Maharashtra Interim Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रासाठी काय? वाचा सविस्तर

jalgaon-digital
17 Min Read

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज २०२४-२५ चा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री पवारांनी महिला, शेतकऱ्यांसह प्रत्येक क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतांना हा अर्थसंकल्प पुढील चार महिन्यांसाठी सादर केला जात असल्याचे सांगितले.

यावेळी अजित पवार म्हणाले की, अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान-२ अंतर्गत ५७०० गावांना १ लाख ५९ हजार ८८६ कामांना मंजुरी देण्यात आली असून ३८९ कामे पूर्ण झाली आहेत. तर सन २०२४-२५ या वर्षासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास २४५ कोटी, वनविभागास २५०७ कोटी आणि मृद व जलसंधारण विभागास ४२४७ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. तसेच कृषी विभागास ३ हजार ६५० कोटी, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागास ५५५ कोटी व फलोत्पादन विभागास ७०८ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

Nashik News : शहरातील अकरा पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या

तसेच नियोजन विभागास ९ हजार १९३ कोटी रुपये, रोजगार हमी योजनेसाठी २ हजार २०५ कोटी रुपये, मराठी विभागासाठी ७१ कोटी रुपये तर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १८ हजार १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच राज्याची वार्षिक योजना १ लाख ९२ हजार कोटी रुपयांची आहे. तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १५ हजार ८९३ कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजनेसाठी १५ हजार ३६० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे. अंतरिम अर्थसंकल्पातही अर्थमंत्री अजित पवार यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले आहे.

Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates : संजय गांधी निराधार योजनेची १००० वरुन १५०० रुपये पेन्शन, काश्मीर, अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जाणार – अजित पवार

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या दिशादर्शक अहवालानुसार आवश्यक धोरणांची अंमलबजावणीही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक, नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिता विकास योजनांच्या अंमलबजावणीचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून केला आहे.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

– मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय

– युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी

– स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत, विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत

– विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरीता भूसंपादनासाठी २२ हजार २२५ कोटी

– पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी १० हजार ५१९ कोटी

– जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी २ हजार ८८६ कोटी रुपये

– सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला १० हजार ६२९ कोटी रुपये

– सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला १९ हजार ९३६ कोटी रुपये नियतव्यय

– महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-२ अंतर्गत ७ हजार ५०० किलोमीटर रस्त्यांची कामे

– मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ मधील ७ हजार ६०० कोटी रुपये खर्चून ७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती

– कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु

– फलटण-पंढरपूर, कांपा-चिमूर-वरोरा, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग

– जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका ३ व ४ या रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग

– वाढवण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा २६ टक्के सहभाग- एकूण किंमत ७६ हजार २२० कोटी रुपये

– सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब सुसज्ज जेट्टीचे, २२९ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे बांधकाम

– भगवती बंदर, रत्नागिरी-३०० कोटी रुपये, सागरी दुर्ग जंजिरा, रायगड-१११ कोटी रुपये, एलिफंटा, मुंबई-८८ कोटी रुपये बंदर विकासाची कामे

– मिरकरवाडा, रत्नागिरी बंदराचे आधुनिकीकरण-२ हजार ७०० मच्छीमारांना फायदा

– छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी ५७८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी

– सन २०२४ – २५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ग्रामविकास विभागाला ९ हजार २८० कोटी रुपये

– गृह-परिवहन, बंदरे विभागाला ४ हजार ९४ कोटी रुपये

– उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सुधारित औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण उत्पादनाचे सुधारित धोरण तसेच नवीन सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम धोरण

– १८ लघु-वस्त्रोद्योग संकुले स्थापन करुन सुमारे ३६ हजार रोजगार निर्मिती

– “एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८” जाहीर-अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप

– निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात ४५० कोटी

– निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी ४०० कोटी रुपये

– निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रीयल पार्क

– सामूहिक प्रोत्साहन योजनेतून आगामी वर्षात सुमारे सात हजार कोटी रकमेचा प्रोत्साहन निधी

– मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून २५ हजार उद्योग घटक -३० टक्के महिला उद्योजक -सुमारे ५० हजार नवीन रोजगार

– थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक व चार हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या १० अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा- १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व २० हजार रोजगार निर्मिती

– सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता उद्योग विभागाला १ हजार २१ कोटी रुपये

– सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाला १ हजार ९५२ कोटी रुपये

– अमृत २.० अभियानांतर्गत १४५ शहरांमधील २८ हजार ३१५ कोटीचे ३१२ प्रकल्प मंजूर

– महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन २०३० पर्यंत राबविण्यात येणार

– महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या ५० ते ९५ टक्के निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता

– सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला ३ हजार ८७५ कोटी रुपये नियतव्यय

– दरवर्षी सुमारे २५ हजार किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड

– अटल बांबू समृध्दी योजना- १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड

– जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ५ हजार ७०० गावांमधील १ लाख ५९ हजार ८८६ कामांना मंजूरी

– सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला २४५ कोटी रुपये

– वन विभागास २ हजार ५०७ कोटी रुपये

– मृद व जलसंधारण विभागास ४ हजार २४७ कोटी रुपये

– शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेअंतर्गत ७ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट

– शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला सौर कृषि पंप” ही नवीन योजना- ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप

– राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचे येणाऱ्या दोन वर्षात सौर उर्जीकरण

– सुमारे ३७ हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच.

– डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौर उर्जा कुंपणासाठी अनुदान

– सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ऊर्जा विभागाला ११ हजार ९३४ कोटी रुपये

– “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” अंतर्गत ८४ लाख ५७ हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी १ हजार ६९१ कोटी ४७ लाख रुपये

– नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या ६ हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता

– सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता कृषी विभागास ३ हजार ६५० कोटी रुपये, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागास ५५५ कोटी रुपये फलोत्पादन विभागास ७०८ कोटी रुपये नियतव्यय

– सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता मदत व पुर्नवसन विभागाला ६३८ कोटी रुपये नियतव्यय

– ३९ सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करुन २लाख ३४ हजार हेक्टर सिंचन क्षमता स्थापित करणार

– बळीराजा जलसंजीवनी योजनेत ४६ प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च २०२५पर्यंत आणखी १६ प्रकल्प पूर्ण होणार

– कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्यित ३ हजार २०० कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प

– विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद

– वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाव्दारे ३.७१ लक्ष हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ

– सुयोग्य जागेची आणि पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन वीज निर्मितीचे खाजगी सहभागातून उदंचन जलविद्युत प्रकल्प

– खारभूमी विकास कार्यक्रमांतर्गत ११३ कोटी रुपयांची तरतूद

– सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता जलसंपदा विभागाला १६ हजार ४५६ कोटी रुपये नियतव्यय

– मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान १ लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

– राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु

– कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरु

– दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा

– कार्यक्रम खर्चाकरिता महिला व बालविकास विभागास ३ हजार १०७ कोटी रुपये

– वाशिम,जालना,हिंगोली,अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यांतील अंबरनाथ येथे प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय

– जळगाव, लातूर, बारामती, नंदूरबार, गोंदिया, कोल्हापूर आणि मिरज जिल्हा सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय

– नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध, पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

– ऊसतोड कामगारांकरिता अपघात विमा योजना

– सर्व जिल्ह्यांमध्‍ये १५ खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर

– २३४ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांत डायलिसीस सेवा केंद्र

– रुग्ण मृत्यू पावल्यास मृतदेह रुग्णालयातून नेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका

– कार्यक्रम खर्चाकरिता वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास २ हजार ५७४ कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य विभागास ३ हजार ८२७ कोटी रुपये नियतव्यय

– स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजना, तृतीयपंथी घटकांतील लाभार्थ्यांसाठी बीजभांडवल योजना, मातंग समाजासाठी रमाई आवास योजना इत्यादी योजनांसाठी पुरेसा निधी

– संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे “लेदर पार्क”, कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र ,प्रत्येक महसुली विभागात “उत्कृष्टता केंद्रांची” स्थापना, गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी

– मातंग समाजासाठी “आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था- आर्टीची स्थापना

– कार्यक्रम खर्चाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास १८ हजार ८१६ कोटी रुपये

– कार्यक्रम खर्चाकरिता आदिवासी उपयोजनेकरिता १५ हजार ३६० कोटी रुपये नियतव्यय

– बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी “संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ”

– मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फतचे मुदत कर्ज, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज आणि सुक्ष्म पतपुरवठा योजनेकरिता शासनाची हमी ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपये

– दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर -नवीन घरकुल योजना – ३४ हजार ४०० लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ

– श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तही “आनंदाचा शिधा” वाटप करणार

– कार्यक्रम खर्चाकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि अल्पसंख्याक विकास विभागाला ५ हजार १८० कोटी रुपये, गृहनिर्माण विभागाला १ हजार ३४७ कोटी रुपये, कामगार विभागाला १७१ कोटी रुपये नियतव्यय

– “मिशन लक्ष्यवेध” योजनेअंतर्गत राज्यस्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा

– नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा

– कार्यक्रम खर्चाकरिता क्रीडा विभागाला ५३७ कोटी रुपये नियतव्यय

– “महाराष्ट्र ड्रोन मिशन” साठी ५ वर्षासाठी २३८ कोटी ६४ लाख रुपये

– वरळी, मुंबई येथे “आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास भवन”

– कार्यक्रम खर्चाकरिता उच्च व तंत्र शिक्षण विभागाला २ हजार ९८ कोटी रुपये, शालेय शिक्षण विभागाला २ हजार ९५९ कोटी रुपये नियतव्यय

– जागतिक बँक सहाय्यित “ मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्याचा विकास”(दक्ष) या २ हजार ३०७ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजूरी

– राज्यात नवीन २ हजार “प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे”

– प्रत्येक महसुली विभागामध्ये “आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र” आणि “संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी”

– कार्यक्रम खर्चाकरिता कौशल्य,नाविन्यता,रोजगार व उद्योजकता विकास विभागाला ८०७ कोटी रुपये नियतव्यय

– कोकण विभागातील पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन ३२ गडकिल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन

– पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण

– ५० नवीन पर्यटन स्थळांच्या ठिकाणी थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्टस्, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था

– शिवसागर- कोयना जिल्हा सातारा, गोसीखुर्द जलाशय, जिल्हा भंडारा तसेच वाघुर जलाशय, जिल्हा जळगाव येथे नाविन्यपूर्ण जल पर्यटन प्रकल्प

– लोणार, जिल्हा बुलढाणा, अजिंठा-वेरुळ, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, कळसुबाई – भंडारदरा, जिल्हा अहमदनगर, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक तसेच कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा

– लोणावळा, जिल्हा पुणे येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प- ३३३ कोटी ५६ लाख किंमत

– श्रीनगर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन – ७७ कोटी रुपयांची तरतूद

– महाविस्टा-मंत्रालय, परिसरातील शासकीय इमारती आणि त्यांच्या परिसराचा अत्याधुनिक सुविधांसह पुनर्विकास

– कार्यक्रम खर्चाकरिता सांस्कृतिक कार्य विभागाला १ हजार १८६ कोटी रुपये, पर्यटन विभागाला १ हजार ९७३ कोटी रुपये नियतव्यय, सार्वजनिक बांधकाम (इमारती) विभागास १ हजार ३६७ कोटी रुपये, महसूल विभागास ४७४ कोटी रुपये

– कार्यक्रम खर्चाकरिता गृह (पोलिस) विभागाला २ हजार २३७ कोटी रुपये नियतव्यय, गृह (उत्पादन शुल्क) विभागास १५३ कोटी रुपये आणि विधी व न्याय विभागास ७५९ कोटी रुपये नियतव्यय

– वस्तु व सेवाकर विभागाची पुनर्रचना- कर प्रशिक्षण अकादमीची स्थापना

– कार्यक्रम खर्चाकरिता वित्त विभागाला २०८ कोटी रुपये नियतव्यय

– स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, ता. हवेली व समाधी स्थळ वढू बुद्रुक तालुका शिरुर, जिल्हा पुणे येथील स्मारक- २७० कोटी रुपये किमतीचा आराखडा, काम सुरु

– १२ ज्योर्तिलिंगापैकी एक औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली,साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री क्षेत्र माहुरगड जिल्हा नांदेड, एकविरादेवी मंदिर जिल्हा पुणे तिर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना

– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तृतीय जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम – २० कोटी रुपये निधी

– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिरे, बारवांचे जतन व संवर्धन योजनेसाठी ५३ कोटी रुपये

– धाराशीव जिल्हयात संत गोरोबाकाका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी

– प्रतापगडाच्या पायथ्याशी “वीर जीवा महाला” यांच्या स्मारकासाठी जागा

– संगमवाडी,पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक

– अंमळनेर जिल्हा जळगाव येथे सानेगुरुजींचे स्मारक

– हुतात्मा श्री शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकासासाठी १०२ कोटी ४८ लाख रुपयांचा आराखडा

– श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड, ता. कळवण स्थळाच्या ८१ कोटी ८६ लाख रुपयाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

– “मंगेश पाडगांवकर कवितेचे गाव” उपक्रम- वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग

– कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास ९ हजार १९३ कोटी रुपये, रोहयो प्रभागासाठी २ हजार २०५ कोटी रुपये , मराठी विभागास ७१ कोटी रुपये नियतव्यय

– सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १८ हजार १६५ कोटी रुपयांची तरतूद

– वार्षिक योजना एक लाख ९२ हजार कोटी रुपये, अनुसुचीत जाती उपयोजना १५ हजार ८९३ कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजना १५ हजार ३६० कोटी रुपये

– सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटींची तरतूद

– सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये व महसुली खर्च ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपये, महसुली तूट- ९ हजार ७३४ कोटी रुपये, राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपये

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *