Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगावचे वैभव : पुरातन महादेव मंदिर

मालेगावचे वैभव : पुरातन महादेव मंदिर

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

मालेगांव शहरातील ( Malegaon City ) काही वास्तू-स्थळांना ऐतिहासिक व प्राचीन वारसा लाभलेला आहे. त्यात मालेगांव भागाचे राजे श्रीमंत सरदार नारोशंकर राजेबहादूर यांच्या कतृत्वाने निर्मित मालेगांवचा भुईकोट किल्ला व त्यालगत असलेले श्री महादेव मंदिर, श्री किल्ला हनुमान मंदिर, वावीकरांचे श्री निळकंठेश्वर मंदिर, सटवाजी बुवा यांचे श्री विठ्ठल मंदिर, श्री रामसेतू हनुमान मंदिर, शिंपी समाजाचे शनीमंदिर लगतच श्री सत्यनारायण मंदिर असा हा धार्मिकदृष्ट्या समृद्ध परिसर आहे.

- Advertisement -

साधारणपणे किल्ला बांधताना मोसमनदी पात्रात मधोमध श्री महादेव मंदिर ( Shri Mahadev Mandir- Malegaon )निर्माण केले गेले आहे. सदर मंदिर काळ्या पाषाणातून साकारलेले आहे. भक्कम दगडी पाया व चिरेबंदी, त्यावर तिन फूट रुंदीच्या दगडी भिंती असे हेमाडपंती शैलीतील विटा व चुण्यात बांधलेले सुबक कळसयुक्त मंदिर बघताच नजरेत भरते. भव्यता आणि दिव्यतेमुळे आपोआपच भाविक नतमस्तक होतात.

संपूर्ण पंचक्रोशीत या मंदिराला तोड नाही. मंदिराचे स्वरूप म्हणजे मुख्य गाभारा, ज्यात भव्य अशी शंकराची पिंड आहे. गाभार्‍यात दुर्गादेवीची सिंहारुढ मूर्ती नंतर बसविण्यात आली आहे. दुसरे नंदी सभागृह आहे. तेथे श्री गणेशाची शेंदुर चर्चीत भव्य पाच फूट उंचीची दगडी मूर्ती भाविकांना आशीर्वाद देत असते.

काळ्या पाषाणातील भव्य नंदीची मूर्ती साधारणपणे शिवलिंगासमोर सरळ रेषेत असलेली! ध्यानमग्न अवस्तेतील मुद्रा असलेली नंदीचा मुर्ती, नागांचे स्वतंत्र छोटेखानी दगडी मंदिर तसेच कासव व द्वारपालांच्या दगडी मूर्ती, मंदिराबाहेर महाबली हनुमानाची गदाधारी शेंदूर चर्चीत वीरमुद्रा असलेली मूर्ती व मंदिर.

मंदिराच्या भोवतालचा परिसर हा घडीव दगडी बांधकामाचा असून मोसमनदी किनारी दगडी घाट व पायर्‍या बांधलेल्या आहेत. मंदिराबाहेर तुळशी वृंदावन व एक भुयार आहे. राजपरिवारासंबंधीत काही समाधीसुद्धा आहेत. शहरीकरणाच्या विस्तारापूर्वी सदर घाटावर भाविक व जनता पिण्याचे पाणी भरण्यासह अंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी येथेच येत असत.

मंदिर व्यवस्थापनासाठी गुरव परिवाराला पाचारण केलेले होते. त्यांना उदरनिर्वाहासाठी घरे व शेतजमीनी उपलब्ध करून दिलेल्या होत्या. येथे श्रावणी सोमवार, महाशिवरात्री, हरी-हरभेट इत्यादी उत्सवात भाविकांची मोठी मांदियाळी असे. सदर मंदिरात आतापर्यंत असंख्य रूद्रपूजा, अभिषेक, होमहवन व आरत्या होऊन शिवलींग अत्यंत पावन व जागृत झालेले आहे. येथे भाविकांची निस्सीम व अढळ श्रद्धा आहे. असे वैभवशाली परंपरा असलेले मंदिर व परिसर कालांतराने काही प्रासंगिक व नैसर्गिक कारणांमुळे दुर्लक्षित झाले. अनेक पूर तसेच 1979 चा महापूर सुद्धा मंदिराने सहन केला.

गेले पावणे तीनशे वर्ष ऊन, वारा, पावसाचे आघात झेलून मंदिर व परिसराची दुरावस्था झाली होती. मंदिराचे दगड सुद्धा तुटून चोरीला गेले होते. परिसराला अतिक्रमणांचा विळखा पडला होता. लोक परिसरात प्रात:विधी व गैरकृत्य करू लागल्यामुळे मंदिर बरीच वर्षे बंद राहू लागले. अधून-मधून उत्सवापुरते उघडले जात. मंदिराच्या वरच्या बाजूला शवविच्छेदनगृह होते. त्यामुळे भाविकांना परिसरात येण्याची भिती वाटे. काही वर्षांपूर्वी शहरातील व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंदिरात पुनश्च नित्य आरती, पूजापाठ सुरू केले. मंदिर व परिसराची देखभाल, पूजाअर्चा, उत्सव साजरे करून शहरातील भाविकांना मंदिराकडे आकृष्ट केले.

