लोहपुरुष : सरदार वल्लभभाई पटेल

jalgaon-digital
10 Min Read

राजेंद्र चौधरी

31 ऑक्टोबर 1875 रोजी वल्लभभाईंचा जन्म नडियाद येथे झाला. त्यांचे वडील झवेरभाई झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या सैन्यात होते. त्यांनी इंग्रजांविरुध्द झालेल्या लढाईत प्रत्यक्ष भाग घेतला होता.

त्यांच्यामुळेच त्यांची मुले राष्ट्रभक्त बनली. पित्याकडून त्यांना प्रामाणिकपणा, स्वाभिमान आणि निर्भिडपणा यांची शिकवण मिळाली. आई लाडबाई धार्मिक वृत्तीची असून तिने मुलांचे चारित्र्य आणि चांगले संस्कार होण्यावर भर देत मुलांना वाढवले.

झवेरभाई आपल्या कुटुंबासह नडियाद गावात राहत होते.गावापासून सात किलोमीटर त्यांची शेती होती.शेतात काम करायला जाताना ते आपल्या मुलांनाही सोबत नेत. या सात किलोमीटरच्या वाटचालीत झवेरभाई साधे अंकगणित वगैरे विषय मुलांना शिकवत. लहानपणापासून वल्लभभाईंच्या ठिकाणी नेत्तृत्व, निश्चय आणि अन्यायाचा प्रतिकार करणे असे गुण असल्याचे दिसून येऊ लागले. त्यामुळे वल्लभभाई लहान असतानाच झवेरभाईंना आपला मुलगा मोठा माणूस बनणार असे वाटू लागले.आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी व शिक्षणासाठी अपार कष्ट सोसण्याची झवेरभाईंची तयारी होती.

नेत्तृत्व गुण :-

नडियादच्या शाळेत वल्लभभाईंचे शिक्षण सुरु झाले.शाळेतले एक शिक्षक रागीट आणि कडक स्वभावाचे होते.एकदा त्यांनी एका गरीब विद्यार्थ्याला काही कारणाने दंडाची शिक्षा दिली. गरीबीमुळे दंड भरणे त्या विद्यार्थ्याला शक्य झाले नाही. तेव्हा शिक्षकाने त्याला वर्गाबाहेर काढले. वर्गातल्या सर्व मुलांना हे अन्यायकारक वाटले. वल्लभभाईंनी सर्वांना हरताळ करण्याचे आवाहन केले. हरताळ यशस्वी झाला. वल्लभभाईंनी पुढाकार घेऊन तब्बल तीन दिवस हरताळ चालवला. अखेर मुख्याध्यापकांनी शिक्षकातर्फे क्षमा मागितली आणि कोणालाही अन्यायाने शिक्षा न करण्याचे आश्वासन दिल्यावर हरताळ संपला.

पोलादी पुरुष :-

कोवळ्या वयातच आपल्या काखेतील फोडास मोठ्या हिंमतीने गरम लोखंडी सळई लावून ती फोडणारे वल्लभभाई नुसते शरीरानेच पोलादी नव्हते तर मनानेही ते तसेच कणखर होते. त्यांच्या कर्तव्यकठोर वृत्तीमुळेच त्यांना राजकीय गोटात पोलादी पुरुष म्हणून पदवी मिळाली. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री या नात्याने त्यांनी देशहितासाठी घेतलेले निर्णय व त्याची अंमलबजावणी त्यांच्या कार्यकुशलतेची व त्यांना मिळालेली पोलादी पुरुष या पदवीची साक्ष देतात. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ट आहे अशी त्यांची दृढ भावना होती.त्यानुसार त्यांची वागणूक होती. त्यांच्या जीवनातील खाली दिलेले दोन प्रसंग आपणास खूप काही सांगून जातात. जीवनात त्याग आत्मविश्वास किती महत्त्वाचा आहे याची जाणीव करुन देतात.

