मुख्यमंत्री शिंदेंचा फोन आणि बोम्मईंच ट्वीट

jalgaon-digital
2 Min Read

पुणे | Pune

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. या सीमावादामुळे कर्नाटकात महाराष्ट्राच्या काही वाहनांवर हल्ले झाले. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यात कर्नाटकातील बसेसना काळा फासण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या फोनवरुन चर्चा केली. याबाबतची माहिती खुद्द बोम्मई यांनी स्वत: ट्वीट करून दिली. मात्र, त्याचवेळी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेही ते सांगायला विसरले नाही.

यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून राज्यातील बसेसला लक्ष्य केल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तर विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने हा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील राज्य सरकारला 24 तासांचा अल्टीमेटम दिला होता.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, दोन्ही राज्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे यावर आम्ही दोघांचेही एकमत झाले. दोन्ही राज्यातील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आहेत.

मात्र, कर्नाटक सीमेबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. आणि कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात सुरू राहील, असेही सांगायला बोम्मई विसरले नाहीत. कर्नाटकातील बेळगावी आणि इतर काही मराठी भाषिक गावांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याची मागणी महाराष्ट्र अनेक दिवसांपासून करत आहे. 1960 च्या दशकात राज्यांच्या भाषा-आधारित पुनर्रचनेदरम्यान हे मराठी-बहुल क्षेत्र कन्नड-बहुल कर्नाटकाला चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा महाराष्ट्राचा आरोप आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *