Friday, April 26, 2024
Homeनगरफेब्रुवारीअखेर 2 हजार 653 टन ऊसाचे गाळप

फेब्रुवारीअखेर 2 हजार 653 टन ऊसाचे गाळप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देशभरातील 463 साखर कारखान्यांनी यंदाच्या वर्षी ऊस गाळप हंगाम घेतला. मात्र, यात गतवर्षीच्या तुलनेते देशभरात 25 कारखाने नाहीत. तरीही फेब्रुवारी अखेर देशात 2 हजार 653 लाख टन उसाचे गाळप झाले असून ते गतवर्षीपेक्षा या तारखेशी तुलना करता 102 लाख टन गाळप अधिक आहे.

- Advertisement -

तर नवे साखर उत्पादन 260 लाख टन झाले असून ते देखील गतवर्षीच्या या तारखेला झालेल्या उत्पादनापेक्षा 7 लाख टनाने जास्त आहे. मात्र, देशाचा सरासरी साखर उतारा 9.78 टक्के इतका नोंदला गेला असून तो गतवर्षीच्या या तारखेला नोंदला गेलेल्या 9.93 टक्के साखर उतार्‍यापेक्षा 0.15 टक्के कमी आहे. फेब्रुवारीअखेर देशातील 61 कारखान्यांनी आपल्या गाळप हंगाम पूर्ण केलेला असून मार्चअखेर देशातील निम्म्यापेक्षा ज्यास्त कारखान्यातील गाळप हंगाम आटोपत येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने चालू हंगाम 2022-23 अखेर 334 लाख टनाचे साखर उत्पादन होण्याचा अंदाज केला असून जो गेल्या वर्षीच्या 359 लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत 25 लाख टनाने कमी राहण्याचा अंदाज आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी जाहीर केले आहे. देशात 334 लाख टनाचे निव्वळ साखर उत्पादन हे सुमारे 45 लाख टन साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी होणार्‍या वापरा व्यतिरिक्त आहे. म्हणजेच देशातील एकूण साखर उत्पादन 379 लाख टन होणे अंदाजित आहे.

यातून वार्षिक 275 लाख टन स्थानिक खप वजा करता आणि हंगाम सुरुवातीचा 62 लाख टन शिल्लक साठा लक्षात घेता 61 लाख टनाची निर्यात होऊन देखील हंगामअखेर सुमारे 60 लाख टन साखर शिल्लक असेल जी ऑक्टोबरनंतरचा अडीच ते तीन महिन्यांचा स्थानिक खप भागू शकणार आहे, असे विश्लेषण राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केले आहे. त्यांच्या मते ही अंदाजित आकडेवारी साखरेचे स्थानिक दर स्थिर ठेवण्यास हातभार लावतील.

महाराष्ट्र तसेच लगतचा कर्नाटक, गुजरात या राज्यात गतवर्षी लांबलेला पाऊस, परतीच्या पावसामुळे विलंबाने सुरु झालेला गाळप हंगाम आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2022 या काळातील ढगाळ वातावरण यामुळे उभ्या उसाला आवश्यक असणारा सूर्यप्रकाश न मिळण्याचा प्रतिकूल परिणाम उसाच्या वजनावर आणि त्यातील साखरेच्या प्रमाणावर झाला आहे. मात्र, गतवर्षीच्या खोडवा उसाचे प्रमाण नव्या हंगामात कमी राहणार असून त्याचा अनुकूल परिणाम पुढील वर्षी दिसेल. ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024 यावर्षी साखरेचे उत्पादन पुन्हा एकदा भरारी घेण्याचे अनुमानित आहे.

अमेरिकेच्या हवामान खात्याने जरी जुलैअखेर येणार्‍या एलनिनोच्या संकटाची जाणीव करून दिली असली तरी गतवर्षी झालेल्या झालेल्या अतिरिक्त पर्जन्यमानामुळे भरलेली धरणे , जल साठे आणि जमिनीतील ओलावा त्याच प्रमाणे एल निनोचा प्रकोप होण्याच्या अगोदर म्हणजे जून, जुलै, जुलैमध्ये सर्वसाधारण पर्ज्यवृष्टी होणे अपेक्षित असल्याने महाराष्ट्रासह देश पातळीवर ऊस तसेच साखर उत्पादन आणि गाळप हंगाम यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या