Thursday, April 25, 2024
Homeनगरगोदाकाठच्या पूररेषेतील 9 गावांतील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा - आ. कानडे

गोदाकाठच्या पूररेषेतील 9 गावांतील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा – आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या पूररेषेतील 9 गावांतील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, तसेच गायरान व गावठाण मधील जागा शासन निर्णयानुसार त्वरीत नियमानुकूल करावी, अशी सूचना आ. लहु कानडे यांनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना केली.

- Advertisement -

तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत आ. कानडे यांनी याबाबत चर्चा केली. गोदाकाठच्या 9 गावांत सन 1974 ला पूररेषा निश्चित केली गेली. त्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय अद्याप झालेला नाही. प्रत्येक गावात सुमारे 30 ते 40 एकर जमीन खरेदी करण्यात आली, मात्र या जमिनीचे वाटप अजूनही झाले नाही. जुन्या जागेत त्यांना बसू दिले जात नाही तर नव्या जागेचे वाटप केले जात नाही. त्यामुळे या गावातील लाभार्थी यापासून वंचित आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आपण नदीपात्रातील पाण्यात उभे राहून आंदोलन करू, असे आ. कानडे म्हणाले.

तालुक्यातील नाऊर तसेच इतर गावांतील गावठाण अतिक्रमण धारकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्याची पाहणी करून ती जागा नियमानुकूल करण्याचे आदेश दिले. गायरान व गावठाण मधील अतिक्रमीत जागा या शासनाच्या 2005, 2012 व 2018 च्या शासन निर्णयाप्रमाणे त्वरित नियमानुकूल करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार प्रदत्त समिती नेमून प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी पाहणी करून अतिक्रमीत जागा नियमानुकूल करण्याची सूचना त्यांनी केली. टाकळीभान येथे सरकारी जागेत झालेला गोंधळाप्रकारणी त्वरीत कारवाई करावी, अन्यथा आपण स्वःत अधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू, असा इशारा आ. कानडे यांनी दिला.

यावेळी माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी तालुक्यातील सर्व गावांचा अतिवृष्टी मदतीत समावेश करण्याची तसेच ज्यांची नावे आली नाहीत, त्यांनाही मदत देण्याची मागणी केली. ती तहसीलदार वाघ यांनी मान्य केली. यावेळी सतीश बोर्डे, राजेंद्र कोकणे, कार्लस साठे, गोपाल जोशी, सुरेश पवार, आबा पवार, हरिभाऊ बनसोडे, आशिष शिंदे, सरपंच डॉ. रा. ना. राशिनकर, राजेंद्र औताडे, अजिंक्य उंडे, अशोक पवार, दिनकर बनसोडे, जालिंदर दानी, युनूस पटेल, प्रताप देसाई यांच्यासह घरकुल लाभार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या