वल्लभभाईंचे बंधूप्रेम आणि त्याग :-

वल्लभभाईंनी तीन वर्षात डिस्ट्रीक प्लीडरचा अभ्यास करुन ती परीक्षा दिली व त्यात ते उत्तीर्ण झाले. पुढे वकीलाचा स्वतंत्ररित्या व्यवसाय करुन यांनी पैसा जमवला. सुप्रसिध्द प्रवासी कंपनी थाँमस कुक यांच्याशी पत्रव्यवहार करुन 1950 मध्ये विलायतेला जाण्याची व्यवस्था केली. वल्लभभाई पटेल व त्यांचे वडील बंधू विठ्ठलभाई पटेल दोघेही विधिज्ञ व त्यांची आद्याक्षरे व्ही.जे.पटेल अशी एकच.त्यामुळे थाँमस कुक कंपनीचे विलायतेला जाण्याची व्यवस्था केल्याचे पत्र वल्लभभाई ऐवजी विठ्ठलभाईच्या हातात पडले. त्यावरून वल्लभभाई विलायतेस जात असल्याचे त्यांना कळले. विठ्ठलभाईच्या मनातही विलायतेस जाऊन बँरिस्टर होण्याची इच्छा होतीच. कारण त्या काळात बँरिस्टर होणे फार मोठा सन्मान समजत असत. त्यांनी आपली मनीषा धाकटे बंधू वल्लभभाई यांचे जवळ बोलून दाखवताच वल्लभभाईंनी उदार अंतःकरणाने आपल्या वडील बंधूच्या बेतास संमती दिली. इतकेच नव्हे तर स्वकष्टाने जमवलेला पैसा आपल्या बंधूच्या विलायतेतील खर्चा करीता म्हणून दिला.त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचा योगक्षेम चालवला. वल्लभभाईंची पत्नी व्रतवैकल्यावर फार खर्च करते म्हणून वल्लभभाईजींची पत्नी कुरकुर करु लागताच त्यांनी कुटुंबस्वास्थ्याच्या दृष्टीने दोन वर्षांपर्यंत आपल्या पत्नीस माहेरी पाठवून दिले पण वहिनीचे मन मोडले नाही.केवढा हा त्याग आणि तो ही अगदी तरुण वयात. बंधूप्रेम असावे तर असे.

वल्लभभाईंचा हा त्याग फार मोठा आहे.त्यांच्या उदारवृत्तीचे ते द्योतक आहे. पण हा त्याग काहीच नाही असा एक फार मोठा त्याग त्यांनी राजकीय जीवनात केला आहे.वल्लभभाईंची देशसेवा पाहून त्यांना त्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला होता. स्वातंत्र्य मिळाल्यावर खरे तर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष पंतप्रधान व्हायचा. त्या दृष्टीने ते पद वल्लभभाईंचेच होते.पण आपल्या गुरुंच्या म्हणजे महात्मा गांधींच्या शब्दाखातर इच्छेखातर वल्लभभाईंनी या सन्मानाचा देखील त्याग केला. केवढे हे उदार अंतःकरण व गुरुनिष्ठा! रामायणकालीन भरतासारखे सुपूत्र अजून या देशात आहेत हेच जणू त्यांनी आपल्या या वृत्तीने सिध्द करुन दाखवले.अशी गुरुनिष्ठा असावी लागते.तेव्हा कुठे यशाचे मंदिर गाठता येते.

वल्लभभाईंचे क्रीडानैपुण्य अन् आत्मविश्वास :- वल्लभभाईंचे चरित्र असे अष्टपैलू होते याचे दर्शन त्यांच्या आयुष्यातील हा किस्सा वाचून लक्षात येईल. वल्लभभाई एक नामवंत बँरिस्टर म्हणून न्यायालयात तर गाजवीतच पण फावल्या वेळात ब्रिज खेळून क्लबमध्ये च्यांनी उत्तम खेळाडू म्हणून मान्यता मिळवली. त्यांचे हे दुहेरी यश त्यांचे विधिज्ञ सहकारी वाडिया यांना फार खटकत असे. हा पारशी गृहस्थ स्वतःला ब्रिजमध्ये फार निपुण समजत असे. हलक्या मनाची माणसे लोकांचा द्वेष करतात. त्यानुसार या वाडियांनाही सरदार पटेलांचा फार द्वेष वाटे. कोर्टात नाही तर ब्रिजमध्ये तरी आपण पटेलांची जिरवूच. या इर्षेने त्यांनी पटेलांना ब्रिज खेळण्याचे आव्हान दिले. पटेलही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता. म्हणूनच त्यांनी हे आव्हान स्विकारले पण शंभर गुणांना पाच पौंड या दराने पैज लावल्यास खेळू अन्यथा नाही. अशी अट घातली. स्वतःच्या क्रीडानैपुण्याचा फाजील आत्मविश्वास असलेल्या वाडियांनी ही अट मान्य केली व खेळ सुरु झाला. पैजेची वार्ता हा हा म्हणता पसरली व अनेक मंडळी हा अटीतटीचा सामना बघण्यास जमली. पहिल्या तीन तासापर्यंत हा सामना रंगल्यावर वाडियाचा सणसणीत पराभव होऊन त्यांना वीस पौंड गमवावे लागले. दुसर्‍या दिवशी आपण कमी दरात खेळण्यास तयार आहोत असे पटेलांनी सांगितले, पण वाडियाची खुमखुमी जिरली नव्हती. त्यामुळे दुसर्‍या दिवशीही हा सामना असाच पुढे चालू राहिला. आज तर प्रेक्षकांची अमाप गर्दी पाहून क्लबच्या हिरवळीवर खेळ सुरु झाला. त्या दिवशीही वाडिया हरले.पुन्हा पन्नास पौंड हरले तरी ते खेळण्याचा हट्ट सोडीनात. तेव्हा त्यांच्या पत्नीने बळजबरीने त्यांना क्लबमधून घरी नेले. अशा रीतीने पटेलांची जिरवण्याच्या नादात वाडियांचेच हसे झाले. आपला हेवा करणार्‍या सहका-यांवर न चिडता सरदार पटेलांनी आपल्या कर्तृत्वावर विसंबून खिलाडीपणे त्यांचे आव्हान स्वीकारले व त्याला पराभूत करुन आपला आत्मविश्वास किती प्रबळ आहे हे दाखवून दिले.

विवाह आणि अपत्ये :-

वल्लभभाई 16 वर्षांचे असताना त्यांचा झवेरबाईंशी 1891 मध्ये विवाह झाला.त्यांना मणिबेन ही कन्या आणि डाह्याभाई हे पुत्र.अशी अपत्ये झाली त्यानंतर जानेवारी 1909 मध्ये झवेरबाईंचे निधन झाले.

भारतीय जनतेचे नेते :-

महात्मा गांधीजींच्या सहवासात आल्यानंतर वल्लभभाईंनी आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग केला. बँरिस्टरचा धंदा. पैशांची कमाई आणि श्रीमंत राहणी हे सार सोडून ते अगदी साधे कष्टकरी लोकसेवक बनले. गोरे अधिकारी फिरतीवर जायचे तेव्हा त्यांच्या सरबराईचा सारा खर्च त्या त्या गावकर्‍यांना सक्तीने करावा लागत असे. त्यांचा सामान वाहून नेण्यासाठी खेळाडूंना विनामूल्य हमाली करावी लागे. त्या कामी कसूर झाली तरा ते अधिकारी खवळून जायचे आणि प्रसंगी त्या खेळाडूला मारहाण करीत, अशी ती वेठबिगारीची पध्दत बंद करण्यासाठी वल्लभभाईंनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने जोराची चळवळ केली. वल्लभभाईंनी कापड गिरण्यांमधील मजुरांची संघटना करुन त्यांच्यावर होणारे अन्याय दूर केले.दुष्काळात लोकांना खूप मदत केली.साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी सरकारला सहाय्य करण्यास भाग पाडले.वल्लभभाई जातीवंत शेतकरी होते. लहानपणी वडिलांबरोबर शेतामध्ये जाऊन विविध प्रकारच्या कामांची त्यांनी माहिती करुन घेतली होती. शेतकर्‍यांबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती आणि आपुलकीची भावना होती.

