Friday, April 26, 2024
Homeनाशिककांदा दरात घसरण

कांदा दरात घसरण

निफाड। प्रतिनिधी Niphad

लाल कांदा अवघ्या काही दिवसात बाजारपेठेत दाखल होणार असतांनाच शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या व चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्यालादेखील भाव नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

- Advertisement -

मागील वर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने उन्हाळ कांद्याचे विक्रमी पीक आले. मात्र त्यानंतर अतिवृष्टी, प्रचंड उष्णतेची तीव्रता यामुळे चाळीत साठविलेला निम्मा कांदा सडला. मात्र आता हा कांदा विक्री करण्याची वेळ अन् बाजारभाव कोसळण्याची एक वेळ झाली. त्यातच आता लाल कांदा काही दिवसातच बाजारात दाखल होणार असल्याने हा कांदा विक्री करण्यावाचून शेतकर्‍यांपुढे अन्य पर्याय नाही.

शनिवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांदा 300 ते 841 तर सरासरी 720 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला. तर निफाड उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याला 400 ते 822 सरासरी 700 रुपये बाजारभाव मिळाला. उन्हाळ कांदा काढण्यापूर्वी या कांद्याला वजन होते. मात्र तो चाळीत साठविल्याने या कांद्याची वजनात घट झाली. तसेच उष्णता व पाण्यामुळे हा कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला.

त्यातच कांदा लागवड, शेत मशागत, खते, निंदणी, पाणी देणे व कांदा काढणी त्यानंतर निवडणी, चाळीत साठवणे व पुन्हा विक्रीसाठी काढतांना निवडणे या सर्व खर्चाचा हिशोब केला तर आज कांद्याला मिळणारा बाजारभाव हा तोट्याचा ठरू पहात आहे. यावर्षी प्रारंभीच पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड केली. तर काही शेतकरी अद्यापही कांदा बियाणाच्या शोधात आहेत.

दिवाळीनंतर उन्हाळ कांदा रोपे टाकण्याबरोबरच कांदा लागवडीला सुरुवात होईल तर आताच अनेक शेतकर्‍यांचा लागण झालेला लाल कांदा जमिनीत चक्री धरत असून थोड्याच दिवसात तो काढणीसाठी येईल. परिणामी उन्हाळ कांद्याच्या भावात आणखी घसरण होऊन शेतकर्‍यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कांदा बाजारभावात वाढ होण्यासाठी शासनाने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देऊन ठोस कार्यवाही करणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या