Saturday, April 27, 2024
Homeनाशिकआपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा

मुंजवाड । वार्ताहर Munjvad / Satana

बागलाण तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे आतापर्यंत 22 हजार 530 हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे झाले आहेत. उर्वरित पंचनामे येत्या दोन दिवसात पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देत पालकमंत्री दादा भुसे यांनी आपद्ग्रस्तांना लवकर मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला असल्याचे सांगत ऑगस्ट अखेर पाणी कसे पुरेल या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे, अशी सुचना अधिकार्‍यांना केली.

- Advertisement -

बागलाण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे कांदा, गहू, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब पिकाची मोठ्याप्रमाणात हानी झाली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दौरा करत केली होती. यावेळी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकार्‍यांना दिले होते.

या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.22) पालकमंत्री दादा भुसे यांनी येथील प्रांत कार्यालयात बैठक घेत पंचनाम्यांचा आढावा घेतला. यानंतर उपस्थित अधिकार्‍यांना सुचना देतांना भुसे यांनी दोन दिवसात पंचनाम्याचे काम पुर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकार्‍यांना दिले. बैठकीस बागलाण आ. दिलीप बोरसे, प्रांत बबनराव काकडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, कृषी अधिकारी प्रणय हिरे आदी उपस्थित होते.

द्राक्ष व डाळिंब पिकांवर गारपिटीने मोठे नुकसान झाले असून येणारे दोन हंगाम वाया जातील त्यामुळे द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. संबंधित यंत्रणेने कोणीही शेतकरी वंचित राहू नये याबाबत दक्षता घ्यावी, अशी सुचना भुसे यांनी केली. यावेळी बोलतांना आ. दिलीप बोरसे यांनी नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना ई पीक पाहणीचे अट रद्द करावी अशी शेतकर्‍यांच्या वतीने आग्रही मागणी आहे .यावेळी भुसे यांनी ही अट रद्द करण्यासंदर्भात आजच शासन परिपत्रक जारी करण्यात आल्याचे स्पष्ट करत नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे राहून गेले असतील अशा शेतकर्‍यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला कळवून पंचनामे करून घ्यावेत असे आवाहनही केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

बिडीओला सरपंचांनी घेरले

आजच्या आढावा बैठकीपूर्वी पालकमंत्री भुसे, आ.दिलीप बोरसे यांना विरगाव, वटार, वनोली, करंजाड, डांगसौंदाणे आदी गावच्या सरपंचांनी भेट घेऊन बिडीओ निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवत अर्थ कारणासाठी मातोश्री पाणंद रस्ते, बैल गोठे आदी रोजगार हमीच्या कामांसाठी अडवणूक केली जात आहे. यामुळे आम्हाला जनतेच्या रोषाला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप केला. यावेळी भुसे यांनी याबाबत प्रांताधिकारी बबनराव काकडे, बिडीओ कोल्हे यांना सदरच्या कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या तरीही कोणी अडवणुकीचे प्रकार केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिला.

पाण्याचे नियोजन करा

हवामान खात्याच्या सल्ल्यानुसार यंदा पावसाळा उशिराने असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी स्पष्ट करत प्रशासनाने धरण साठ्यामधील पाण्याचे नियोजन करतांना ऑगस्ट अखेर पर्यंत पाणी कसे पुरवता येईल याचा विचार करावा. चार्‍याची काय परिस्थिती आहे. त्याबाबतचा अहवाल द्यावा अशी सूचना केली. यावेळी आ. बोरसे यांनी महाराजस्व अभियान राबविण्यासाठी येत्या आठवड्यात विरगाव, पठावे दिगर या दोन गटांपासून सुरुवात करावी. त्यासाठी जातीचे दाखले, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार यांचा लाभ घेणार्‍या लाभार्थींना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी गावागावात दवंडी द्यावी अशी सुचना केली असता येत्या आठवड्यात नियोजन करून पालकमंत्री व आमदार यांच्या उपस्थितीत अभियानाला सुरुवात केली जाणार असल्याचे प्रांताधिकारी काकडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या