छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती !

जळगाव :

छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेले आदर्शवादी,नीतीवंत महापुरुष. मुघलशाही, आदिलशाही,निजामशाही, बरीदशाही या शाह्यांच्या असंस्कृत राज्यांच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलीही शाही उभी न करता स्वराज्य उभं केलं. हे स्वराज्य कोणासाठी ? हे स्वराज्य रयतेसाठी.स्वराज्य कशासाठी ? स्वराज्य लोककल्याणासाठी अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी राजे शहाजी व राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या स्वप्नातील व संकल्पनेतील स्वराज्य निर्माण केलं. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता

शाहसुनोः शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते !! अशा राजमुद्रे च्या माध्यमातून ते प्रतीत होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे युद्धांच्या,लढायांच्या,रक्तपाताच्या पलीकडे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. शिवरायांचे एक एका पैलूंवर शेकडो पुस्तके लिहिता येऊ शकतात , हजारो मालिका काढता येऊ शकतात,प्रत्येक पैलूवर बोलण्यासाठी अमर्याद वेळ लागू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रतिगामी लेखक, कादंबरीकार, शाहीर यांनी समाज मनामध्ये चुकीच्या पद्धतीने बिंबवली.

भाषणासाठी उभा असणारा एखादा शाळेचा मुलाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज असेल तर ङ शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शिवरायांनी अफजलखानचा कोथळा काढला,शाहिस्तेखानाची बोटे छाटली’ यापलीकडे त्याला भाषण देता येत नाही.

वास्तविक चूक त्यांची नाही,चूक समाज मनामध्ये ज्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने उभी केली त्यांची आहे. दंगली घडवताना मज्जिद किंवा इतर धार्मिक स्थळे उध्वस्त करताना शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. पण वास्तवात छत्रपती शिवाजी महाराज हे धार्मिक वृत्तीचे जरी असले तरी धर्मांध नव्हते. हे त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून स्पष्ट होईल.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही निर्माण केले ते त्या काळाच्या पलीकडचे होते.लोककल्याणाची दूरदृष्टी निर्माण केलेल्या आदर्श व सैनिकांसाठी घालून दिलेले नियम व कायदे हे कुठल्याही सम्राटाने केलेले नव्हते ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. आजच्या परिस्थितीमध्ये प्रायव्हेट डायजेशन, ग्लोबलायझेशन व लीबरलाइजेशन च्या काळात श्रीमंत व गरीब यातील दरी अधिकाधिक वाढत चालली आहे.जागतिकीकरणाने जागतिक अर्थव्यवस्था खुली झाली.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून रोजगार उभा राहील, नोकरीव्यवसाय उभे राहतील, स्थानिक कारागिरांना , उद्योगांना जागतिक बाजारपेठ मिळेल असे वाटत होते.मात्र 1992 नंतर झालेल्या जागतिकीकरणाने इथल्या स्थानिकांची अर्थव्यवस्था मोडून काढली. शेती, सहकार व कुटुंब ह्या तीन व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत केल्या. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती समजून घेणे गरजेचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक म्हणजे शेती.शिवरायांच्या काळात शेती हा जनतेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होता.

त्यांनी शेतकरी जगवला शेती उभी केली.शिवरायांनी शेती धोरण ठरवताना काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले. पीक लावणीच्या काळात ज्या ठिकाणी आदिलशाही किंवा इतर सामराज्यांकडून शेतीला धोका आहे अशा ठिकाणी पीक लावणीच्या काळात शेतीला संरक्षण पुरवले. प्रत्येक शेतकर्‍याच्या कुटुंबातून एक व्यक्ती आपल्या सैन्यामध्ये भरती करून घेतला.शेती व नोकरी अशा दोन्ही माध्यमातून शेतकर्‍याच्या कुटुंबाला उत्पन्न मिळत असे. मात्र एखाद्या कुटुंबात एक शेतकरी कर्ता असला तर त्याला सैन्यात समावून घेऊन शेती कसायाच्या दिवसावर शेतीसाठी विशेष रजा मंजूर केली जायची.शेतीसाठी विशेष रजा मंजूर करायला करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवद्वितीय राजे होते.

शेतकर्‍यांसाठी कर्ज उपलब्ध करून देणे ज्या शेतकर्‍यांना कसायला शेती नसेल त्याला शेती उपलब्ध करून देणे.बी-बियाणे नसतील तर बियाणे उपलब्ध करून देणे.शेतीची मशागत करायला बैल नसतील तर बैल सुद्धा उपलब्ध करून देणे. त्यासोबतच शेतकर्‍याचे कुटुंब दूध दुभते असायला पाहिजे. शेतीसोबतच त्याला दुधासारखा एखादा पूरक व्यवसाय पाहिजे या उद्देशाने गायी विकत घेण्यासाठी सुद्धा कर्ज उपलब्ध करून दिले आहेत.हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती धोरण होते.पण यासोबतच या सर्व गोष्टींची वसुली करताना शेतकर्‍यांच्या मागे तगादा न लावता टप्प्याटप्याने वसूल करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

प्रभावळीच्या सुभेदारास लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात, शेतकर्याच्या मिरचीच्या देठालाही आत्ता लावू नका. त्यासोबतच आपल्या सैनिकांना उद्देशून लिहिलेल्या एका पत्रात शिवाजी महाराज शेतकर्‍यांची किती काळजी करत होते हे दिसून येईल, त्या पत्रात म्हणतात कि, सैनिकांनी चाकूरीच्या बाहेर आपलं सैन्य, हत्ती, घोडे चालवु नये.

