Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरबाप्पालाही महागाईच्या झळा...

बाप्पालाही महागाईच्या झळा…

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

गणपती बाप्पांचे आगमन अवघे चार दिवसांवर आले असताना तालुक्यातील गणेशमूर्तींच्या कारखान्यांत मूर्तींवर अखेरचा हात फिरवून त्यांचे स्वरूप सर्वांगसुंदर करण्याची धांदल उडाली आहे. शाडूची माती, रंग, प्लॅस्टर आफ पॅरिस आदी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या किमतीही 10 टक्के वाढल्या आहेत.

- Advertisement -

गणेश चतुर्थीच्या महिनाभर आधीच मूर्तीच्या बुकिंगला सुरुवात होते. मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे. गणेश मंडळांबरोबर आता घरगुती गणपतींसाठीही नाविन्यपूर्ण मूर्तींना वाढती मागणी आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भागांतून शाडूच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शाडूच्या मूर्तींच्या किमतीत झालेली वाढ तसेच त्या हाताळण्यास नाजूक असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मात्र अजूनही प्लॅस्टर आफ पॅरिसच्या मूर्तींनाच मागणी असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली.

मूर्तीसाठी वापरल्या जाणार्‍या सोनेरी, चंदेरी रंगाच्या किमती देखील 10 टक्के वाढल्या आहेत. गाजलेले चित्रपट, पौराणिक मालिकांमधील नावाजलेल्या पात्रांच्या रूपांत मूर्ती तयार करून देण्याची मागणी मूर्तिकारांकडे केली जाते. अशा भाविकांनी सहा महिने अगोदर बुकिंग केले आहे. लालबागचा राजा, राम मंदिर गणपती, दगडूशेठ गणपती, विठ्ठल गणपती, अष्टविनायक, बैल गाडी शर्यत, टिटवाळा गणपती, अशा मूर्तींना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

कोपरगाव येथील सुकदेव चव्हाण, गणेश चव्हाण, संदीप चव्हाण यांच्या गणपतींच्या कारखान्यातील शाडूच्या मूर्तींना विशेष मागणी आहे. हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून तिसरी पिढी त्यात उतरली आहे. गणेश चव्हाण यांनी हा व्यवसाय पुढे सुरू ठेवला आहे. तालुक्यातील गणेशमूर्तींच्या कारखान्यात सध्या ग्राहकांची गर्दी वाढत आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शाडूच्या मूर्तींची वाहतूक करणे अत्यंत कठीण झाले असल्याची तक्रार मूर्तिकार संदीप चव्हाण यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या