Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedचित्रपटसृष्टी आणि संकटे

चित्रपटसृष्टी आणि संकटे

कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेली चित्रपटगृहे पुन्हा कधी सुरू होतील, याची प्रतीक्षा चित्रपट उद्योगाला आहे. चित्रपट उद्योगाने जगभरात असे अनेक धक्के यापूर्वी पचविले असले तरी सध्याच्या डिजिटल क्रांतीच्या युगात निर्मातेच आपले चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित करू लागले असल्याने वितरणाची साखळीतील घटक आणि चित्रपटगृहांचे चालक धास्तावले आहेत. संकट अधिक काळ राहिल्यास लोक चित्रपटगृहाचा रस्ता विसरून जातील, ही धास्ती खोटी ठरावी अशीच अनेकांची अपेक्षा आहे.

सोनम परब

- Advertisement -

जगभरातील चित्रपटगृहे आज बंद आहेत. लोकांच्या नोकर्या जात आहेत. चित्रपटगृहे पूर्ववत कधी सुरू होतील हे आजमितीस कुणी सांगू शकत नाही. कोविड-19 च्या काळात अन्य उद्योगांसारखीच चित्रपट उद्योगाची परिस्थिती झाली आहे. मनोरंजन उद्योगाचे वेगळेपण एवढेच की लॉकडाउनच्या काळातही विविध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून मनोरंजन सुरू आहे. रुपेरी पडद्यासाठी तयार केलेल्या अनेक कलाकृती तिथे पाहायला मिळतात. घरबसल्या चित्रपट पाहण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, संसर्गाचा धोका टळल्यावर चित्रपटगृहांत जाऊन सिनेमा पाहण्याची संस्कृती पुन्हा दिसेल का, हा यक्षप्रश्न आहे. या बाबतीत चीनमधून मिळालेल्या बातम्या उत्साहवर्धक नाहीत. फेब्रुवारी 2019 मध्ये तेथील प्रेक्षकांनी 1.63 अब्ज डॉलरची चित्रपटाची तिकिटे विकत घेतली. एका महिन्यात जमा झालेला हा सर्वाधिक गल्ला ठरला. परंतु फेब्रुवारी 2020 मध्ये तसे घडू शकले नाही. कोरोना विषाणूच्या हल्ल्यामुळे चीनमधील थिएटर्स बंद झाली. मार्चमध्ये लॉकडाउनमध्ये ढील दिल्यानंतर चित्रपटगृहे सुरू करण्याचा प्रयत्न झाला; पण वितरकांनी नवे चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला आणि प्रेक्षकही घराबाहेर पडले नाहीत. सरकारी आदेशानंतर 500 चित्रपटगृहे पुन्हा बंद करावी लागली.

ब्रिटनमधील लोकप्रिय टाइनेसाइड चित्रपटगृह सुरू करण्यासाठी वर्गणी गोळा करण्याची मोहीम सुरू झाली असून, चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्यायोग्य व्हावे हा त्यामागील उद्देश आहे. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध लिंकन सेंटरमधील अनेकांनी नोकर्या गमावल्या आहेत. प्रसिद्ध न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव याच ठिकाणी होतो. मोठ्या निर्मात्यांनीही चित्रपटगृहांच्या चिंतेत भर टाकली असून, आता ऑनलाइन प्रदर्शनावर भर दिला जात आहे. थेट घरात पोहोचल्यामुळे अधिक नफा मिळत असेल, तर त्यात चित्रपटगृह मालकांना वाटेकरी का करावे, अशी निर्मात्यांची मानसिकता बनू लागली आहे. त्यामुळे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची चलती झाली असून, चित्रपटगृहे मात्र गाळात चालली आहेत. घरबसल्या मनोरंजनाची मागणी एवढी वाढली आहे की, नेटफ्लिक्स आणि डिज्नी प्लस यांनी आपल्या चित्रफितींचा दर्जा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून इंटरनेटवर डेटा कमी लागेल आणि डाउनलोडिंग सोपे होईल. चित्रपट उद्योगाने इतिहासात अनेक संकटांचा मुकाबला केला आहे. 2019 मध्ये बॉक्स ऑफिसवरील गल्ला मागील वर्षांपेक्षा कितीतरी अधिक होता. सुमारे शंभर वर्षांपूर्वी आजच्यासारखीच परिस्थिती होती. 1918 ते 1920 या कालावधीत स्पॅनिश फ्लूच्या संसर्गाने जगभरात पाच कोटी लोकांचा जीव घेतला होता. तत्पूर्वी नुकत्याच झालेल्या जागतिक युद्धाने चार कोटी बळी घेतले होते. विषाणूच्या फैलावामुळे चित्रपटगृहे बंद झाली होती. परंतु तेव्हाचा लॉकडाउन आजच्यासारखा नव्हता. स्थानिक नगरपालिकांना निर्णयाधिकार होता.

