Saturday, April 27, 2024
Homeजळगावउडान : दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्याचा यशस्वी प्रयत्न

उडान : दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्याचा यशस्वी प्रयत्न

शोध सामर्थ्याचा या देशदूतच्या महाअभियानास आजपासून प्रारंभ झाला. रौप्यमहोत्सवी वर्षात या अभियानाद्वारे वेगळेपण जपणार्‍या घटकांची ओळख करुन दिली जाणार आहे. आज उडाण या संस्थेच्या सर्वेसर्वा हर्षाली चौधरी यांच्या कार्याचा परिचय करुन देत आहोत. –

संपादक

दिव्यांग मुलांबाबत समाजात उदासीनता दिसून येते. पालकांमध्ये देखील पाल्यांबाबत केवळ काळजी जाणवते. पण या दिव्यांग पाल्यांच्या पंखात आपण बळ देऊ शकू हा विश्वास त्यांच्या जवळ नाही. हा विश्वास देण्याचे काम, सर्व प्रकारच्या दिव्यांग मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम जळगावची उडान ही संस्था गेले सात वर्षापासून करत आहे.

हर्षाली चौधरी. यांचे सासर आणि माहेर जळगावचेच. शिक्षणाची आवड. फूड प्रिझर्वेशन आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पदवी घेतल्यानंतर चाईल्ड डेव्हलपमेंट, चाईल्ड अर्ली इंटरव्हेंशन आदी पुदव्युत्तर कोर्सेस केले. घरात एकत्र कुटुंब एकमेकांना धरून राहणारे. हर्षालीताईंचा मुलगाच तो सात वर्षाचा असतांना दिव्यांग असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी सरळ पुण्याचा रस्ता धरला आणि तेथे दिव्यांग मुलांच्या शाळेत त्याला दाखल केले. पैसा होता म्हणून आपण आपल्या मुलाला या शाळेत दाखल करू शकलो पण जे पालक गरीब आहेत, ज्यांच्या जवळ पैसा नाही त्यांच्या मुलांचे काय? हा विचार त्यांच्या मनात सतत घोळू लागला. आपण जे मुलांसंबंधी शिक्षण घेतले, त्याचा फायदा केवळ आपल्या मुलासाठीच द्यायचा काय? इतर मुलांना देखील आपल्या या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे या जाणीवेतून पूर्ण लक्ष आपल्या मुलाकडे देत असतांना दोन दिव्यांग मुलांना त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी स्विकारले. मुलांमध्ये बदल होत आहे हे पाहून हर्षालीताईंची दिव्यांग मुलांना शिकवण्याची संकल्पना दिव्यांग मुलांच्या पालकांना पटू लागली आणि यातून उडाण संस्थेचा जन्म झाला. घरातील एकत्र कुटूंब पध्दतीमुळे हर्षालीताई पूर्णवेळ उडाणकडे लक्ष देऊ लागल्या. घरातून भक्कम पाठींबा मिळाला..

- Advertisement -

हळूहळू दिव्यांग मुलांचे पालक मुलांना घेऊन हर्षालीताईंकडे येऊ लागले. त्यांनी प्रथम पालकांमध्ये विश्वास निर्माण करण्यास प्रारंभ केला. आपल्या मुलांसोबत कशा पध्दतीने वागायचे, मुलांना कसे हाताळायचे याची माहिती दिली जाऊ लागली. संस्थेत दाखल होणार्‍या मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या हेतूने मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच योगा, प्राणायाम, माती सोबत खेळणे, पाण्यात खेळणे असे प्रकार सुरू केले. यातून मुलांच्या हाता पायाला व्यायाम मिळू लागला. सामाजिक आंतरक्रिया वाढवण्यात येऊ लागल्या. यातून मुलांचा आत्मविश्वास वाढत गेला. त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल झाला हे पाहून पालक सुखावले, नवे पालक आपणहून संपर्क करू लागल्याचे हर्षालीताई सांगतात.

