धुळे : जातपंचायतीचा जाच ; अखेर दोषींविरूध्द पोलिसात गुन्हा

jalgaon-digital
1 Min Read

धुळे – Dhule

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटची दखल घेतली असून त्याच्या आदेशानंतर तालुक्यातील खोरदड तांडा जातपंचायतीचा जाच प्रकरणी अखेर दोषींविरूध्द धुळे तालुका पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे. यासाठी अंनिसच्या पाठपुरावा केला होता.

येथील बंजारा जातपंचायतीच्या पंचांनी तेथील समाज बांधव दिपक सोमा राठोड यांच्या कुटुंबासह इतर चार कुटुंबाला समाजातुन बहिष्कृत केले. त्यामुळे दिपकने धुळे तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र कार्यवाही झाली नाही.

त्यानंतर तक्रारदाराने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यालय गाठुन आपबिती कथन केली होती. त्यावेळी अंनिसचे पदाधिकार्‍यांनी धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन व स्मरणपत्र दिले होते. शेवटी पिडीत व्यक्तीने थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून मदतीची विनंती केली.

गृह खात्याने तात्काळ दखल घेत धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने एका दिवसात पिडीत व्यक्तीची फिर्याद नोंदवून घेतली. दिपक राठोड यांच्या फिर्यादीवरून खोरदड तांडा येथील मोहन भिला चव्हाण यांच्यासह एकुण 20 जणांविरूद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमासह सामाजिक बहिष्कारापासुन व्यक्तींचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत व्यक्तीला महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जातपंचायतीला मुठमाती अभियान प्रमुख क्रुष्णा चांदगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.सुरेश बिर्‍हाडे, जिल्हा सचिव प्रा.डॉ.दिपक बाविस्कर, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड.विनोद बोरसे यांनी सहकार्य केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *