Friday, April 26, 2024
Homeनगरमुुरूम व मातीचे बेकायदेशीर उत्खनन ; महसूलमंत्र्यांकडे तक्रार

मुुरूम व मातीचे बेकायदेशीर उत्खनन ; महसूलमंत्र्यांकडे तक्रार

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील निमज शिवारातील स्वातंत्र्य सैनिकास महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या जमिनीतून बेकायदेशिररित्या मुरूम व मातीचे उत्खनन तस्करांनी केले आहे. याबाबत जमीन मालकाने महसूलमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून केलेल्या तक्रारीवर आता कुठे स्थानिक महसूल प्रशासनाने जुजबी कारवाई केली आहे. सुमारे 6 हजार ब्रास मुरुम व मातीचे उत्खनन येथून झाल्याने जमिन नादुरुस्त झाली आहे. महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईत केवळ एक ढंपर जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली.

निमज येथे भगिरथीबाई मधुकर लोणारी व राजेंद्र मधुकर लोणारी यांच्या मालकीचे गट नंबर 35/6 मध्ये ख. 0.81 आर क्षेत्र आहे. सदर क्षेत्र हे स्वातंत्र्य सैनिकास महाराष्ट्र शासनाकडून मिळालेले आहे. याक्षेत्रामध्ये काहींनी गेल्या सहा महिन्यापासून बेकायदेशीररित्या मुरुम व मातीचे उत्खनन केले आहे. त्यामुळे सदर क्षेत्र हे निकामी झाले आहे. सदर लोकांना मुरुम व माती उचलण्यास मनाई केली असता ते दादागिरी करतात. तसेच सदर जमिनीच्या पूर्वेस गट नंबर 35/7 क्षेत्र 2 हेक्टर 7 आर. या महाराष्ट्र शासनाचे राखीव व वनजमिनीत देखील सदर इसमांनी मुरुम व मातीचे बेकायदेशीररित्या उत्खनन करुन तिची विक्री केली आहे.

- Advertisement -

आतापर्यंत सुमारे 2500 ते 3 हजार ब्रास मुरमाचे उत्खनन झाले आहेे. उत्खननाची कुठलीही परवानगी सदर इसमांनी घेतलेली नाही. याबाबत वारंवार स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सदर इसमांनी सदर ठिकाणी ब्लास्टींग करुन गावामध्ये व रोेडवरून जाणार्‍या व येणार्‍यास धोका निर्माण करत पर्यावरण कायद्याचे उलंघन केले आहे. सदर ठिकाणचे उत्खनन थांबविण्यात येवून सदर इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येवून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भगिरथीबाई लोणारी व राजेंद्र लोणारी यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे. याबाबतची तक्रार महसूलमंत्र्यांकडे गेल्याने स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले. गुरुवारी दुपारी 3 वाजता मंडलाधिकारी विवेक रासने व तलाठी श्री. मुळे यांनी सदर ठिकाणी जावून होेत असलेले उत्खनन थांबविले. सदर ठिकाणी 1 ढंपर सदर अधिकार्‍यांनी ताब्यात घेतला आहेे. तर उत्खनन केलेल्या क्षेत्राचा पंचनामा केला आहे. आतापर्यंत मुरुम व मातीचे सुमारे 6 हजार ब्रासचे उत्खनन सदर ठिकाणावरुन झाले असल्याचे पंचनामादरम्यान दिसून आले. याबाबतचा अहवाल मंडलाधिकारी व तलाठी यांनी तहसीलदारांना सादर केला आहेे. आता तहसीलदार या प्रकरणावर काय कार्यवाही करतील याकडे जमिन मालकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या