इंदोरी फाटा बनले अवैध दारू विक्री केंद्र

jalgaon-digital
3 Min Read

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात सर्रास अवैध दारू जोरदारपणे सुरू आहे. या अवैध दारू विक्रीचे मुख्य केंद्र अकोले तालुक्यातील इंदोरी फाटा हे बनले आहे. राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादामुळे अकोले तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत. दरम्यान दोन्हीही विभागांच्या वरिष्ठांनी संबंधित दारू विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

अकोले हा आदिवासी दुर्गम, डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. पुरोगामी व डाव्या चळवळीचा वारसा लाभलेल्या या तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची सर्रास विक्री सुरू आहे. अनेक गोरगरिबांना या अवैध दारूमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अकोले शहरातील शाहूनगर परिसरात बनावट दारूमुळे अनेक जणांचे मृत्यू झाले आहेत. यासंदर्भात 15 ऑगस्ट रोजी दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी व अनेक विधवा महिलांसह सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही काळ ही अवैध दारू विक्री थांबविली. मात्र पुन्हा याच ठिकाणी राजरोसपणे खुलेआमपणे दारू विक्री सुरू झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस यांच्या कृपा आशीर्वादाशिवाय अशा प्रकारची अवैध दारू विक्री होणे शक्य नाही.

अकोले-राजूर रस्त्यावरील इंदोरी फाटा हे सध्या अवैध दारू विक्रीचे प्रमुख केंद्र बनले आहे. या ठिकाणाहून रात्री अपरात्री अनेक चार चाकी गाड्यांमधून अकोले तालुक्याच्या प्रवरा, आढळा, मुळा व आदिवासी विभागात दारू पोहोचवण्याची व्यवस्था केली जात आहे. संगमनेर शहरातून अकोल्यातील इंदोरी फाटा येथे खुशकीच्या मार्गाने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर देशी दारू आणली जाते.त्यानंतर अगदी व्यवस्थितपणे ही दारू खाली असलेल्या एजंटांमार्फत गावोगावी पोहोचते. इंदोरी फाटा येथे सकाळी सहा वाजेपासून ते रात्री दोन वाजेपर्यंत तुम्ही कधीही जा तुम्हाला त्याठिकाणी दारू अवश्य मिळणारच. त्यामुळे या परिसरात तळीराम भर सकाळी अन रात्री अपरात्री केव्हाही लेझीम खेळताना दिसून येतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस यंत्रणा या अवैध दारू विक्रेत्याला पाठीशी घालत असल्यामुळे या अवैध दारू विक्रेत्यांचे फावले जात आहे.

यापूर्वी दारूबंदी असलेल्या राजूर गावातून मोठ्या प्रमाणावर इतरत्र दारूचा साठा पुरवला जात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून राजूरची ओळख कमी झाली असून त्या जागी इंदोरी फाटा हे नव्याने नाव पुढे आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांनी या अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *