अवजड वाहनधारकांनो धुळे शहरात प्रवेश करण्यापुर्वी वाचा ही नियमावली… अन्यथा होऊ शकतो दंड

jalgaon-digital
3 Min Read

धुळे Dhule। प्रतिनिधी

धुळे शहरातील वाहतूक (Transportation) सुरळीत होवून वाहतूक कोंडी (Traffic jams) व अपघात (accidents) टाळण्यासाठी शहरात येणार्‍या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना (Heavy vehicle) वेळेचे बंधन घालण्यात आले आहे, असे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील (Superintendent of Police Praveen Kumar Patil) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी म्हटले आहे, महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार वाहतूक नियमनाबाबत प्राप्त अधिकारान्वये पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, धुळे यांच्या कार्यालयाकडील अहवालास अनुसरुन धुळे शहरतील माल वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे म्हणून सुधारित वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रायोगिक तत्वावर प्रसिध्द करण्यात आला होता. त्यानंतर लोकप्रतिनिधी, नागरिक, रहिवासी, व्यापारी, व्यवसायिकांचे निवेदन, सूचना, तक्रार अर्ज यांचा विचार करुन त्यांच्या अभिप्रायानुसार या जाहीरनाम्यात अंशतः बदल करून धुळे शहरातील वाहतूक सुरळीत होवून वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी शहरात येणार्‍या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना वेळेचे बंधन करण्यात आले आहे.

वाहतूक नियमनाची माहिती अशी : * इंदूरकडून येणार्‍या सर्व अवजड वाहनांना नगावबारी चौक, देवपूरपासून धुळे शहरात सकाळी आठ ते रात्री आठवाजेपर्यंत प्रवेशबंदी राहील. * साक्रीरोड सुरतकडून येणार्‍या अवजड वाहनांना कृष्णाई हॉटेल साक्री बायपास पासून धुळे शहरात सकाळी आठ ते रात्री आठवाजेपर्यंत प्रवेशबंदी राहील. * मुंबईकडून धुळे शहरात गुरुद्वाराकडून येणार्‍या अवजड वाहनांना नवीन कोरके नगरपर्यंत प्रवेश राहील. त्यापुढे सकाळी आठ ते रात्री आठवाजेपर्यंत प्रवेशबंदी राहील. * चाळीसगाव क्रॉस, 100 फुटी कॉर्नरपासून अवजड वाहनांना धुळे शहरात सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहील. *पारोळा चौफुली, कृषी महाविद्यालयापासून अवजड वाहनांना धुळे शहरात सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहील. * बिलाडी रोड, जुने धुळे पासून धुळे शहरात, वरखेडी रोड पासून धुळे शहरात, वडजाई रोडपासून धुळे शहरात, चितोड रोड पासून धुळे शहरात, गोंदूर रोडपासून धुळे शहरात व नकाणे रोडपासून धुळे शहरात येणार्‍या अवजड वाहनांना सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहील. * हा आदेश शासकीय वाहने, राज्य परिवहन महामंडळाच्या बस, स्कूल बसला लागू होणार नाही. * शहरात किराणा/भुसार/ इतर जीवनावश्यक वस्तू तसेच बांधकाम साहित्य पुरविणार्‍या वाहनांना दुपारी 12 ते चार या कालावधीत सवलत देण्यात आली आहे.

बंदीच्या वेळे व्यतिरिक्त अवजड वाहनांची वाहतूक नेहमी प्रमाणे राहील. या बदलाची वाहनधारक, मालक, नागरिकांनी नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन धारकांवर कारवाई करण्यात येईल असेही कळविले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *