राज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ

राज्यात 500 कार्यालयांमध्ये शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष कार्यान्वित; कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई :

शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी, विविध योजनांची माहिती मिळावी याकरिता हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी तालुका, जिल्हा पातळीवरील कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरु करण्यात आला आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज अलिबाग, जि. रायगड येथून कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यभर सुमारे 500 कार्यालयांमध्ये असे कक्ष सुरु करण्यात आल्याचे कृषीमंत्र्यांनी आज येथे सांगितले.

काल कृषीमंत्र्यांनी शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरु करणे तसेच तालुकास्तरावर शेतकरी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याची आज अंमलबजावणी करीत राज्यभर अशी मार्गदर्शक केंद्रे सुरु करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले. यासंदर्भात विभागामार्फत शासननिर्णय देखील जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये मार्गदर्शन कक्ष व समितीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्यासाठी शासनाच्या विविध विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबविल्या जातात त्यांच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधण्याकरिता तालुकास्तरीय समिती महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.

जिल्हा कार्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्षांमध्ये शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. त्यांचे म्हणणे समजून घ्यावे, त्यावर योग्य ते मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांबाबत देखील मार्गदर्शन करावे, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी विभागामार्फत शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजना राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी तालुकास्तरीय समितीची दर तीन महिन्यानी बैठक होईल. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली जाईल. हवामान, पीक परिस्थिती, विपणन, निविष्ठांचा पुरवठा, पीककर्ज, शेतीपूरक जोडव्यवसाय, वीज जोडण्या, शेतकरी कर्जप्रकरणे आदीबाबत या समितीच्या बैठकीत चर्चा होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com