Wednesday, April 24, 2024
Homeनगरमुलीला भूतबाधा झाल्याचे सांगत कुटुंबाची फसवणूक

मुलीला भूतबाधा झाल्याचे सांगत कुटुंबाची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीच्या अंगातील भूत काढून देण्यासाठी होमा समोर कोंबडी कापून भूतबाधा काढण्यासाठीचा अंधश्रद्धेचा प्रकार घडला आहे. ही भूतबाधा काढण्यासाठी आठ हजार रूपये घेतले, तसेच आपली अंधश्रद्धेच्या नावाखाली लूट झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रादारांनी पैसे परत मागितले असता त्यांना मारहाण करण्यात आली.

- Advertisement -

अहमदनगर शहराच्या सावेडी उपनगरातील वैदूवाडीमध्ये 18 नोव्हेंबर 2021 च्या रात्री घडलेल्या या घटनेची फिर्याद मंगळवार, 7 डिसेंबरला तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश धनगर, आरती अविनाश धनगर (रा. वैदूवाडी, भिस्तबाग चौक), एक अनोळखी पुरूष (नाव, पत्ता माहिती नाही) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अविनाश धनगर व आरती धनगर यांना अटक केली आहे. त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता दोघांना 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या आईने आपली मुलगी सारखी फाशी घेण्याचा प्रयत्न करते, म्हणून तीला आरोपींकडे नेले. तेंव्हा आरोपींनी मुलीच्या अंगात एका फाशी घेतलेल्या मुलीची भूतबाधा झाली असल्याचे सांगितले. त्यावर तोडगा म्हणून होम करून कोंबडी कापण्यात आली, तसेच यासाठी आठ हजार रुपये घेण्यात आले. विधी करण्यासाठी एका मांत्रिकाला आणण्यात आले होते. यानंतर आरोपींनी आता तुमच्या मुलीच्या अंगातील भूतबाधा नष्ट झाल्याचे सांगितले. याबाबत अंधश्रद्धेच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी मुलीच्या आईने आरोपींकडे दिलेले पैसे परत मागितले असता त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या