Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाICC World Cup : गाफील श्रीलंकेवर अफगाणचा विजय

ICC World Cup : गाफील श्रीलंकेवर अफगाणचा विजय

बलाढ्य संघावर विजय? धक्कादायक! दुसरा विजय? खळबळजनक! आणि अंडरडॉग म्हणविला जाणारा एखादा संघ स्पर्धेतला तिसरा विजय मिळवितो, तेव्हा? तो जय धक्कादायक नसतो किंवा चमत्कारही नसतो. अपयशाचं माप प्रतिस्पर्ध्याच्या पारड्यात टाकण्याआधी विजयाचं निखळ श्रेय त्या संघाला द्यायला हवं. अफगाणिस्तानने ते सोमवारी मिळवलं.

पुण्यातील लढतीत अफगाण संघाने श्रीलंकेवर सात गडी आणि 28 चेंडू राखून मात केली. धावा दाबून ठेवणारी गोलंदाजी आणि लक्ष्याचा पाठलाग पद्धतशीरपणे करणारी फलंदाजी ह्याच्या जिवावर अफगाणिस्तानने विजय मिळविला. महत्त्वाचं म्हणजे त्यांचा नायक असलेल्या राशिद खान ह्यानं फारशी चमकदार कामगिरी केलेली नसतानाही त्यांनी यशाला आपलंसं केलं. संघानं त्याच्या शंभराव्या एकदिवशीय सामन्यानिमित्त दिलेली ही अमूल्य भेट!

- Advertisement -

हशमतुल्ला शाहिदी ह्यानं नाणेफेक जिंकून श्रीलंकेला हवं तेच दिलं – फलंदाजी. चांगल्या धावांचं लक्ष्य अफगाणिस्तानपुढे ठेवायचं, असं श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडीस ह्याचं धोरण होतं. पाठलाग करताना शेवटच्या काही षट्कांमध्ये अफगाणिस्तानची घसरगुंडी उडते, हा अनुभव त्यामागे असावा. दिमुथ करुणारत्न लवकर बाद झाल्यावर दोन अर्धशतकी भागीदार्‍यांनी श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. सलामीवीर पथुम निशंक (46), कुशल मेंडीस (39) आणि भरवशाचा सदीर समीरविक्रम (36) ह्यांच्यापैकी कुणाचाही स्ट्राईक रेट शंभरच्या वर गेला नाही. मेंडीस आणि समीरविक्रम पाच धावांच्या अंतराने बाद झाले. त्या वेळी धावा होत्या 139 आणि 21 षट्कं बाकी होती. त्यानंतर श्रीलंकेची पडझड सुरू झाली. त्यांचे फलंदाज स्थिरावले असं वाटत असतानाच बाद झाले. अँजेलो मॅथ्यूज व महीश तीक्षण ह्यांनी थोडी-फार फटकेबाजी केली. अन्यथा संघाला सव्वादोनशेचीही मजल मारता आली नसती. डावातले दोन षट्कार ह्याच दोघांचे.

विश्वचषकातील पहिला सामना खेळणार्‍या फजलहक फारुकी ह्याचा डावखुरा तेज मारा खेळणं श्रीलंकेच्या फलंदाजांना अवघड गेलं. मागच्या महिन्यात तेविशी ओलांडलेल्या फारुकीनं महत्त्वाचे बळी मिळविले. त्याचं गोलंदाजीचं पृथःकरण होतं – 10-1-34-4. मुजीब उर रहमान ह्याने 38 धावा देऊन दोन गडी बाद केले. तुलनेनं राशिद महागडा ठरला. दहा षट्कांत 50 धावा देताना त्यानं धनंजय डीफसिल्व्हाचा त्रिफळा उडवला. पहिल्याच षट्कातल्या चौथ्या चेंडूवर दिलशान मधुशकं ह्यानं श्रीलंकेला यश मिळवून दिलं. ह्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणार्‍या रहमनुल्ला गुरबाज ह्याचा त्यानं त्रिफळा उडवला. हा धक्का पचवून अफगाण संघ पुढे जात राहिला.

दुसर्‍या जोडीसाठी इब्राहीम जदरान (39) व रहमत शहा (62) ह्यांनी 73 धावा जोडल्या. जदरानचाही बळी मधुशंकनं मिळविला. कर्णधार हशमत आणि रहमत ह्यांनी डाव पद्धतशीरपणे पुढे नेला. अठ्ठावन धावांच्या भागीदारीनंतर ही जोडी फुटली. त्या वेळी संघाला विजयासाठी 22 षट्कांमध्ये 111 धावांची गरज होती. श्रीलंकेला मिळालेलं हे शेवटचं यश. डावरा हशमत (74 चेंडूंमध्ये नाबाद 58, दोन चौकार व एक षट्कार) व उजव्या हातानं आक्रमक फलंदाजी करणारा अजमत उमरजाई (63 चेंडूंमध्ये 73) ह्यांनी कोणताही धोका पत्करला नाही. चांगल्या अवस्थेतून डाव कोसळणार नाही, ह्याची दक्षता त्यांनी घेतली. सहा चौकार आणि तीन षट्कार मारणार्‍या उमरजाईला कर्णधारानं शक्य तेव्हा खेळण्याची संधी दिली. ह्या दोघांच्या नाबाद शतकी भागीदारीने अफगाणिस्तानला तिसरा विजय मिळवून दिला. श्रीलंकेवरील ह्या विजयाने अफगाणिस्तान उपान्त्य फेरीच्या शर्यतीत येण्याची शक्यता वाढली आहे. आशियातील दुसर्‍या देशावरचा हा निर्विवाद विजय अफगाणिस्तानची ओळख बदलण्यास कारणीभूत ठरेल. दखलपात्र संघ ही त्याची नवी ओळख असेल.

_ सतीश स. कुलकर्णी

(मुक्त क्रीडा पत्रकार, [email protected])

- Advertisment -

ताज्या बातम्या