Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हा परिषदेवर भाजपा-कॉंग्रेसला प्रत्येकी २३ जागा

नंदुरबार जिल्हा परिषदेवर भाजपा-कॉंग्रेसला प्रत्येकी २३ जागा

सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हातात

नंदुरबार | प्रतिनिधी-

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५६ पैकी प्रत्येकी २३ जागा कॉंग्रेस व भाजपाला मिळाल्या आहेत. शिवसेनेला ७ तर राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी २९ जागांची आवश्यकता असल्याने शिवसेना ज्या पक्षासोबत जाईल त्याची सत्ता जिल्हा परिषदेवर बसणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, सहा पंचायत समित्यांपैकी दोन पंचायत समित्या भाजपा, दोन पंचायत समित्या कॉंग्रेस, एक पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आली आहे.

तर तळोदा पंचायत समितीत भाजपा व कॉंग्रेसला समसमान जागा मिळाल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी व त्या अंतर्गत येणार्‍या सहा पंचायत समितींच्या ११२ गणांसाठी काल दि. ७ रोजी मतदान घेण्यात आले. आज या निवडणुकीसाठी मतमोजणी करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या ५६ गटांपैकी भाजपा व काँग्रेसला प्रत्येकी २३ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला ७ तर राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. अक्कलकुवा तालुक्यात ८ गटांपैकी ६ गटांवर काँग्रेस, तर भाजपा व शिवसेनेने प्रत्येकी २ गटांवर विजय मिळविला आहे. अक्राणी तालुक्यातील ७ पैकी ४ गटांवर कॉंग्रेस तर ३ गटांवर शिवसेनेने विजय मिळविला आहे. तळोदा तालुक्यातील ५ गटांपैकी ३ गटांवर भाजपा तर २ गटांवर कॉंग्रेसने विजय मिळविला आहे.

शहादा तालुक्यातील १४ पैकी ९ गटांवर भाजपाने तर ५ गटांवर कॉंग्रेसने विजय मिळविला आहे. नंदुरबार तालुक्यातील १० गटांपैकी ७ गटांवर भाजपाने, २ गटांवर शिवसेनेने तर एका गटावर कॉंग्रेसने विजय मिळविला आहे.

नवापूर तालुक्यातील १० गटांपैकी ५ गटांवर कॉंग्रेसने, ३ गटांवर राष्ट्रवादीने तर २ गटांवर भाजपाने विजय मिळविला आहे.

जिल्हयातील सहा पंचायत समित्यांपैकी नंदुरबार व शहादा पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. अक्राणी पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. अक्कलकुवा व नवापूर पंचायत समितीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे.

तर तळोदा पंचायत समितीत भाजपा व कॉंग्रेसला समसमान जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे तेथे कोणाची सत्ता स्थापन होते हे सांगता येणे कठीण आहे.

दरम्यान, या निवडणुकीत जिल्हयातील सर्व पक्षांच्या नेत्यांच्या घरातील सदस्य उभे होते.

त्यापैकी बहुतांश सदस्य विजयी झाले आहेत. फक्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.ऍड.के.सी.पाडवी यांच्या पत्नी सौ.हेमलता कागडा वळवी या तोरणमाळ गटातून पराभूत झाल्या आहेत. तर आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या घरातील तब्बल पाच सदस्य भाजपाकडून निवडून आले आहेत.

आ.डॉ.गावित यांच्या पत्नी सौ.कुमुदिनी गावित, बंधू प्रकाश गावित, सौ.विजया प्रकाश गावित, पुतणी अर्चना शरद गावित, पूतणी राजश्री शरद गावित हे एकाच घरातील पाच सदस्य निवडून आले आहेत.

माजीमंत्री सुरुपसिंग नाईक यांचे दोन्ही पूत्र अजित नाईक व मधुकर नाईक हे कॉंग्रेसकडून निवडून आले आहेत. माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांच्या कन्या सिमा वळवी यादेखील कॉंग्रेसकडून निवडून आल्या आहेत.

माजी जि.प.अध्यक्ष भरत गावित व सौ.संगीता गावित हे पती-पत्नी भाजपाकडून विजयी झाले आहेत. माजी जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक हेदेखील विजयी झाले आहेत. कॉंग्रेसचे अभिजीत पाटील, दीपक पाटील यांच्या पत्नी सौ.जयश्री पाटील विजयी झाले आहेत. रविंद्र गिरासे व रिना रविंद्र गिरासे हे पतीपत्नी पराभूत झाले आहेत. कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक हेदेखील पराभूत झाले आहेत.

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी हे पराभूत झाले आहेत. माजी आ.डॉ.नरेंद्र पाडवी यांच्या पत्नी आशाबाई पाडवी या पराभूत झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या