Tuesday, April 23, 2024
Homeनगरपित्याच्या अंत्यसंस्कारानंतर तिने दिली ‘अग्नीपरीक्षा’

पित्याच्या अंत्यसंस्कारानंतर तिने दिली ‘अग्नीपरीक्षा’

स्वप्नपूर्तीसाठी दुःख बाजूला सारून झाली डॉक्टर 

उंबरे (वार्ताहर) – आपल्या जन्मदात्या पित्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवास अग्निसंस्कार होऊन आपल्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर बाजूला सारून व पित्याच्या विरहाचे दुःख मनात ठेवत केवळ पित्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने डॉक्टरकीची परीक्षा दिली. नव्हे तर तिची ती जणूकाही ‘अग्निपरीक्षा’ ठरली. काल या परीक्षेचा निकाल लागून ती चक्क महाविद्यालयात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिचे डोळ्यात भरणारे यश पहायला तिचा प्राणदाता पिता आता हयात नव्हता. मात्र, त्यांच्या निधनानंतर तिने त्यांच्या स्वप्नांची पूर्ती करीत आपल्या पित्याला खरीखुरी श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

शुभांगी रावसाहेब उगले असे त्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील रावसाहेब एकनाथ उगले हे नगर येथील सनफार्मा महाविद्यालयात प्राचार्य होते. त्यांचा एक मुलगा डॉक्टर आहे. तर आपली मुलगी शुभांगी हिनेही डॉक्टर व्हावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचप्रसंगी शुभांगीची होमिओपॅथी कॉलेजमध्ये परीक्षा सुरू होती.

रावसाहेब उगले यांच्या निधनानंतर उगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. डोंगराएवढे दुःख उराशी घेऊन शुभांगी शिक्षणाच्या परीक्षेला आणि जीवनाच्या सत्वपरीक्षेला सामोरी गेली. पित्याचा आशिर्वाद मनोमनी साठवून तिने मोठ्या हिंमतीने परीक्षा दिली. त्याचा काल निकाल लागून तिला मोठे यश मिळाले. ती डॉक्टर झाली. मात्र, तिचे कोडकौतूक करायला आणि तिच्यावर आशिर्वादपर अभिनंदनाचा वर्षाव करायला तिचे वडील हयात नव्हते. ते केव्हाच काळाच्या पडद्याआड निघून गेले होते. तिच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत असताना कौतूकाने पाठीवरून फिरणारा मायेचा हात आता शुभांगीला केव्हाच पारखा झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या