1917 साली खेडा जिल्ह्यात अतिवृष्टीने पिके बुडाली होती. पंचवीस टक्क्यांहून कमी उत्पादन झाले होते. प्रचलित कायद्यानुसार शेतसारा वसुलीत सरकारने सूट देणे आवश्यक होते. पण सरकारी अधिकार्‍यांंनी चुकीची आकडेवारी तयार करुन पंचवीस टक्क्याहून अधिक उत्पादन झाल्याचे आपल्या अहवालात नमूद केले होते. इंग्रज सरकारने शेतकर्‍यांना सारावसुलीच्या नोटीसा दिल्या. हातात पिक नाही तर शेतकरी शेतसारा कसा भरणार? शेतकरी हवालदिल झाले, ती परिस्थिती पाहून वल्लभभाई आणि त्यांच्या गुजरात सभेचे कार्यकर्ते गावोगाव फिरले. त्यांनी लोकांच्या सभा घेतल्या आणि काय वाटेल ते झाले तरी सारा न देण्याचा सल्ला त्यांनी खेडा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिला.

दूरदृष्टीचे व कुशल संघटक :-

पटेल कुशल प्रशासक असल्यामुळे व्यवस्थेचा मजबूत पाया त्यांनी घातला. त्यांनी सनदी सेवा उभी केली. मुलकी सेवा, पोलिस सेवा इत्यादींची निर्मिती केली. सनदी नोकरांनी राष्ट्रभक्तीचे आवाहन करुन त्यांच्याकडून उत्तम प्रकारे काम करुन घेतले. गृहमंत्र्यांची ही दुरदृष्टी सरदार अनेक क्षेत्रात यशस्वी ठरले होते. वल्लभभाई पटेलांनी आपल्या आयुष्याच्या तीन वर्षात तर अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या. हंगामी सरकारमध्ये गृह आणि माहिती खात्याचे मंत्री झाले. त्यावेळी वल्लभभाई एकाहत्तर वर्षाचे होते. उपपंतप्रधान म्हणून हाती सूत्रे घेतली त्यावेळी ते बहात्तर वर्षाचे होते. देशाच्या फाळणीपासून निर्मित झालेली समस्या आणि संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न यांची जबाबदारी त्यांच्यावर टकण्यात आली. 73-75 या वयात देशाचे विलीनिकरण करणे, प्रशासकीय आणि संघटनेचे जाळे मजबूत करणे, देशात शांतता प्रस्थापित करणे, प्रशासकीय आर्थिक आणि कायदेविषयक यंत्रणेस नवे रुप देणे या कार्यात ते मग्न राहिले. याच काळात पाचशेहून अधिक संस्थांना एक घटनेखाली एका ध्वजाखाली आणण्यात ते यशस्वी झाले.

कोणा राजकारणी अथवा राष्ट्र निर्मात्याने सत्तर वर्षाचे वयानंतर अखेरच्या तीन चार वर्षात इतके मोठे यश संपादन केल्याचे उदाहरण इतिहासात क्वचितच पहावयास मिळेल.त्यांचे जीवन महान कार्याने व्यापलेले होते.ह्या वयातच त्यांनाहृदयरोगाने ग्रासले होते. पोटाचा रोगही बळावत चालला होता.हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आजीव झुंज देणारा मेरा भारत महान असा महामंत्र जपणारा – तो महापुरुष – सरदार वल्लभभाई पटेल यांचे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी 15 डिसेंबर 1950 रोजी मुंबई येथे निधन झाले. बार्डोलीचे सरदार, गुजरातचे सिंह, भारताचे लोहपुरुष, भारताच्या स्वातंत्र्य समरातील सेनापती, भारताच्या एकतेचे शिल्पकार वल्लभभाई इहलोकातून गेले.1991 मध्ये भारत सरकारने भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कार देऊन वल्लभभाईंना सन्मानीत केले.सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या अत्यंत थोर व्यासंगी परमदेशभक्त आणि देशासाठी समर्पित जीवन जगलेल्या पूजनीय विभूतीला भारतरत्न पुरस्कार दिल्यामुळे या पुरस्काराचा सन्मान झालेला आहे. असे निश्चितपणे म्हणता येईल. अशा या लोहपुरुषाला मानाचा मुजरा..

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *