Thursday, April 25, 2024
Homeनगरसिनेस्टाईल पाठलाग करून कर्डिलेला पोलिसांनी पकडले

सिनेस्टाईल पाठलाग करून कर्डिलेला पोलिसांनी पकडले

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

विरोधात निवडणूक लढविल्याच्या रागातून पराभूत उमेदवार जयवंत नरवडे यांच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या अमोल कर्डिले याचा

- Advertisement -

पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग करून चव्हाणवाडी फाटा (ता. शिरूर) शिवारात मुसक्या आवळल्या.

अमोल कर्डिले याचा चुलता अनिल कर्डिले याच्या विरोधात जयवंत नरवडे यांनी निवडणूक लढविली होती. निवडणुकीचा अर्ज दाखल केल्यानंतर तो मागे घ्यावा, यासाठी अमोल व त्याचे साथीदार जयवंत यांना दमदाटी करून दबाव आणत होते. मात्र दबाव झुगारून नरवडे यांनी निवडणूक लढविली. मतमोजणीत अनिल कर्डिले विजयी झाला तर जयवंत नरवडे पराभूत झाले.

निवडणूक निकालाच्या दुसर्‍या दिवशी अमोल कर्डिले हा इतर साथीदारांना घेऊन जयवंत नरवडे यांच्या घरातून बाहेर ओढून शिविगाळ करून मारहाण करतानाच अमोल कर्डिले याने जयवंत यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता. तलवारीचे वार झाल्यानंतर रक्तबंबाळ झालेले नरवडे निपचित पडले. त्यानंतर सर्व आरोपी तेथून पसार झाले.घटना घडली त्याच दिवशी आकाश कर्डिले व रमेश नरवडे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पुणे जिल्ह्यातून विवेक उर्फ पिंट्या कर्डिलेसह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले.

मुख्य आरोपी अमोल कर्डिले, अनिल कर्डिले यांच्यासह इतर आरोपी फरार असल्याने पोलीस त्यांच्या मागावर होते. अमोल कर्डिले हा शिरूर तालुक्यातील गोलेगाव, निमोणे भागात असल्याची माहिती समजल्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, भालचंद्र दिवटे, सत्यम शिंदे, दत्ता चौगुले हे त्याचा शोध घेत होते.

आरोपींचा शोध सुरू असताना सायंकाळच्या सुमारास अमोल कर्डिले हा चव्हाणवाडी फाटा शिवारात कोल्हे यांच्या शेतामध्ये दारू व मटण पार्टी करीत असल्याची माहिती पुढे आली. पथकाने चव्हाणवाडी फाटा शिवारात जात कोल्हे यांच्या शेतात शोध सुरू केला असता उसाचा फड व डाळिंब बागेच्यामध्ये लाल रंगाची कार उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथक तेथे पोहचले त्यावेळी अमोल व त्याचा मित्र मयुर याच्यासोबत मटण व दारूच्या पार्टीमध्ये रमला होता.

पोलीस पाहताच डाळिंबाच्या बागेत तो सैरावैरा पळू लागला. पोलीस त्याचा पाठलाग करीत असतानाही तो तेथून सटकण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर निरीक्षक बळप यांनी फायर करण्याचा इशारा दिल्यानंतर अमोल पोलिसांना शरण आला. अमोल यास पारनेर येथे आणण्यात येऊन त्याची अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली. आता पोलीस इतर आरोपींच्या शोधात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या