ब्रिटनमधील चित्रपटगृहे पहिल्या महायुद्धाच्या काळात सुरू होती आणि लोकप्रियही होती, असे इतिहासात लिहिले गेले आहे. ब्रिटिश सरकार लोकांच्या आनंदासाठी सिनेमा हे महत्त्वाचे माध्यम मानत होते. ब्रिटनमध्ये स्पॅनिश फ्लूच्या प्रसारकाळात चित्रपटगृहे बंद झाली नव्हती. अर्थात, काही उपाययोजना मात्र करण्यात आल्या होत्या. तीन तासांच्या खेळानंतर तीस मिनिटे चित्रपटगृहांचे खिडक्या-दरवाजे ताजी हवा येण्यासाठी खुले ठेवले जात असत. काही ठिकाणी मुलांना चित्रपटगृहांत जाण्यास बंदी होती. काही ठिकाणी साथरोगासंबंधी 15 मिनिटे माहितीपट दाखविले जात होते. स्थानिक पातळीवर निर्णयाधिकाराचा हा फायदा होता की, सेल्युलॉइड प्रिंट पाठवली की चित्रपट सुरू होत असे. हॉलिवूडचा केंद्रबिंदू असलेल्या लॉस एन्जल्समध्येही स्पॅनिश फ्लूचा प्रकोप होता. कॅलिफोर्नियातील चित्रपटगृहे सात आठवड्यांसाठी बंद झाली होती. निर्मात्यांनी नव्या चित्रपटांचे प्रदर्शन थांबवले होते आणि स्टुडिओमधील चित्रपटनिर्मिती थांबली होती. त्या काळात अनेक छोट्या चित्रपट कंपन्यांना व्यवसायातून बाहेर पडावे लागले होते. निर्मितीचे एकीकरण होऊन काही कंपन्या आणखी मोठ्या झाल्या. निर्मिती, वितरण आणि प्रदर्शन या सर्वच गोष्टी सांभाळणारे मोठे स्टुडिओ तयार झाले. महायुद्ध आणि महामारीचे संकट टळल्यानंतर मेगा-हॉलिवूड आकाराला आले होते याची आठवण आजच्या काळात प्रकर्षाने काढली जाते. हॉलिवूडच्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्गही वाढला 1930 च्या दशकात चित्रपटगृहांमध्ये सर्वाधिक गर्दी होती. 1929 पासून जागतिक महामंदी सुरू झाली तेव्हा चित्रपटांनी लोकांच्या मनोरंजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रेक्षकसंख्येच्या हिशोबाने 1939 मध्ये प्रदर्शित झालेला ङ्गगॉन विथ द विंडफ हा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट मानला जातो.

दुसर्‍या महायुद्धावेळीही अनेक अडचणी असून चित्रपटविश्व बहरले होते. ब्रिटनसह अनेक देशांमध्ये चित्रपटांकडे प्रमुख प्रचारसाधन म्हणून पाहिले गेले. चित्रपटगृहे ही माहिती देणारी आणि मनोबल वाढवणारी केंद्रे बनली. युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनमध्ये एक आठवडा चित्रपटगृहे बंद राहिली आणि नंतर धूमधडाक्यात पुन्हा सुरू झाली. सामाजिक कामांसाठी आणि सेवाभावी उपक्रमांसाठी पैसा उभारण्याचे चित्रपट हे साधन बनले होते. 1950 च्या दशकात दृक्श्राव्य माध्यमांमध्ये चित्रपटाची मक्तेदारी राहिली नाही, कारण टेलिव्हिजनचे साधन उपलब्ध झाले. सरकारेही थेट लोकांना घरबसल्या बातम्या ऐकवू शकत होती. त्यामुळे चित्रपट हे प्रचाराचे प्रमुख माध्यम राहिले नाही. सध्याच्या संसर्गकाळात माहिती थेट मोबाइल फोनच्या माध्यमातून आपल्याला मिळते आहे. त्याकाळी एकदा टीव्ही खरेदी केला की, नंतर तो पाहणे मोफत होते. कलाकार आणि निर्मातेही छोट्या पडद्याकडे अधिक आकर्षित झाले. 1946 मध्ये ब्रिटन आणि अमेरिकेत चित्रपट पाहणार्यांची संख्या सर्वाधिक होती. त्यानंतर मात्र दरवर्षी ती घटू लागली.

