्युदो प्रकारचे सेंटर मिळावे असा प्रस्ताव नगर जिल्हा क्रीडा कार्यालयाने केंद्र सरकारकडे पाठविला होता. मात्र नगरचा एकही प्रस्ताव केंद्र सरकारच्या मनी रुजला नाही.

राज्यातील 23 जिल्ह्यात 15 विविध प्रकारच्या खेळाचे ‘खेलो इंडिया’ सेंटरला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सातारा, लातूर, नाशिक, रायगड, चंद्रपूर, वाशिम, जालना, नांदेड, सांगली, बुलढाणा, पालघर, धुळे, जळगाव, वर्धा, सिंधुदूर्ग, यवतमाळ, उस्मानाबाद, औरंगाबाद, नंदूरबार, सोलापूर, भंडारा, गडचिरोली आणि परभणी जिल्ह्याला खेलो इंडियाचे सेंटर मंजूर झाले आहे.

डीएसओ कार्यालय अजून आशावादी

खेलो इंडियाच्या सेंटरमधून नगर आऊट होण्याचे कारण काय? याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नगरचे प्रस्ताव फेटाळण्याचे कारण गुलदस्त्यातच राहिले. तेथील अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरांगे यांच्याशी संपर्क साधला असता केंद्र सरकारने अजून कोणत्याच सेंटरला मान्यता दिलेली नाही, अशी माहिती पुणे उपसंचालक कार्यालयातून मिळाल्याचे ते म्हणाले. नगरला हे सेंटर मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्र्यांना पत्र

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून पारंपारीक खेळाला चालना देण्यासाठी व ऑलिम्पिंक स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी पदक प्राप्त करावे या उद्देषाने भारतामध्ये 1 हजार खेलो इंडिया सेंटर सुरू करण्यात येत आहे. खेलो इंडियाचे प्रषिक्षण सेंटर अहमदनगर जिल्हयाला मिळावे अशी मागणी विजय म्हस्के यांनीं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजवी यांच्याकडे केली आहे. भारतात खेलो इंडिया प्रशिक्षण सेंटर योजनेमधून महाराष्ट्र राज्यातील 23 जिल्हयांना खेलो इंडियाचे सेंटर मिळाले आहे. परंतु महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्हयाला खेलो इंडियाचे सेंटर मिळालेले नाही. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील एक ऐतिहासीक असे शहर आहे. शिर्डी व शिंगणापूर सारखे मोठे देवस्थान जिल्हयात आहे. आशियाई खंडातील एकमेव रणगाडा टँक म्युझिम जिल्हयात आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक बरोबर क्रीडा क्षेत्रात सुध्दा जिल्हा मागे राहिलेला नाही.

खेलो इंडिया प्रशिक्षण स्किममधून अहमदनगर जिल्हयाला वगळण्यात आल्याने जिल्हयातील गुणवंत खेळाडूंबरोबरच जिल्हयावर सुध्दा अन्याय झाल्यासारखे आहे. जिल्हयातून कबड्डी, खो-खो, आर्चरी, स्विमींग, टेबलटेनीस, अ‍ॅथलिटिक्स, व्हॉलीबॉलसह इतर खेळात सुध्दा राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू चमकले आहेत.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगबाद, नागपूर, नाशिकनंतर सर्वात मोठे क्रीडा संकुल अहमदनगर शहरात असल्याने खेलो इंडियाचे सेंटर मिळावे अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.

कबड्डी, खो-खो, आर्चरी, स्विमींग, टेबलटेनीस, अ‍ॅथलिटिक्स, व्हॉलीबॉल स्पर्धेत नगरचे खेळाडू, राज्य, अंतरराज्य पातळीवर चमकलेले आहे. बॅडमिंटनचे 8 सिंथेटिक कोर्ट, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विंमीग पुल, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रीकेट, टेबलटेनीस, आर्चरी यासारखे मैदाने उपलब्ध आहेत. असे असतानाही जिल्ह्याला खेलो इंडियाचे एकही प्रशिक्षण सेंटर मिळत नाही ही मोठी नामुष्की आहे.

– प्रा. विजय म्हस्के, क्रीडा शिक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या