Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेश22,222 फूट उंच लिओ पारगिलवर फडकला तिरंगा

22,222 फूट उंच लिओ पारगिलवर फडकला तिरंगा

डेहराडून | Dehradun

इंडो तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) जवानांनी हिमाचल प्रदेशातील तिसरे सर्वात उंच शिखर असलेल्या (22,222 फूट उंच) लिओ पारगिलच्या शिखरावर

- Advertisement -

तिरंगा फडकावला. एक धाडसी मोहीम फत्ते झाल्याचा आनंद जवानांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता.

करोना काळात आयटीबीपीच्या जवानांकडून आखण्यात आलेली ही पहिलीच धाडसी मोहीम आहे. 16 सदस्यांच्या दोन वेगवेगळ्या पथकातील सदस्य ही मोहीम फत्ते करण्यात यशस्वी ठरले.

आयटीबीपीच्या पर्वतारोही तुकडीत जी. डी. कुलदीपसिंह यांच्या नेतृत्वाखाली कॉन्स्टेबल प्रदीप नेगी, काको केदारता, अनिल नेगी आणि आशीष नेगी यांचा समावेश होता. 31 ऑगस्ट रोजी लिओ पारगिलच्या टेकडीवर त्यांनी यशस्वी चढाई केली, तर याच पथकाच्या दुसर्‍या पर्वतारोही सदस्यांनी 1 सप्टेंबर रोजी साडेअकरा वाजता लिओ पारगिल गाठले. या पथकातील सात सदस्यांचे नेतृत्व धर्मेंद्र ठाकूर यांनी केले.

आयटीबीपीच्या 17 व्या बटालियनचे कमांडंट देवेंद्रकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट रोजी क्षेत्रीय मुख्यालय सिमलाचे उपमहानिरीक्षक प्रेमसिंह यांनी या तुकडीला रवाना केले होते. उल्लेखनीय म्हणजे, पवर्तारोही तुकडीचे प्रमुख प्रदीप नेगी यांनी दुसर्‍यांच्या या टेकडीवर यशस्वी चढाई केली. त्यांनी या अगोदर माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर दोनदा सर केले आहे.

करोनाकाळात अशा प्रकारच्या मोहिमा आखण्यात बर्‍याच अडचणी जाणवल्या. मात्र, अडचणींतून मार्ग काढत ही मोहीम यशस्वी पूर्ण करण्यात आली, असे देवेंद्रकुमार यांनी म्हटले आहे.

लिओ पारगिल हे शिखर हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पिती जिल्ह्यात आहे. या भागात प्राणवायूची कमतरता असून, हे शिखर बर्फाने आच्छादलेले असल्याने चढाईस अतिशय कठीण समजले जाते.

आयटीबीपीच्या जवानांनी आतापर्यंत 200 हून अधिक शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. यात माऊंट एव्हरेस्ट, माऊंट धौलागिरी, कांचनजुंगा, नंदा देवी, पंचाचुली यासारख्या शिखरांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या