आठ तास ही मुले त्यांच्या सोबत खेळीमेळीच्या वातावरणात असतात. यात विविध वयोगटाची मुले असल्याने ताईंनी वया नुसार तीन गट केले आणि अभ्यासक्रम निश्चित केला. 0 ते 6 वयोगटातील मुलांच्या प्रारंभिक अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या बालविकाससावर भर दिला तर 6 ते 15 वयोगटात शालेय शिक्षणाची माहिती देण्यास सुरवात केली. 16 च्या पुढे वयोगटातील मुलांना व्यवसाय शिक्षण देत आत्मनिर्भर बनवण्यात येते. ही मुले चॉकलेट बनवणे, अगरबत्ती बनवणे, कागदी बॅग, आकाशकंदील बनवणे, बुके, साबण बनवणे असे अनेक उदयोग शिकतात.

आज ही मुले 20 प्रकारची चॉकलेटस, 35 प्रकारच्या अगरबत्त्ती, 70 प्रकारचे बुके करत आहेत. हस्तकला, चित्रकलेत रमत आहेत. मुलांची शारिरीक अणि बौध्दीक कौशल्य पाहून त्यांच्या सोबत काम केले जाते. पूर्वी पालकात संस्थेबद्दल फारसा विश्वास नव्हता. मुलांमध्ये होत असलेला बदल, प्रगती पाहून पालकात सकारात्मक भाव निर्माण झाले, विश्वास वाढला. पालकांनी मुलांना पाठवायला सुरवात केली. आज उडाण या संस्थेत 80 मुले आहेत. ाता पर्यंत 200हून अधिक मुले दाखल झालेली आहेत. हर्षाली ताईंसोबत सात सहकारी कार्यरत आहेत.केवळ चार भिंतीत ही मुले रहात नाहीत तर त्यांना समाजात मिसळता यावे म्हणून सहलींचे आयोजन केले जाते.

विविध उदयानात नेले जाते. चित्रपट दाखवले जातात. मुलांना सहा रंगांचे गणवेश आहेत. यातून त्यांना रंगांचे ज्ञान होते. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत फिजिओथेरेपी, अ‍ॅक्युप्रेशनल थेरेपी, हिलिंग स्पिच थेरेपी दिली जाते. मानसशास्त्रीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळांचे आयोजन होत असते. उडाणमध्ये विनामूल्य शिक्षण दिले जात असल्याने शहरातील अनेक डॉक्टरांनी आपली विनामूल्य सेवा या संस्थेस देऊ केली आहे. यात डॉ.स्नेहल फेगडे, डॉ. वर्षा चौधरी, डॉ. विदया चौधरी, डॉ. आदित्य माहेश्वरी, सोहेब शेख, सुवर्णा चव्हाण यांचा समावेश आहे. अनेक महिला मंडळे आपली सेवा देण्यासाठी येत असतात, उडाणला सहकार्य करीत असतात. आठ तास या वातावरणात रमलेली ही मुले घरी जाण्यास तयार नसतात यातच संस्थेचे यश आहे.

ज्या घरात सातत्याने दिव्यांग मुले जन्माला येतात अशा घरांचा शोध घेऊन तेथील पालकांना सल्ला देण्याचे काम हर्षालीताई करीत आहेत. लग्न संबंध जोडतांना एक नाडी नको, एकाच रक्त संबंधातील नको यावर त्यांचे संशोधन व जनजागृती सुरू आहे. दिव्यांग स्वत:चे काम स्वत: करू शकेल, तो सामान्य माणसाप्रमाणे जगता येईल असा व्हावा यासाठी ही धडपड आहे. केवळ जळगावपुरते न राहता जिल्हयातील सर्व तालुके अणि लहान खेड्यापर्यंत पोहचण्याचे हर्षाली चौधरींचे स्वप्न आहे. त्यांच्या या कार्यास समाजाचे बळ मिळणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या