किराणा, औषधांची दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत  चालू ठेवावी – जिल्हाधिकारी सुरज मांढरे

नाशिक । प्रतिनिधी

काही किराणा दुकाने व औषधांची दुकाने लॉकडाऊनच्या काळात बंद असल्याने व त्यामुळे सध्या चालू असलेल्या अशा दुकानांवर विक्रीसाठी अतिरिक्त ताण पडत असल्याचे व त्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे,
यासाठी जिल्ह्यातील सर्व किराणा व औषध दुकानदारांनी त्यांची  दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीमध्ये चालू ठेवावी. तसेच आवश्यकतेनुसार सदर दुकाने २४ तास चालू ठेवण्यात यावी, असे आदेश आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.

या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २३ मार्च , २०२०  राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळितपणे व्हावा यासाठी  प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

या संदर्भात राज्य शासन व केंद्र शासनाने विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत . केंद्र शासनाच्या २४ मार्च २०२० च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये किराणा दुकाने तसेच औषध दुकाने लॉकडाऊनच्या काळात कार्यरत राहतील असे नमूद आहे.

त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू अधिनियम,१९५५ च्या तरतुदीनुसार अन्नधान्य व औषधे यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आलेला आहे.

असे असतानाही काही किराणा दुकाने व औषधांची दुकाने  लॉकडाऊनच्या काळात बंद असल्याचे व त्यामुळे सध्या चालू असलेल्या अशा दुकानांवर विक्रीसाठी अतिरिक्त ताण पडत असल्याचे व त्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या बाबी विचारात घेवून  राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

अन्नधान्याची विक्री किराणा दुकानांमधून तसेच औषधांची विक्री औषधांच्या दुकानांमधून करण्यात येते . या जीवनावश्यक वस्तूंचा जिल्ह्यातील  जनतेस सुरळीतपणे पुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्यातील  सर्व किराणा दुकाने व औषधांची दुकाने यांचे दुकानदार यांनी त्यांची किराणा दुकाने व औषधांची दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीमध्ये चालू ठेवावी. तसेच आवश्यकतेनुसार सदर दुकाने २४ तास चालू ठेवण्यात यावी.

हे आदेश जीवनावश्यक वस्तू अधिनियम , १९५५ च्या कलम ३ ( २ ) च्या तरतुदीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत. या  आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार किराणा दुकानांच्या बाबतीत पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक व त्यावरील अधिकारी आणि पोलीस तसेच औषध दुकानांच्या बाबतीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक व त्यावरील अधिकारी आणि पोलीस यांना राहतील असेही श्री.मांढरे यांनी सांगितले.

महानगर पालिका ,नियंत्रक (शिधावाटप),उपनियंत्रक (शिधावाटप),उप आयुक्त ( पुरवठा ), जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी यांनी हे आदेश त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व किराणा दुकानदार व औषध दुकानदार तसेच त्यांच्या संघटनाच्या निर्दशनास आणावे व त्यांच्या कार्यक्षेत्रातील किराणा दुकाने व औषधांची दुकाने वरील कालावधीत चालू राहतील याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी सुरज मांढरे  यांनी आपल्या निर्देशात म्हटले आहे.

अशी आहेत आदेशाची वैशिष्ट्ये

  • जिल्ह्यातील सर्व किराणा,औषधांची दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत व आवश्यकतेनुसार  २४ तास चालू ठेवण्यात येणार
  • काही किराणा दुकाने व औषधांची दुकाने लॉकडाऊनच्या काळात बंद असल्याने व त्यामुळे सध्या चालू असलेल्या अशा दुकानांवर विक्रीसाठी पडतोय अतिरिक्त ताण
  • केंद्र शासनाच्या २४ मार्च २०२० सूचनेनुसार किराणा दुकाने तसेच औषध दुकाने लॉकडाऊनच्या काळात कार्यरत राहतील.
  • जीवनावश्यक वस्तू अधिनियम,१९५५ च्या तरतुदीनुसार अन्नधान्य व औषधे यांचा समावेश
  • आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई
  • किराणा दुकानांवर पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक,त्यावरील अधिकारी,पोलीस कारवाई करणार
  • औषध दुकानांवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक, त्यावरील अधिकारी व पोलीस कारवाई करणार.