Saturday, April 27, 2024
Homeनाशिकशौर्यतीर्थ स्मारकामुळे राष्ट्रभक्तीची प्रेरणा : कृषीमंत्री भुसे

शौर्यतीर्थ स्मारकामुळे राष्ट्रभक्तीची प्रेरणा : कृषीमंत्री भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करणारे जवान खर्‍या अर्थाने देशसेवा करत आहेत. मातृभूमीच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी बलिदान देणार्‍या शहीद जवानांप्रती आदर व्यक्त करणारे हे शौर्यतीर्थ स्मारक Shauryatirtha memorial तरुणांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे ठरेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे Agriculture Minister Bhuse यांनी येथे बोलतांना केले.

- Advertisement -

शहराचे प्रवेशव्दार असलेल्या मोसमपुलावर मनपातर्फे साकारण्यात आलेला शौर्य तीर्थ स्मारकाचे उद्घाटन कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. महापौर ताहेरा शेख, माजी आ. शेख रशीद, मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, महिला बालकल्याण सभापती पुष्पा गंगावणे, माजी उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती माजी सभापती राजाराम जाधव, विनोद वाघ, सभागृह नेता असलम अन्सारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शौर्यतीर्थ स्मारकासाठी रणगाडा उपलब्ध करून दिल्याबद्दल खा.डॉ. सुभाष भामरे व स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनपाचे आभार मानत कृषिमंत्री भुसे पुढे म्हणाले, शहराच्या प्रवेशव्दारावर निर्माण झालेले हे शौर्यतीर्थ स्मारक शहराच्या नावलौकिकात भर घालणारे ठरेल. देशाच्या संरक्षणासाठी वेळप्रसंगी स्वत:च्या प्राणांचे बलिदान देणारे जवानांप्रती आदर व्यक्त करणारा हा स्मारक आहे. या स्मारकाचे सुशोभिकरण मनपातर्फे करण्यात आले आहे. मात्र या स्मारकाचे पावित्र्य ठेवण्याची जबाबदारी आता समस्त शहरवासियांवर राहणार असल्याचे भुसे यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करतांना माजी आ. शेख रशीद यांनी शौर्यतीर्थ स्मारक साकारण्यासाठी मनपातर्फे केले गेलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होणार होता. मात्र त्यांना तातडीने दिल्ली येथे जावे लागल्याने त्यांच्या संमतीने आज हा कार्यक्रम कृषिमंत्री भुसे यांच्या हस्ते संपन्न केला जात आहे. शहीद तीर्थ स्मारक देश रक्षणासाठी स्वत:चे बलिदान देणार्‍या जवानांप्रती आदर व्यक्त करणारे स्मारक असल्याचे शेख रशीद यांनी सांगितले.

स्मारकासाठी पाठपुरावा करणार्‍या जनाधिकार मंचचे नेविलकुमार तिवारी यांनी शहरातील तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातूनच सदर स्मारक उभारण्यात आले आहे. 1965 च्या भारत-पाकिस्तान युध्दात या 40 टन वजनाच्या टी 55 रशियन बनावटीच्या रणगाड्याने शौर्य गाजवले आहे. राजस्थानातील जैसलमेर येथे असलेला हा रणगाडा खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्यामुळे मालेगावास उपलब्ध होवू शकला असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास उपायुक्त राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, शहर अभियंता कैलास बच्छाव, उपअभियंता सचिन माळवाळ, नगरसचिव शाम बुरकूल, एस.टी. चौरे, महेश गांगुर्डे, प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, माजीसैनिक संघटनेचे पदाधिकारी दिलीप हिरे यांच्यासह माजीसैनिक अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहीद तीर्थ स्मारकाचे नेत्रदीपक रोषणाईव्दारे सुशोभीकरण करण्यात आले होते. स्मारक परिसरात भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महापौरांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन होताच उपस्थित नागरिकांनी भारत माता की जय घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या