नाशिक शहरात जोर’धार’

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये जोरदार पावसाने सायंकाळी सलामी दिली. अचानक आलेल्या पावसामुळे सायंकाळी चाकरमान्यांची मोठी तारांबळ आजच्या पावसाने उडवली. शहरात सर्वदूर पडलेल्या पावसाने सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना सुखद धक्काच पावसाने आज दिला.

तब्बल अर्धा ते पाऊण तास चाललेल्या मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले होते. तर सराफ बाजार परिसर, फुलबाजार, बालाजी मंदिर परिसरात पाणी साचले होते.

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. शहरासह अनेक भागात पाऊस झाला.

गंगापूर धरण जवळपास ९७ टक्क्यांपर्यंत भरले असून विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली तर पुन्हा एकदा गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात वादळी पावसामुळे पिके व फळबागांना फटका बसला आहे. अनेक शेतकर्‍यांनी कांदा भिजू नये यासाठी खबरदारी घेतली आहे.

शहरात बत्ती गुल

नाशिक शहरात पावसाचे आगमन झाले तर काही वेळातच बत्ती गुल होते असे अनेकदा म्हटले जाते. याचा प्रत्यक्ष अनुभव आज नाशिककरांनी घेतला. शहराचा मध्यवर्ती भाग संबोधल्या जाणाऱ्या एमजी रोडसह आजुबाजूच्या परिसरात पावसाचे आगमन होताच बत्ती गुल झाल्याने पुन्हा एकदा नाशिककरांनी आपला राग महावितरणवर काढलेला बघायला मिळाला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *