Thursday, April 25, 2024
Homeनगरअवाजवी बिले आकारणार्‍या 11 रूग्णालयांना वसुली नोटीस

अवाजवी बिले आकारणार्‍या 11 रूग्णालयांना वसुली नोटीस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले आकारून त्यांची लूट करणार्‍या

- Advertisement -

रुग्णालयांना चाप लावण्याचे काम नगरच्या महापालिकेने सुरू केले आहे. शहरातील बड्या मानल्या जाणार्‍या एकूण 11 हॉस्पिटलने रुग्णांकडून जादा आकारलेले 29 लाख 12 हजार 390 रुपये संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात सात दिवसांत जमा करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. या आदेशाने शहराच्या वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे महापालिकेला खासगी रुग्णालयांवर कारवाई करणे भाग पडले आहे. आता या रुग्णालयांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात पैसे जमा करण्याची सात दिवसांची मुदत दिली गेली असून, या कालावधीत हे पैसे जमा झाले नाही तर या रुग्णालयांवर साथरोग अधिनियम 1897 अन्वये कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

मागील मार्च महिन्यापासून करोनाचा प्रादूर्भाव जगभरात आहे. नगरमध्येही तब्बल 50 हजारांवर रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. अर्थात नियमित उपचाराने यातील सुमारे 95 टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनावर उपचारांसाठी सिव्हील व बुथ हॉस्पिटलमध्ये रुग्णांची व्यवस्था करण्यात आली होती, पण त्या काळात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने खासगी रुग्णालयांनाही अशा उपचारांची परवानगी देण्यात आली.

पण असे उपचार करताना खासगी रुग्णालयांनी रुग्णांची आर्थिक लूट केली, लाखो रुपयांची बिले त्यांच्याकडून वसूल केली जात असल्याची ओरड सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाने अवाजवी वैद्यकीय उपचार शुल्क आकारणी केलेल्या तक्रारींची तपासणी सुरू केली.

रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारीस्तरीय भरारी पथक समिती स्थापन करून वैद्यकीय बिलांची तपासणी करण्यात आली व त्यात आढळलेल्या त्रुटीनुसार संबंधित रुग्णालयांकडून जादा आकारण्यात आलेले पैसे वसूल करून संबंधित रुग्णांना देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने नगर शहरापुरती महापालिकेच्या आरोग्य विभागावर दिली आहे.

या जबाबदारीनुसार मनपाचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या आदेशानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी शहरातील 11 रुग्णालयांना आदेश दिले आहेत. सात दिवसांत जादा आकारलेली रक्कम संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यावर जमा करून त्याचे बँक स्टेटमेंट मनपाच्या आरोग्य विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. अशी कृती झाली नाही तर साथरोग अधिनियमानुसार संबंधित रुग्णालयांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, कोणत्या रुग्णालयाने किती रुग्णांची किती रक्कम परत करायची, याचा मुख्य आदेशात उल्लेख नाही. मात्र, रुग्णालयांना पैसे जमा करण्याबाबत दिलेल्या आदेशासमवेत संबंधित रुग्णांची नावे असलेली यादी व त्यांना परत द्यावयाची रक्कम यांचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख यांनीही खासगी रुग्णालयांकडून जादा आकारणी झालेले पैसे संबंधित रुग्णांना परत करण्याबाबत पाठपुरावा केला होता.

त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागानेही त्यांना तसेच मनसेच्या पदाधिकार्‍यांना पत्र देऊन शहरातील 11 रुग्णालयांना जादा आकारलेले 29 लाख रुपये रुग्णांना परत करण्याचे आदेश दिल्याची प्रत दिली आहे.

करोना रुग्णांना जादा बिले आकारणार्‍या शहरातील 11 रुग्णालयांना वसुली नोटिसा देण्यात आल्या आहेत. सध्या 11 रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दररोज वाढ होणार आहे. रुग्णालयाचा आकडा वाढणार आहे. त्यावर काम सुरू आहे.

– डॉ. अनिल बोरगे (मनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी)

- Advertisment -

ताज्या बातम्या