Thursday, April 25, 2024
Homeनगरदोन परदेशीयांचा सावेडीतील क्लासचालकाला गंडा

दोन परदेशीयांचा सावेडीतील क्लासचालकाला गंडा

अहमदनगर (प्रतिनिधी) – फेसबुक फ्रेंड असलेल्या पोलंडच्या तरुणीने चॅटिंगद्वारे सावेडीतील क्लासचालक भाऊसाहेब विष्णू डमाळे यांना अलगद जाळ्यात अडकविले अन् नंतर सामाजिक कार्याच्या नावाखाली साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. क्लासचालक डमाळे यांनी त्या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली.

मार्लो जॅक्सन आणि कॅरोल डायन अशी फसवणूक करणार्‍या दोघा परदेशी नागरिकांची नावे आहेत. यातील कॅरोल ही महिला आहे. या दोघांनी डमाळे यांना चार लाख 53 हजार 850 रुपयांचा गंडा घातला. डमाळे 12 वर्षांपासून सावेडीतील प्रोफेसर कॉलनीत सिनर्जी करिअर अकॅडमी या नावाने टिचिंग क्लासेस घेतात. 5 ऑक्टोबरला कॅरोल डायन या तरुणीची त्यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली.

- Advertisement -

तिच्याच नावाने नंतर व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज आला. आयुर्वेद औषधांचा व्यवसाय करत असल्याचे सांगून ती पोलंडमध्ये असल्याचे त्यातून डमाळे यांना समजले. त्यानंतर डमाळे यांनी तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. पुढे त्यांच्यात व्हॉटस्अ‍ॅप चॅटिंग सुरू झाले. पोलंडमध्ये अनाथ, अपंग व्यक्तींसाठी मदतीचे सामाजिक कार्य पोलंडमध्ये आम्ही करतो, तुमच्या देशातही शाखा सुरू करायची आहे.

तुम्ही प्रायोजकत्व घ्याल का, अशी विचारणा तिने केली. त्याला डमाळे यांनी नकार दिला. दरम्यानच्या काळात सांगली, कोल्हापूर येथे पूर आला होता. डमाळे यांनी आपल्या मित्रपरिवाराने पूरग्रस्तांना केलेली मदत डायन हिला चॅटिंगद्वारे शेअर केली. त्यावेळी तिनेही पूरग्रस्तांना मदतीची तयारी दर्शविली. त्यानंतर डमाळे यांनी तिला मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा नंबर दिला.

तिथे संपर्क होऊ शकत नाही, तुमचा अकाउंट नंबर द्या, त्यावर पैसे पाठवते, असे सांगून तिने चलाखीने डमाळे यांचा गुलमोहर रोडवरील स्टेट बँक शाखेचा नंबर मिळविला. त्यानंतर तिने पोलंडच्या सिटी बँकेला मेल आयडी व मोबाईल नंबर हवा असल्याचे सांगत तोही मिळविला. ऑक्टोबरमध्येच 2 लाख 70 हजार पोलीस झोल्टी (पोलंड चलन) डमाळे यांच्या खात्यावर जमा झाल्याचा मेल आला. भारतीय चलनात ही रक्कम 49 लाख 69 हजार इतकी होते.

त्यानंतर काही वेळातच पोलंडमधून सिटी बँकेचा व्हर्साव मार्लो जॅक्सन असे नाव सांगत फोन आला. पोलंड चलन भारतीय चलनात ट्रान्सफर करण्यासाठी 68 हजार रुपये भरावे लागतील, असे म्हणत त्याने मुंबई स्टेट बँकेचा खाते नंबर दिला. त्यानुसार डमाळे यांनी ही रक्कम जमा केली. त्यानंतर चार दिवसांनी आरबीआयने सीओटी कोडसाठी पैसे अटकाव केल्याचे सांगत जॅक्सनने दोन लाख 25 हजार रुपये मुंबईच्याच स्टेट बँक शाखेत भरण्याचे सांगितले. ही बाब डमाळे हे डायन या तरुणीसोबत चॅटिंग करत तिला सांगत होते. दिवाळी सुट्टीच्या काळात डमाळे यांनी बँकेकडे चौकशी केली नाही. नंतर पुन्हा डायन हिला पैशाबाबत विचारणा केली तेव्हा तिने बँक मॅनेजरबरोबर संपर्क साधण्याचे सांगितले.

डमाळे यांनी पोलंडच्या सिटी बँकेला मेल टाकून रकमेबाबत विचारणा केली. दिल्ली येथील स्टेट बँक शाखेचा नंबर देऊन जीएसटीपोटी 64 हजार 500 रुपये भरावे लागतील, असा रिप्लाय आला. नोव्हेंबरमध्ये डमाळे यांनी ही रक्कम भरली. दोन दिवस वाट बघून पैसे न आल्याने डमाळे यांनी पुन्हा मेलद्वारे विचारणा केली. तेव्हा आरबीआय सर्व्हिस टॅक्स 60 हजार भरणे बाकी असल्याचे सांगून मुंबईच्या स्टेट बँकेत तो भरण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार डमाळे यांनी पुन्हा 60 हजार रुपये भरणा केला.

16 नोव्हेंबरला पोलंडच्या बँकेला पैसे जमा न झाल्याबाबत मेलद्वारे विचारणा केली असता अँटीटेरिरिस्ट ड्रग्स सर्टिफिकेटसाठी 49 हजार रुपये भरावे लागतील असे सांगून उत्तर प्रदेशमधील स्टेट बँक शाखेचा नंबर दिला. त्या अकाउंटवर डमाळे यांनी 18 नोव्हेंबरला 35 हजार रुपयांचा भरणा केला. दोन दिवसांनंतरही डायन हिने पाठविलेले पैसे अकाउंटवर जमा न झाल्याने डमाळे यांना संशय आला. डमाळे यांनी मित्रांकडे ही घटना शेअर केल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर डमाळे यांनी डायन व जॅक्सन यांच्याशी संपर्क केला. मात्र त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर डमाळे यांनी पोलिसांत धाव घेत डायन व जॅक्सन या दोघा परदेशी नागरिकांविरोधात आयटी कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या