Friday, April 26, 2024
Homeनगरविनयभंगासह अ‍ॅट्रोसिटीची खोटी फिर्याद, महिलेसह साक्षीदारांवर गुन्हा दाखल

विनयभंगासह अ‍ॅट्रोसिटीची खोटी फिर्याद, महिलेसह साक्षीदारांवर गुन्हा दाखल

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील एका गावात एक महिलेने गावातील व्यक्तीवर विनयभंगासह अ‍ॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात झालेल्या सुनावणीत हा प्रकार उघड झाल्यानंतर न्यायालयाने आता फिर्यादी महिलेवर आणि खोटी साक्ष देणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. खोटा गुन्हा दाखल करून पोलीस आणि न्यायालयाचा वेळ वाया घालविणार्‍यांना चांगलीच चपराक बसली आहे.

- Advertisement -

पारनेर तालुक्यातील एका गावातील महिलेने अन्य साक्षीदारांच्या मदतीने रामदास घावटे यांच्या विरोधात चार वर्षांपूर्वी जातीवाचक शिवीगाळ व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. नगरच्या सत्र न्यायालयात या खटल्यावर सुनावणी होवून यातील आरोपी घावटे निर्दोष असल्याचा निकाल देण्यात आला होता. तर निकाल पत्रात आरोपीला फिर्यादी महिला व साक्षीदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी आणि वैयक्तीक अकस्मातून अडकवलेले असल्याचे दिसत असल्याचे म्हटले होते. यासाठी फिर्यादी महिलेने पोलीस व न्यायालयासारख्या महत्वाच्या यंत्रणेचा वापर करून वेळ व खर्च वाया घातल्याने फिर्यादी व साक्षीदारांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने तपासी पोलीस अधिकारी यांना दिल्या होत्या.

त्यानुसार तपासी अधिकारी उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांनी पारनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे यांना अधिकार पत्र देवून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भादवी कलम 182 नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे यांनी अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्याची मुळ फिर्यादी महिलेसह साक्षीदार असणार्‍या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील साक्षीदार यांनीही न्यायालयात खोटी साक्ष दिली असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे न्यायालयाने साक्षीदारांवरही कारवाईचे आदेश दिलेले आहेत.

फिर्यादी हिच्या पतीचा तालुक्यातील एका गावात गावठी दारू विक्रीचा व्यवसाय होता. तेथे चार वर्षांपुर्वी रामदास घावटे यांनी ग्रामस्थांसह गावातील दारूबंदीसाठी मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी येथील अवैध दारूविक्रेत्यांवर धाडी टाकून कारवाई केली होती. याचाच राग मनात धरून फिर्यादी महिलेने घावटे यांनी माझ्यात घरात प्रवेश करून विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. खटल्याच्या सुनावनी वेळी फिर्यादी महिलेच्या पतीचा दारू विक्रीचा व्यवसाय असल्याबाबत तसेच आरोपी यांनी दारूबंदीसाठी गावात काम केल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले होते.

या गुन्ह्यात आरोपीला स्पष्टपणे अडकवल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. असे खोटे प्रकार वेळीच थांबावेत व भविष्यात पुन्हा असे धाडस होवू नये, यासाठी फिर्यादी आणि साक्षीदारांवर कारवाईचे आदेश दिले होते. विषेश म्हणजे या गुन्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी साक्षीदार होते. त्यांनी फिर्यादी महिले सोबत आरोपीने कोणतेही चुकीचे वर्तन केलेले नाही, अशी साक्ष दिली होती. या गुन्ह्यातील फिर्यादीला शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून सुमारे दीड लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. ते अनुदान पुन्हा वसुल करून शासन जमा करण्याची मागणी घावटे यांनी जिल्हा अधिकारी, समाज कल्याण विभाग व पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या