कचरा डेपोसाठी मनपा पर्यायी जागा शोधणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करारानुसार प्राथमिक सुविधा उपलब्ध न केल्याने बुरूडगावच्या ग्रामसभेत महापालिकेला शहरातील कचरा बुरूडगाव डेपोत टाकू न देण्याचा, त्यासाठी दिलेली ‘ना हरकत’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातून संकलित होणार्‍या कचर्‍यासाठी महापालिकेकडून बुरूडगाव डेपो ऐवजी पर्यायी जागेचा शोध सुरू झाला आहे. आगामी महासभेत पर्यायी जागेचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे यांनी नुकतीच बुरूडगाव ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी महापौर व आयुक्तांनी कचरा डेपोसाठी पर्यायी जागा शोधण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, स्थायीचे सभापती अविनाश घुले, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम आदी उपस्थित होते. संपूर्ण शहराचा कचरा बुरूडगाव डेपोमध्ये आणला जातो.

त्यामुळे दुर्गंधी पसरते. शहरातील संपूर्ण कचरा बुरूडगावमध्ये न टाकता पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशाराही ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे. दरम्यान बुरूडगाव ग्रामपंचायत हद्दीतील भूखंडावरील कचरा डेपोमध्ये कचरा टाकू देण्याच्या बदल्यात महापालिकेकडून बुरूडगावला टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, नगर शहरातून बुरूडगावकडे जाणार्‍या रस्त्याची दुरूस्ती केली जाईल, त्यावर पथदिवे उभारले जातील, वृक्षारोपण करून सुशोभीकरण केले जाईल, अशी हमी महापौर व आयुक्तांनी पुन्हा दिली आहे.

पाण्यासाठी चाचणी घेतली; पण पाईपच गायब

आश्वासनानुसार बुरूडगावला महापालिकेच्या जलवाहिनीतून पाणी देण्यासाठी चाचणी घेण्यात आली. मात्र सीना नदीजवळ पाईपच नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाण्यासाठी बुरूडगावकरांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. बुरुडगावचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने महापालिकेकडे करण्यात आली आहे. चाचणीदरम्यान सीना नदीजवळ पाईपच नसल्याचे समोर आले. आता तातडीने पाईपची दुरुस्ती करून हा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश मनपाच्या अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *