Thursday, April 25, 2024
Homeनगरराज्य सरकारकडून कांदा व्यापार्‍यांचे हितसंवर्धन

राज्य सरकारकडून कांदा व्यापार्‍यांचे हितसंवर्धन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कांद्याचे भाव पडले असून, शेतकरीही उघड्यावर आला आहे. अशा स्थितीत राज्यातील भाजप सरकार मात्र, कांदा व्यापार्‍यांचे हितसंवर्धन करण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला. दरम्यान, भाजपने शिंदे गटाशी केलेली युती महाराष्ट्राला रुचलेली नाही, त्यामुळे निवडणुका घ्यायला भाजप घाबरत आहे, असा दावाही पाटील यांनी केला.

- Advertisement -

सावता परिषदेने आयोजित केलेल्या माळी समाज मेळाव्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष पाटील नगरला आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. नगरचे आ. संग्राम जगताप यावेळी उपस्थित होते. कांद्याचे भाव पडल्याने व शेतकरी अडचणीत आल्याने राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा सभागृहात याबाबत आवाज उठवला. त्यावेळी सरकारने थातूर मातूर उत्तर दिले व समिती नेमण्याचे आश्वासन दिले. पण अशी समिती नेमून तिच्या बैठका होईपर्यंत लहान शेतकर्‍याला मिळेल त्या भावात कांदा विकण्या शिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळेच कांदा व्यापार्‍यांचे हितसंवर्धन करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे, असा आरोप करून पाटील म्हणाले, कांदा निर्यात बंदी नाही म्हणून त्यांनी सभागृहात सांगितले आहे.

महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवल्या तर मोठे यश व बहुमत या तिन्ही पक्षांचे होऊ शकेल, असा दावा करून पाटील म्हणाले, पण भाजप स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुका घेण्याला घाबरत आहे. त्यांच्या लक्षात आले आहे की, शिंदे गटासमवेत युती केलेली महाराष्ट्राला रुचलेली नाही. त्यामुळेच शक्य तितक्या निवडणुकापुढे ढकलण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, जातनिहाय जनगणना करण्याची ओबीसी समाज बांधवांची मागणी आहे व येथे झालेल्या सावता परिषदेतही तसा ठराव केला गेला आहे. राज्यातील ओबीसी समाजाचीही जातनिहाय सर्व्हेक्षण व जनगणना होण्याची मागणी आहे. तिची दखल सत्ताधार्‍यांनी घेतली पाहिजे, असेहीत्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

जातनिहाय जनगणना व्हावी

ओबीसी समाजाची मागणी आहे की, जातनिहाय सर्वेक्षण व्हावं. तसेच सावता परिषदेतील ठराव केला असल्याचं त्यांनी सांगितले आहे. आमच्या पक्षाची देखील हीच मागणी आहे. ही सर्व समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी, असं पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय.

- Advertisment -

ताज्या बातम्या