Thursday, April 25, 2024
Homeनगरपहिल्या दिवसापासून पोषण आहाराची अंमलबजावणी

पहिल्या दिवसापासून पोषण आहाराची अंमलबजावणी

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

15 जून पासून महाराष्ट्रातील विदर्भ वगळता सर्व राज्यातील शाळा सुरू होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील उद्या शाळेची घंटा वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेस पात्र असलेल्या शाळांनी पोषण आहार पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना द्यावा, असे आदेश संगमनेर पंचायत समितीचे शालेय पोषण आहार अधीक्षक महादेव धोदाड यांनी दिले आहे.

- Advertisement -

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून मंजूर साप्ताहिक पाककृतीप्रमाणे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार आहार देण्यात येण्याबाबत शाळांनी कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा पूर्व तयारी करताना शालेय परिसर, वर्गखोल्या, स्वयंपाक गृह, धान्य साठा खोलीची स्वच्छता करून घ्यावी. शाळेकडील शिल्लक तांदूळ व डाळी, कडधान्ये निवडून स्वच्छ करून घ्यावेत. गरजेनुसार ऊन द्यावे. पावसाळा सुरू होत असल्याने तांदूळ व धान्यादी माल भिजणार नाही किंवा त्यास ओल लागणार नाही, बुरशी किंवा किड लागून खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.

आहार शिजवण्याची भांडी व ताटाची स्वच्छता करून घ्यावी. खराब झालेले किंवा कीड लागलेले धान्य, मुदत बाह्य झालेले मसाल्याचे पदार्थ आहारात वापरू नयेत. शाळेकडील शिल्लक तांदूळ व धान्यादी पदार्थ वापरून संपल्यानंतरच नव्याने प्राप्त तांदूळ व धान्यादी पदार्थ वापरण्यास घ्यावेत. यापूर्वीचे सर्व अभिलेखे आर्थिकसह अद्ययावत करावेत. दर आठवड्याला बुधवारी नियमीत आहारासोबत पौष्टीक असा पुरक आहार द्यावा. स्वयंपाकी मदतनीस यांचेबरोबर शाळा व्यवस्थापन समितीने रितसर करारनामा करून घ्यावा. त्यांची आरोग्य तपासणी करुन प्रमाणपत्र दफ्तरी ठेवावे.

शाळांनी विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या आहाराची माहिती लाभार्थी संख्येसह दररोज एम.डी.एम पोर्टलवर लॉगिन करून किंवा अ‍ॅपद्वारे भरावी, आहार शिजवून देणार्‍या यंत्रणेची इंधन व भाजीपाला याची देयके शाळांनी दररोज भरण्यात आलेल्या लाभार्थी संख्येनुसार थेट शिक्षण संचालनालय यांचे स्तरावरून वितरित होत असल्याने प्रत्येक शाळेने दररोजची माहिती दररोज अचूकरित्या ऑनलाईन भरावी. रोजच्या उपस्थिती बाबतची माहिती न भरल्यामुळे अथवा चुकीची भरल्यामुळे शाळेस अनुदान प्राप्त न झाल्यास/ कमी अथवा जादा प्राप्त झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहणार आहे.

यापूर्वीच्या पुरवठ्यातील शाळा स्तरावरील तांदुळाच्या रिकाम्या गोण्या, बारदाने पुरवठादार यांच्याकडे हस्तांतरित करून त्याबाबतची पोहच शाळा स्तरावर ठेवावी. करारनाम्यातील अटी व शर्तीचे अवलोकन करून प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी आहारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक, विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख यांनी शाळांना भेटी देऊन शाळा तपासणी अहवाल जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर करावे लागणार आहेत. तसेच शाळा भेटीदरम्यान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्यात येणार आहेत.

शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे साप्ताहिक आहार नियोजन करून देण्यात आले आहेत त्या नियोजनाप्रमाणे शाळांनी उपलब्ध असलेल्या धन्य प्रमाणे विद्यार्थ्यांना लाभ दिला जावा. त्यासाठी साप्ताहिक पाककृतीमध्ये सोमवार मूगडाळ वरण भात, मंगळवार वाटाणा उसळ भात, बुधवार हरभरा उसळ भात व पुरक आहार, गुरुवार वाटाणा उसळ भात, शुक्रवार हरभरा उसळ भात, शनिवार मूगडाळ खिचडी भात या निश्चित केलेल्या पाककृती प्रमाणेच शाळा स्तरावर मध्यान भोजन दिले जात असल्याची खात्री सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी शाळांना भेटी देऊन करावयाची आहे.

बाळासाहेब गुंड, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, संगमनेर

- Advertisment -

ताज्या बातम्या