भाविकांनी एकत्र येऊन दैनंदिन पूजाअर्चा व उत्सव साजरे करण्यास हातभार लावत मंदिराची देखभाल, जीर्णोद्धार, उत्सव साजरे करणे व उदभवलेल्या समस्यांचे निस्तरीकरण आदी कार्य स्वखुषीने आपल्या खांद्यावर घेतले. नंतरच्या काळात पंकज रामेश्वर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली भाविकांची श्री महादेव सेवा समिती स्थापन झाली. त्यावेळी अनिल मोरे, सुनील मोराणकर, संजय जगताप, अनिल परदेशी, वसंत श्रीवास्तव, भिका साखरे, कैलास सोनवणे, मिलींद गवांदे, रमेश मंडाळे, सचिन जाधव, संतोष जाधव, नारायण गवळी, रणजीत भाटी, खेमचंद तलरेजा, राकेश पगारे, प्रसन्न शिनकार, गजानन शिरसाठ आदी अनेक कार्यकर्त्यांचे तन, मन, धनाने सहकार्य लाभले. सोबतच समितीच्या स्थापनेपुर्वीच्या ज्येष्ठ सदस्यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळत होते.

समितीने आत्तापर्यंत भाविकांच्या सहकार्याने मंदिराचा आतुन व बाहेरुन संपूर्ण जीर्णोद्धार केला असून मुळ रचनेला कुठलाही धक्का न लावता प्राचीन वास्तूकला जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.

महादेवाच्या पिंडीला सुद्धा वेळोवेळी डागडूजी करून आधी तांब्याचे कवच आणि सध्या पितळी कवच चढवण्यात आले आहे. बाहेरुन सुद्धा कळसाचे जीर्ण झालेले प्लास्टर काढून मुळ रचनेतच नवीन प्लॉस्टर व रंगरंगोटी झाली आहे. लोकप्रतिनिधी दीपक भोसले व अ‍ॅड. ज्योती भोसले, राजेश गंगावणे, ताराबाई शिरसाठ, चिंतामण पगारे, मच्छिंद्र अहिरे आदींनी नगरसेवक निधी देऊन परिसराला वॉल कंपाउंड व तार कंपाउंडने संरक्षित करण्यास सहकार्य केले. तरीही थोडे काम शिल्लक आहे. त्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले असून नगरसेविका दीपाली विवेक वारुळे यांचे सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मंत्री दादा भुसे यांनी शोभिवंत लाईट, स्ट्रीटलाईट उभारून दिले. तसेच नगरसेविका वारुळे यांनी प्रयत्न करून सभोवताली पेव्हरब्लॉक व मंदिराच्या पाठीमागे माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना पाठपुरावा करून काँक्रीटीकरण करून दिले आहे. इतर नगरसेवकानी इलेंट्रीक पोल, बाकडे इत्यादि देऊन सहकार्य केले आहे. माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांनी मंदिरासाठी बोअरवेल करून दिली आहे.

नदीविकास आराखड्यात संगमेश्वर ते महादेव मंदिर असा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. उत्सव व विविध उपक्रमांसाठी मुळ मंदिराची जागा अपुरी पडत असल्यामुळे मंदिराचा चहूबाजूंनी विस्तार करण्याचे समितीने काम हाती घेतले आहे. मंदिरच्या समोर जोडूनच एकसंघ सभामंडप व इतर बाजूंनी वाढवून विस्तारीत कार्य स्ट्रक्चरवर छतापर्यंतची उभारणी लोकसहभागातून केली आहे. ंकृषीमंत्री भुसे यांच्याकडून सुद्धा सुशोभिकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

राजेबहादूर परिवाराकडून वेळोवेळी सहकार्य प्राप्त होत असते. सध्या वर्षभरात श्रीमहाशिवरात्री उत्सव, श्रावण महिना, श्री हरिहर भेट उत्सव आदी साजरे केले जातात. तसेच नित्य आरती, अनुषंगिक धार्मिक परंपरा जतन केल्या जातात. समिती स्थापण्यासोबतच जयशंकर भजनी मंडळाची देखील स्थापना केली गेली आहे. भजनी मंडळाद्वारे दरसोमवारी रात्री दोन तास भजन केले जाते. प्रसंगानुरूप विविध आमंत्रणावरून अनेक ठिकाणी भजनाचा कार्यक्रम केला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या