उजाड माळरानावर छावणी उभारावी तसेच रात्री झोपताना दिवा विझवून झोपा, कारण दिवा सुरू राहिला तर वात खाण्याच्या उद्देशाने उंदीर पेटती वात ओढून घेऊन जाईल,शेतकर्‍यांच्या गंजीत घुसेल व शेतकर्‍यांची गंजी पेट घेईल. लोककल्याणाचा इतका बारीक विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून यांच्या काळात शेतकरी शंभर टक्के कर्ज परत फेड व 100% कर भरत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थानिक लघुउद्योगांना व स्थानिक कारागिरांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले.आपल्या स्वराज्यात येणार्‍या वस्तूंवर त्यांनी जबरी कर बसवला, तर निर्यात वस्तूंवर कर कमी केला.शेतसारा वसूल करताना जमिनीची प्रत व उत्पादन क्षमतेवर शेतसारा वसूल केला जायचं.सरसकट सगळ्या शेतकर्‍यांकडून शेतसारा वसूल केला जात नव्हता.

यासोबतच स्थानिक शेतकर्‍यांना, स्थानिक व्यापार्‍यांना व कारागिरांना पोषक वातावरण राहील अशीच व्यवस्था निर्माण केली.पोर्तुगीजांची मिठागरे होती या मीठा गरांतून येणारे मीठ यावर प्रचंड मोठा कर लावला मात्र कोकणच्या मिठाला त्यांनी देशाची बाजारपेठ उपलब्ध करून दिली.कोकणच्या मिठावर निर्यात कर 0 टक्के ठेवला.

स्वराज्यात पैसा यायचं तो करातून व महत्त्वाचं म्हणजे लुटीतून.ही लूट संपूर्णपणे श्रीमंत व्यापार्‍यांची केली जायची.लुटीमध्ये शत्रूच्या स्त्री ला हात लावू नका, लहान मुलांना त्रास देऊ नका असे आदेश सैनिकांना होतेच. पण स्वराज्यात येणार्‍या लुटीचे सुद्धा व्यवस्थापन केले.

पूर्वी लूट केली जायची लुटी मध्ये मिळालेले साहित्य पैसा-अडका हे लूट करणार्‍या सरदारांना त्याच्या टक्केवारी च्या स्वरूपात दिले जायचे. शिवरायांनी ही पद्धत बंद केली।जेव्हा लूट केली जायची त्यावेळी त्याचे ऑडिट व्हायचे व स्वराज्य जमा करताना सुद्धा त्याचे ऑडिट व्हायचे. लुट ही पूर्णपणे स्वराज्याच्या खजिना मध्ये जमा केली जायची. त्याबदल्यात बक्षिसी म्हणून शिवराय सरदारांना काहीना काही देत मात्र सरदार पगारी असल्यामुळे त्यांना भरघोस पगार दिल्यामुळे वेगळा हिस्सा दिला नाही.

आपल्या स्वराज्यामध्ये सैनिक, सरदार,अष्टप्रधान मंडळ हे पगारी ठेवले.प्रत्येक महिन्याला त्यांचे वेतन केले जायचे.वेतनधारी सैन्य असणारे त्या काळातील शिवराय एकमेव होते.कुणालाही वतनदारी, जाहीरदारी द्यायची नाही हा त्यांचा शिरस्ता होता.त्यांनी तो कटाक्षाने पाळला.

शिवरायांनी अकुशल तरुणांना कुशल बनवले. संरक्षक,किल्लेदार,प्रधान बनवले. तरुणांच्या हाताला कौशल्य देऊन अधिकाधिक प्रशिक्षित केले. हातांना काम केले. एक दिशा दिली. शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळी ’शिवराई होन’ असे स्वतंत्र नाणे पाडले. शिवरायांच्या मृत्युसमयी स्वराज्याच्या कोठारांमध्ये पाच लक्ष शिवराय होन नाणे शिल्लक असल्याची नोंद आढळते.

राज्याभिषेकाचा प्रचंड खर्च झालेला होता. वेगवेगळ्या भट भिक्षुकानाही देणग्या दिल्या होत्या.राज्याभिषेकाचा खर्च इतका प्रचंड होता की स्वराज्यचा खजिना रिकामा झाला. शिवराज्याभिषेकाचा साठी हा खर्च करणे गरजेचे होते, कारण राज्याभिषेकानंतर शिवरायांना छत्रपती पद धारण करून अधिक अधिकार मिळाले.

आदिलशाही,मोगलशाही यासोबतच ब्राह्मणशाहीला शासन करण्याचे अधिकार मिळाले. समाजमान्यता तर होतीच मात्र धर्म मान्यता मिळाली.राज्यभिषेक शक सुरू करण्यात आला.राज्याभिषेक समयी झालेल्या खर्चाची तूट भरून काढण्यासाठी शिवाजीमहाराजांनी बड्या जमीनदार व व्यावसायिकांकडून सिंहासन पट्टी नावाचा एक नवा कर आकारला.सिंहासन पट्टी राज्याभिषेकाच्या खर्चाची तूट भरून निघाल्यानंतर वसूल करणे बंद केले.

शिवरायांनी कुठलाही खर्च हा चैनीसाठी केलेला नाही.स्वराज्य मध्ये हौसेसाठी खर्च नाही हा पायंडाच होता. त्यामुळे नाचगाणे, मदिरा, मुजरा यक कसल्याही गोष्टीला स्वराज्यात स्थान दिले गेले नाही. कारण निवडक सैन्य,निवडक खजिना , यासोबत बलाढ्य अशा मोगल सल्तनतीशी लढायचे होत. जिंकायचे होते. प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवला जात होता.

शिवरायांनी आपली अर्थ नीती ठरवताना स्वराज्यात पैसा कोणत्या मार्गाने येईल याचा खूप लांबचा विचार करून ठेवलेला होता. समुद्रमार्गे ही पैसा घेऊ शकतो हे आरमार उभे करून सिद्ध करून दाखवले.त्यावेळी स्थानिक राज्यांमधील फक्त त्यांनीच आरमार उभारले. त्यामुळे त्यांना ‘द फादर ऑफ इंडियन नेव्ही’ असे म्हटले जायचे.

कल्याण व भिवंडी या ठिकाणी चांगल्या प्रतीचे लाकूड उपलब्ध असल्याने त्याठिकाणी जहाजबांधणीचे कारखाने उभे केले. स्थानिक कोळी, भंडारी या जातीतील लोकांना जहाज बांधणी साठी भरती केले.सर्व काम स्थानिक कामगारांकडून करून घेतले. जहाजबांधणीचे कौशल्य स्थानिक कामगारांना शिकवून कायमस्वरूपी ची व्यवस्था लावली.जवळपास पाचशे लहान-मोठी जहाजे दहा लाख रुपये खर्च करून उभी केली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पदमदुर्ग, सर्जा कोट, मदन दुर्ग, राजकोट, खांदेरी-उंदेरी ही जलदुर्ग त्यांनी बांधून घेतली.

या माध्यमातून दर्यावर हुकूमत निर्माण केलीच पण चोरट्या मार्गाने होणारी व्यापारी वाहतुकीवर निबंध आणले.ज्या व्यापार्‍यांना व उद्योगांना या समुद्रामार्गे वाहतूक करायची असेल त्यांनी स्वराज्याची परवानगी घेणे गरजेचे होते. परवानगी देत असताना त्यांच्याकडून संरक्षण कर वसूल केला जाईल. व्यापारासाठी स्वतंत्र गलबते त्यांनी बांधून घेतली. अशाप्रकारे समुद्रमार्गे ही अर्थव्यवस्थेत पैसा येत राहील याची तजवीज केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून इथल्या सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यापर्यंत अधिकाधिक सोयीसुविधा कशा पोचतील, त्यांच्या हाताला काम कसे मिळेल याची काळजी घेतली.शेतकर्‍यांची उत्पादकता , स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन ,तरुणांना रोजगार ,उद्योगांना संरक्षण व सामाजिक समता या तत्वावर त्यांचे नीतिमान व आदर्शवादी स्वराज्य उभे होते.

समारोप – राज्याभिषेकाच्या समयी हेन्री ऑक्सीन्डन नावाचा इंग्रज वकील उपस्थित होता.तो उपस्थित असताना निरीक्षण करून त्यावेळी नोंद करून ठेवलेले आहे.राज्याभिषेकाच्या सिंहासनाचे चित्र रंगवत असताना त्यातील एक महत्वाची नोंद अशी, यापैकी एका रत्नजडित भाल्याच्या टोकावर सोन्याचा एक तराजू होता

आणि तो समतोल ठेवला होता हा तराजू म्हणजे न्यायाचे द्योतक होय. हेच शिवाजी महाराजांच्या जीवनातील न्यायाचे धोरण होतं. कुणालाही झुकते माप न देता समांतर, समतावादी ,समृद्ध स्वराज्य हे खर्‍या अर्थाने अर्थनीती परिपूर्ण राष्ट्र होते.

– संदर्भ : 1) छत्रपती शिवाजी – सेतुमाधवराव पगडी. 2) शिवशाहीतील अष्टप्रधान – डॉ. प्रभाकर ताकवले 3) महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी – प्रा.डॉ. आनंद पाटील 4) कुळवाडीभूषण – पुरुषोत्तम खेडेकर 5) रयतेचा राजा शिवछत्रपती – डॉ.पी एस जगताप.

लेखक – पंकज रणदिवे,
चाळीसगाव – 8600073161


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *