Wednesday, April 24, 2024
Homeनगरचितेला अग्नीडाग देताना प्रशासनही गहिवरले!

चितेला अग्नीडाग देताना प्रशासनही गहिवरले!

पारनेर |प्रतिनिधी| Parner

करोनामुळे निधन झालेल्या किन्ही येथील गोमा यशवंत खोडदे (वय 78) यांच्या अंत्यविधीस जवळचे कोणीच अप्त, स्वकिय आले नाहीत.

- Advertisement -

एक मुलगा पुणे येथे रूग्णालयात व तर दुसरा मुंबई येथे लॉकडाऊनमुळे अडकल्याने त्यांना अंत्यसंस्कारास येता आले नाही. जवळचे कोणीच न आल्याने पारनेर प्रशासनाच्यावतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृतदेहास तहसीलदार ज्योती देवरे यांनी आग्निडाग दिला. रक्ताचे नाते नसतानाही उपस्थीत अधिकारी व पदाधिकारी यांचे डोळे पाणवले होते.

सोमवार (दि.19) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तहसिलदार देवरे यांनी प्रशासनाच्यावतीने या वृद्धावर अंत्यसंस्कार केले. करोना महामारीमुळे व प्रशासनाच्या प्रमुख या नात्याने देवरे यांनीच आग्निडाग दिला. मागील आठवड्यात खोडदे यांची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कर्जुलेहर्या येथील मातोश्री कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते.

काही काळ त्यांना उपचारास चांगला प्रतिसाद दिला. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. शनिवारी मातोश्री रूग्णालयाचे संचालक डॉ. दीपक आहेर यांनी खोडदे यांचा मुलास करून वडीलांची प्रकृती खालावली असल्याचे कळविले होते. मात्र, ते येऊ शकले नाहीत.

अखेर काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खोडदे यांचे निधन झाले. रूग्णालयाच्या वतीने वडिलांचे निधन झाल्याचे मुलास कळविले, मात्र तो न आल्याने डॉक्टरांनी या बाबतची माहिती प्रशासनास दिली. करोना बाधिताचा मृतदेह अधिक काळ ठेवणे धोकादायक असल्याने तहसिलदार देवरे यांनी मृतदेह पारनेर येथे पाठविण्याच्या सूचना दिल्या व मुलास तसे कळविले. मात्र त्याने मला लॉकडाऊनमुळे येणे शक्य नसल्याचे सांगीतले.

दुसर्‍या मुलांने मी रूग्णालयात उपचार घेत असल्याने मला येता येणार नाही, असे कळविले. करोनाच्या गंभिर स्थितीत ग्रामस्थ किंवा नातेवाईकही अंत्यविधीस येऊ शकत नसल्याने प्रशासनाच्यावतीने अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पारनेर येथील अमरधाममध्ये सायंकाळी सात वाजणेच्या सुमारास त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.

या वेळी तहसीलदार देवरे यांच्यासह पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे, नगरपंचायतीचे सचिन राजभोज, मंडलाधिकारी सचिन पोटे, पारनेरचे तलाठी अशोक लांडे, हवलदार भालचंद्र दिवटे आदी उपस्थित होते.

हा क्षण हृदय हेलवाणारा होता. माझे काहीही नाते संबध नसतानाही त्या वृद्धावर अंत्यसंस्कार करताना व आग्निडाग देताना अक्षरशाः रडू कोसळले. अनेक कुटुंब उद्धवस्थ होत आहेत. तरूण वयोवृ्द्ध आपल्यातून कायमचे निघून जात आहेत. आता तरी जनतेने भानावर यावे, स्वतः तसेच कुटुंबाच्या व समाजाच्या सुरक्षततेसाठी काळजी घ्यावी व अति महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या