1950 च्या दशकाच्या सुरुवातीला डाव्या विचारसरणीबद्दल सहानुभूती असणार्‍यांना चित्रपट उद्योगापासून दूर ठेवण्यात आले. चित्रपटांमधील रोमान्स आणि हिंसा यावर नियंत्रण ठेवणारा हेस कोड संपुष्टात आल्यावर चित्रपटगृह हे नैतिकदृष्ट्या अयोग्य ठिकाण मानले जाऊ लागले तर टीव्ही हे सुरक्षित माध्यम मानले गेले. चित्रपटाचे माध्यम संपुष्टात येईल, अशी भीती या क्षेत्रातील लोकच व्यक्त करू लागले. परंतु चित्रपट माध्यम संपुष्टात आले नाही. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला ते पुन्हा बहरले. जॉज (1975) या स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या चित्रपटानंतर भरपूर मार्केटिंग करून चित्रपट प्रदर्शित करण्याचे युग सुरू झाले. 1980 च्या दशकात व्हिडिओ प्लेअर आल्यामुळे टीव्हीबरोबरच हे माध्यमही चित्रपटाच्या मुळावर येईल, अशी भीती वाटू लागली. 1976 मध्ये व्हिडिओ कॅसेटच्या माध्यमातून घरबसल्या चित्रपट पाहता येऊ लागले. चित्रपटांच्या कॅसेट भाड्याने मिळू लागल्या आणि चित्रपटगृहांपर्यंत जाण्याची गरज उरली नाही. परंतु या स्पर्धेमुळे चित्रपटगृहात जाण्याचा अनुभव अधिक समृद्ध केला. 1980 चे दशक हा अमेरिकी चित्रपटांसाठी सर्वांत वाईट काळ मानला गेला. परंतु याही दशकात बॉक्स ऑफिसवरील कमाई दुप्पट झाली होती. व्हिडिओ कॅसेटमुळे चित्रपटगृहे तर बंद झाली नाहीतच; पण निर्मात्यांना मात्र अतिरिक्त कमाई मिळू लागली. कॅसेट विकत घेऊन चित्रपट पाहण्याची क्रेझ वाढली.

अशा चढउतारांमधून सावरल्यानंतर सध्या लाइव्ह स्ट्रीमिंगचे युग चित्रपट क्षेत्रासमोर आव्हान निर्माण करीत आहे. डिजिटल क्रांतीमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म लोकप्रिय होत असतानाच कोरोनाचे संकट आले असून, निर्माते या प्लॅटफॉर्मवरून चित्रपट प्रदर्शित करू लागले आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात हे घडत आहे. कोरोनाचे संकट दीर्घकाळ टिकल्यास लोक चित्रपटगृहाचा रस्ता विसरून जातील आणि ड़िजिटल प्लॅटफॉर्मवरून चित्रपट अधिक प्रमाणात प्रदर्शित होतील, अशी धास्ती चित्रपटगृहांच्या चालकांना आहे. यामुळे वितरणाची संपूर्ण साखळी विस्कळीत होऊ शकते, असेही जाणकार म्हणतात. अर्थातच वितरकसुद्धा काळजीत आहेत.

परंतु मोठ्या रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याच्या अनुभवाची जागा कोणताच डिजिटल प्लॅटफॉर्म घेऊ शकणार नाही आणि परिस्थिती पूर्ववत होताच चित्रपटगृहे पुन्हा गजबजतील, असाही एक मतप्रवाह आहे. हे म्हणणे खरे ठरले तर चित्रपटसृष्टी पुन्हा वैभवाचे दिवस अनुभवू लागेल. सध्या तरी हा निर्णय काळावरच सोपवावा लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या