महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीला कुलूप लावले – विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे टीकास्त्र

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

अधिवेशनात सरकारची वसुली प्रकरणे बाहेर येऊ नयेत आणि सरकारचा चेहरा उघडा पडू नये म्हणून करोनाचे कारण देत सरकारने अधिवेशनापासून( Rainy session of the state legislature ) पळ काढत असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition leader Devendra Fadnavis ) यांनी रविवारी येथे केली.

अधिवेशनात लक्षवेधी सूचना, प्रश्नोत्तरे, अर्धा तास चर्चा घेण्यात येणार नाहीत. स्वीकृत झालेल्या प्रश्नांना लेखी उत्तरे देता आली असती. पण, ते सारे प्रश्न व्यपगत करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकही संसदीय आयुध वापरता येणार नाही, असा आदेश काढून सरकारने लोकशाहीला कुलूप लावल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. सभागृहात प्रश्न मांडू दिले नाही तर आम्ही जनतेत जाऊन प्रश्न मांडू, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका करत अधिवेशनात आक्रमक राहण्याचे संकेत दिले.

अधिवेशनात एकही संसदीय आयुध वापरता येणार नाही, असा आदेश काढण्यात आला आहे. मराठा, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे प्रश्न, धान घोटाळा, कोरोनाचा विषय, बारा बलुतेदार आदींचे कोणतेच प्रश्न मांडायचे नाही. भ्रष्टाचार मांडायचा नाही, याची व्यवस्था सरकारने केली असून हे सरकार विरोधी पक्ष आणि माध्यमांना तोंड द्यायला तयार नाही, असे फडणवीस म्हणाले.

ओबीसी आरक्षण प्रश्न देशात नाही तर केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे.ओबीसी आरक्षणासाठी केंद्राच्या नाही तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या डेटाची गरज आहे. पण ‘इकोसिस्टीम’ तेच ते सांगण्यात मग्न आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. उशीरा का होईना पण आता तेच काम राज्य सरकारने हाती घेतले असून हे उशिरा सूचलेले शहाणपण आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

शिवसेनेशी फक्त वैचारिक मतभेद

भाजपचे शिवसेनेशी कोणतेही शत्रूत्व नाही. आमच्यात केवळ मतभेद आहेत. आम्ही हातात हात घालून एकत्र निवडणूक लढलो, पण ते ज्यांच्या विरोधात निवडून त्यांचा हात त्यांनी हातात घेतला. त्यामुळे मतभेद झाले. आमचे बांधावरून भांडण नाही किंवा वैयक्तिक मतभेद नाहीत, असे सूचक विधान फडणवीस यांनी केले.

अध्यक्ष निवडीबाबत साशंकता

अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होईल किंवा कसे? याबाबत फडणवीस यांनी साशंकता व्यक्त केली. आघाडी एकत्र आहे आणि बहुमत आहे मग अध्यक्षपद रिक्त का ठेवता? हा आमचा सवाल आहे. सध्या आघाडीतील तीनही पक्षात विसंवाद आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असे चित्र दिसत नाही,असे फडणवीस म्हणाले.

यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे- पाटील आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *