महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पूर्व गोदाकाठ परिसरात जोरदार सलामी

jalgaon-digital
1 Min Read

माळवाडगाव |वार्ताहर| Malwadgav

पहिल्या मृग नक्षत्रापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रही कोरडेच निघून चालले असताना पुनर्वसु नक्षत्राच्या पूर्वसंध्येला जाता जाता आर्द्रा नक्षत्राने श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व गोदाकाठ परिसरात तब्बल एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर काल दुपारी ढगांच्या कडकडाटात जोरदार सलामी दिली. शेत शिवारातून खळखळ पाणी वाहू लागल्याने ठराविक गावातील शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

वैजापूर-श्रीरामपूर तालुका हद्द समजल्या जाणार्‍या गोदावरी नदी पलिकडील वैजापूर पट्ट्यात मंगळवारी सर्वदूर जोरदार पाऊस झालेला असताना. आज आपल्याकडे नक्की येईल या प्रतिक्षेत गोदाकाठावरील गावोगावचे शेतकरी होते. हा अंदाज खरा ठरल्याने शेतकर्‍यांच्या आनंदास पारावार उरला नाही. खरिपातील सोयाबीन, मका, बाजरीची अद्याप पेरणी झालेली नव्हती. पाणयाची सोय असणार्‍या शेतामध्ये अवघ्या 10 टक्के क्षेत्रात कपाशी लागवड झाली होती. आता कपाशी पाठोपाठ सोयाबीन, मका पेरणी निश्चित होणार आहे.

आर्द्रा नक्षत्राच्या अखेरच्या दिवशीच्या या हंगामातील पहिल्याच पावसाने मागील कसर काढली. वादळ वार्‍याविना ढगांच्या जोरदार कडकडाटात बरसलेल्या पावसात कुठेही वीज कोसळल्याची अथवा नुकसानीची घटना घडली नाही.

खानापूर, भामाठाण, कमालपूर शिवारात सर्वाधिक पाऊस

दुपारी तीनच्या सुमारास माळवाडगाव, मुठेवाडगाव, खानापूर भामाठाण, कमालपूर, घुमनदेवसह वैजापूर तालुक्यातील बाजाठाण, देवगाव शिवारात जोरदार पाऊस झाला. सराला गोवर्धन, माळेवाडी, महाकांळवाडगाव शिवारात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. भामाठाण, कमालपूर शिवारात सर्वाधिक पाऊस पडला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *