Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअन्.. माझी भीती पूर्ण निघून गेली..!

अन्.. माझी भीती पूर्ण निघून गेली..!

मुंबई | Mumbai

करोना काळात अनेक योध्यानी यशस्वी मात करीत आपले अनुभव शेअर केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सदाराम गणपत शिंदे, राहणार पाले बुद्रुक रोहा.

- Advertisement -

सदाराम शिंदे रुग्णालयात दाखल व्हायच्या ८ दिवस आधीच मुंबईहून गावाला राहायला आले होते. ताप येत असल्याने गावातील डॉक्टरांनी त्यांना तात्पुरत्या तापाच्या गोळ्या देऊन लागलीच स्वॅब टेस्ट करायला सांगितले.

दोन दिवसांनी श्री.शिंदे यांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतु पुढे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. म्हणून रोह्याच्या शासकीय रुग्णालयात गेले असता त्यांना तात्काळ अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १०८ नंबर अँबुलन्स सुविधेच्या माध्यमातून त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या मनात भीती होती की, अलिबागला कोणीही ओळखीचे नाहीत आणि नातेवाईकसुद्धा सोबत नाहीत. दि.२६ मे २०२० रोजी पहाटे २ वाजता त्यांना अतिदक्षता विभागामध्ये भरती करण्यात आले.

सदाराम शिंदे हे आधीपासूनच ब्लडप्रेशर आणि मधुमेहाचे रुग्ण होते. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांच्या लक्षात आले की, त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे. श्री.शिंदे यांना तात्काळ ऑक्सिजन लावण्यात आला.

या परिस्थितीतही श्री.सदाराम शिंदे जिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉयपासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वजण या रुग्णालयात दाखल झालेल्यांसोबत कसे वागतात, त्यांना कशी सेवा देतात, याचे निरीक्षण करीत होते, अनुभवत होते.

५५ वर्षीय करोनाबाधित रुग्ण म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या श्री. शिंदे यांनी बरे झाल्यानंतर “ हे सर्व करताना जिल्हा रुग्णालयातील सिस्टर्स येथील रुग्णांशी एवढ्या आत्मीयतेने वागत होत्या की, त्यामुळे माझी भीती पूर्ण निघून गेली. इथे सर्व सिस्टर आमच्याशी एवढ्या नॉर्मल वागत होत्या की, आम्हाला करोना झाला आहे, याची बिलकुल जाणीव होवू देत नव्हत्या. आमची अत्यंत मायेने विचारपूस करून आमचे मानसिक दडपण कमी करत होत्या. सर्व डॉक्टर्ससुद्धा खूप प्रेमाने आमची चौकशी करीत. सफाई कामगारसुद्धा वेळोवेळी साफसफाई करून वॉर्ड अतिशय स्वच्छ व सुंदर ठेवत होते.

करोनाच्या संकटातून मुक्त होवून पूर्ण बरा झाल्यावर मी जिल्हा रुग्णालयातून दि. 02 जून 2020 रोजी सुखरुपपणे घरी परतलो. पुढे लगेचच म्हणजे दि. 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळ आल्याकारणाने मला माझा अनुभव लिहिता आला नाही. परंतु अलिबाग जिल्हा रुग्णालयातील अनुजा, दक्षता, तृप्ती, उत्कर्षा, प्रज्ञा आणि सृष्टी या सर्व सिस्टर्स, डॉक्टर्स आणि सफाई कर्मचारी या सर्वांनी जी आमची सेवा केली, त्याची पोचपावती देणे गरजेचे असल्याने उशिराने का होईना, हा अनुभव लिहिला आहे.” या शब्दात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या