Friday, April 26, 2024
Homeनाशिकजखमी बिबट्यांवर नाशिकमध्येच उपचार

जखमी बिबट्यांवर नाशिकमध्येच उपचार

नाशिक । प्रतिनिधी

जखमी वन्यप्राण्यांसह पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी नाशिकमध्ये अपंगालय व उपचार केंद्र उभारण्यास अखेर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात जखमी झालेले बिबटे, कोल्हे, तरस यासारख्या प्राण्यांना आता उपचारासाठी मुंबई, पुणे जिल्ह्यात नेण्याची धावपळ थांबणार आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत वन्यजीव अन्न व पाण्याच्या शोधात नागरी वस्तीत येतात. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वन्यजीवांचे शहराकडे आगमन हे मानवासह वन्यजीवांसाठी सुध्दा धोक्याची सूचना आहे. यातूनच वन्यजीवांचे रस्ते अपघातात मृत्यू, जखमी होणे, शिकार यासारखे प्रकार घडतात. या सर्व प्रकारांमुळे बर्‍याच येळेस वन्यजीवांना तत्काळ उपचाराची आवश्यकता भासते.

या परिस्थितीचा विचार करता नाशिकला वन्यप्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी अपंगालय व उपचार केंद्र उभारणे अत्यावश्यक होते. सन 1998 पासून नाशिक येथे वन्यप्राणी, पक्ष्यांसाठी अपंगालय व उपचार केंद्र उभारण्याकामी वनविभागाकडून प्रयत्न सुरु होते. त्यानुसार राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बलप्रमुख) जी. साईप्रकाश, नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक), नितीन गुदगे, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक येथे अपंगालय व उपचार केंद्र उभारणे शक्य झाले आहे.

पश्चिम विभाग, नाशिकचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांची संकल्पना व प्रयत्नातून अपंगालय व उपचार केंद्रासाठी प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) गणेश झोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) विवेक भदाणे यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सादर केला. जिल्हा नियोजन समितीकडून या कामास निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी दिली.

अडचणी थांबणार

जर, वन्यजीव प्राणी कायमचा अपंग झाला तर त्याचे संगोपनसुध्दा करावे लागते. अश्या वन्यप्राण्यांच्या पक्षांच्या उपचार व संगोपनाची सोय नाशिक महसूल विभागातील जिल्ह्यांमध्ये अस्तित्वात नसल्याने जखमी वन्यप्राण्यांना उपचार व संगोपनासाठी मुंबई व पुणे येथे पाठवावे लागत होते. त्यामुळे, जखमी वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणत त्रास सहन करावा लागत होता. तसेच, नायलॉन मांजामुळे जखमी होणारे पक्षी यांना वेळीच उपचार करणेकामी खूप अडचणी निर्माण होत होत्या. आता या अडचणी थांबणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या