Wednesday, April 24, 2024
Homeशब्दगंध‘डिस्को किंग’ची एक्झिट

‘डिस्को किंग’ची एक्झिट

बप्पीदा आणि मी एकत्र बरेच काम केले. आमच्या जोडीने गायलेली गाणी तुफान गाजली. त्यांचे व्यक्तिमत्त्वच वेगळे होते. बप्पीदांनी भारतीय संगीत क्षेत्रात डिस्को युगाची सुरुवात केली. ‘रांबा हो’, ‘कोई यहाँ नाचे नाचे’, ‘हरी ओम हरी’ ही आमची गाणी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. बप्पीदा आता आपल्यात नाहीत, हे पचवणे खरेच खूप अवघड आहे.

मी बप्पीदांसोबत भरपूर काम केले. काम करताना ते खूप आनंदी असायचे. मागील तीस वर्षांच्या काळात बप्पीदांशिवाय माझा एकही कार्यक्रम झाला नाही. ‘हरी ओम हरी’ सादर केल्याशिवाय माझा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. ‘वन, टू चा चा चा’, ