Thursday, April 25, 2024
Homeनगरदमदार पावसाने खरीपाच्या पिकांना आधार

दमदार पावसाने खरीपाच्या पिकांना आधार

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpri Nirmal

खरीप पेरणीनंतरच्या आठवड्यात मोसमी पावसाचे दमदार आगमन झाल्याने उगवन झालेल्या खरीप पिकांना आधार मिळाला आहे. जुलै महिन्यात पिक विमा भरण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ असते. मात्र गेल्या दोन वर्षापासून पीक विम्यांचे परतावे न मिळाल्याने शेतकर्‍यांकडून यावर्षी पीक विमा भरण्याबाबद नापंसत दिसत आहे.

- Advertisement -

कायमच दुष्काळाला सामोरे जावे लागणार्‍या पिंपरी निर्मळ परिसराला चालू वर्षीही पेरणीयोग्य दमदार पावसाची वाट पहावी लागली. यादरम्यान परीसरात बर्‍यापैकी पाऊस झाला. पेरणीयोग्य ओल झाल्याने खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सोयाबीन, बाजरी, मका, भुईमुग व चारा पिकांचा समावेश जास्त आहे.

यावर्षी ओल चांगली असल्याने पेरण्यानंतर सर्वच पिकांचा उतारही चांगला झाल्याने दुबार पेरणीची गरज पडली नाही. आठवडाभराच्या विसाव्यानंतर झालेल्या दमदार पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने उतरण झालेल्या खरीप पिकांना चांगला आधार मिळाला आहे. झालेल्या पावसाने विहिरींना पाणी वाढणार नसले तरी पेरणी झालेल्या पिकांना पुढील पंधरा दिवसांसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याने बळीराजाच्या चेहर्‍यावर समाधान ओसंडून वाहत आहे.

तसेच जुलै महिन्यात फळबागा व खरीप पिकांच्या पिक विमा भरण्याची धावपळ असते. मात्र गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात नुकसान होवूनही पिक विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांना पिक विम्याचे परतावे देण्यात आलेले नाहीत. गेल्या वर्षी शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले होते. पंचनामे करून विमा कंपनीने भरलेल्या रकमेएवढेही परतावे दिले नाहीत तर फळबागांच्या परताव्याची रक्कमही अत्यंत तुटपुंजी होती. त्यामुळे विमा कंपन्याच्या मनमानीमुळे चालु वर्षी पिक विमे भरण्याकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर्षी विमा भरणार्‍या शेतकर्‍यांच्या संख्येत व क्षेत्रात मोठी घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या