Saturday, April 27, 2024
Homeनगरगोदावरी दुथडी तर अकोलेत दाणादाण

गोदावरी दुथडी तर अकोलेत दाणादाण

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

धरणांच्या पाणलोटात काल धुव्वाधार पाऊस झाला. यामुळे आधीच फुल्ल भरलेल्या धरणातून काल विसर्ग वाढविण्यात आले आहेत. दारणाच्या भिंतीजवळ काल सकाळी 6 पर्यंत 175 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वच धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असलेल्या पाण्यामुळे काल गोदावरीत 31283 क्युसेक इतका विसर्ग करण्यात येत होता.

- Advertisement -

या पावसाने बंद असलेल्या धरणांचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. गंगापूर धरणाचे दरवाजे बंद होते. काल या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. या धरणातून 5884 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येऊ लागला. दारणातून 8524 क्युसेकने, कडवातून 4220 क्युसेक, वालदेवीतून 407 क्युसेक, आळंदीतून 210 क्युसेक, भोजापूर मधुन 3770 क्युसेक, तर पालखेड मधुन 1696 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात गोदावरीत 31283 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. त्यामुळे गोदावरी पुन्हा दुथडी वाहु लागली.

काल सकाळी नोंदलेला धरणक्षेत्रातील पाऊस असा- दारणा 175 मिमी, इगतपूरी 80मिमी, भावली 99 मिमी, मुकणे 98 मिमी, गंगापूर 80 मिमी, कश्यपी 71 मिमी, कडवा 146 मिमी, त्र्यंबक 71 मिमी, अंबोली 76 मिमी, असा पाउस नोंदला गेला. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील पाऊस असा- ब्राम्हणगाव 36 मिमी, कोपरगाव 69 मिमी, पढेगाव 7 मिमी, सोमठाणा 76 मिमी, कोळगाव 76 मिमी, सोनेवाडी 106 मिमी, शिर्डी 100 मिमी, राहाता 112 मिमी, रांजणगाव 107 मिमी, चितळी 90 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

दरम्यान नाशिक, नगर, तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पावसाने गोदावरीत पाण्याची आवक वाढल्याने जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 27140 क्युसेक ने पाण्याची आवक होत होती. त्यामुळे जायकवाडीतुन 28 हजार 296 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. यासाठी जायकवाडी जलाशयाचे 18 दरवाजे 6 वाजता दीड फुटाने उचलण्यात येऊन त्यातून 28 हजार 296 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता.

अकोलेत दाणादाण

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले शहराला बुधवारी सायंकाळनंतर अतिवृष्टीचा तडाखा बसला. रात्रभरात विक्रमी 166 मिमी पावसाची नोंद झाली. रस्त्यावरून थोड्याच वेळात पाण्याचे लोट वाहू लागले. धो धो पडलेल्या या पावसाचे पाणी अकोले-संगमनेर रस्त्यावरील महात्मा फुले चौक ते कोतुळेश्वर गॅरेजपर्यंतच्या तळ मजल्यातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक गाळ्यांत शिरले. व्यापारी रात्रभर गाळ्यांत शिरलेले पाणी उपसत होते.

अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे व्यापार्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संतप्त झालेल्या व्यापार्‍यांनी काल गुरुवारी रास्तारोको करून प्रशासनाबद्दलचा राग व्यक्त केला. बाजारच्या दिवशी अचानक झालेल्या रस्ता रोको मुळे प्रशासनाची धावपळ उडाली. पूर परिस्थिती सुरळीत करण्यासाठी नगरपंचायतीचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

बुधवारी दिवसभर कडक ऊन पडले होते. असह्य उकाडा जाणवत होता. सायंकाळी वातावरण अचानक बदलले आणि पावसास सुरवात झाली. पहाता पहाता पावसाचा जोर वाढला. कुठे दोन तर कुठे तीन चार तास मुसळधार पाऊस पडला. तालुक्याच्या पूर्व भागास पावसाने झोडपून काढले. अकोले शहरात साडेपाच इंचापेक्षा अधिक म्हणजे 166 मिमी पाऊस पडला. देवठाण येथील आढळा धरणावर तब्बल 170 मिमी पाऊस पडला. संपूर्ण पावसाळ्यात पडला त्याच्या जवळपास निम्मा पाऊस बुधवारी एका दिवसात पडला. निळवंडे धरणावरही 153 मिमी पावसाची नोंद झाली. तुलनेने पाणलोट क्षेत्रात कमी म्हणजे भंडारदरा 43, घाटघर 47, पांजरे 57, रतनवाडी 53 आणि वाकी 37 मिमी असा पाऊस पडला. मात्र या पावसाने पश्चिम भागातील भात व अन्य खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अकोले शहरात गेले अनेक वर्षे पडला नाही असा पाऊस मागील 24 तासात पडला. अवघ्या तीन साडेतीन तासात पडलेल्या या पावसाने शहराच्या रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. महालक्ष्मी मंदिर ते महात्मा फुले चौक या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. महात्मा फुले चौकापासून कोतुळेश्वर गॅरेज पर्यंतचा रस्ता काही काळ पाण्याखाली गेला होता. या भागात रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या टपर्‍या, गाळे, दुकाने यात पाणी शिरले.

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील दुकानदारांना हा प्रश्न भेडसावत आहे. ही माहिती समजताच अकोले नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, आरोग्य सभापती शरद नवले, नगरसेवक आरिफ शेख, नवनाथ शेटे, नगरसेविका शितल वैद्य, माजी नगरसेवक परशुराम शेळके, भाजपचे नेते बबलू धुमाळ, शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन नाईकवाडी, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, आरोग्य विभागाचे राहुल मंडलिक, समाधान गांगुर्डे, अण्णासाहेब वाकचौरे व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. भर पावसात जेसेबीच्या साहाय्याने कर्मचारी पाणी काढून देत होते, त्यामुळे रस्त्यावरील पाण्याची पातळी हळुहळू कमी होत गेली.

नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, आरोग्य सभापती शरद नवले, पाणीपुरवठा सभापती हितेश कुंभार, तसेच अनेक नगरसेवक, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते.

बुधवारी रात्रीपासून वीज गायब होती. 132 केव्ही वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. 24 तासानंतर वीजपुरवठा सुरू झाला होता मात्र अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत होता.

दरम्यान संतप्त झालेल्या दुकानदारांनी काल सकाळी 11 वाजेच्या सुमारास महात्मा फुले कारखाना चौक येथे अचानक रास्ता रोको सुरु केला. आठवडे बाजार असल्याने शहरात गर्दी असते त्यामूळे वाहतुक जाम झाली. पोलिस तातडीने आंदोलनस्थळी दाखल झाले परंतू आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिस व आंदोलकांची बाचा-बाची झाली. दुकानदार यांनी तातडीने गटारी फोडून द्या, पाणी काढून द्या, अनेक वेळा अकोले नगर पालिका प्रशासनाला सांगून ही तसेच सार्वजनीक बांधकाम विभागाला सांगून देखील दखल घेतली गेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात हा प्रश्न निर्माण होतो यावर तातडीने उपाय योजना करा. कायम स्वरुपी हा प्रश्न निकाली काढा. रात्रभर आम्ही जागे होतो. कुठे गेली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा? आज प्रत्येक प्रश्नाचे राजकारण सुरु आहे. त्याचे आम्हाला घेणे देणे नाही, आमचा प्रश्न सोडवा अन्यथा आम्ही हलणार नाही, अशी भुमिका दुकानदार आंदोलकांनी घेतल्याने वातवरण तापले होते. एवढ्यात अकोले पोलिस ठाण्याचे सहा. पो. नि. मिथुन घुगे चौकात पोलिस फाटा घेऊन दाखल झाले. त्यांनी गाडीतून खाली उतरताच आंदोलकांना रस्त्यांवरुन पहिले हटविले. आंदोलक यांना चर्चा करण्याची विनंती केली. आंदोलक महालक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन सचिन शिंदे, वकील नवाज खतीब, माजी नगरसेवक परशराम शेळके, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सचिन देशमुख, व्यापारी रफिक पठाण, जगन येलमामे, शगीर पठाण, इसुब पठाण, फिरोज खतीब, उबेद शेख, सोहेल शेख, नागेश कुलकर्णी, आनंदा शेळके, राजेश गुरुकुले, गरसेवक नवनाथ शेटे, आरिफ शेख, माजी नगरसेवक सचिन शेटे, भाजपचे युवा नेते बबलू धुमाळ, मनसेचे तालुका अध्यक्ष दत्ता नवले, शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन नाईकवाडी आदींशी चर्चा केल्यावर सहा.पोलीस निरीक्षक घुगे यांनी नगरपंचायतीचे मुख्यधिकारी विक्रम जगदाळे व सार्वजनीक बांधकामचे अधिकारी श्री. शेळके यांना तातडीने बोलावून घेतले. ते आल्यावर त्यांच्याशी चर्चा झाल्यावर तातडीने जेसीबी ने पाणी काढून देण्यास सुरवात झाली. तेव्हा अकोले च्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी याही तेथे आल्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेश गडाख, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे आदि उपस्थित होते.

दरम्यान 1 वाजेच्या सुमारास आमदार डॉ. किरण लहामटे यांनी परिस्थितीची पाहणी केली व यावर कायम स्वरुपी उपाय योजना करण्याचे दृष्टीने प्रयत्न करु असे सांगत आज तातडीने गटारी उकरुन पाणी काढून द्या. अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.तर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या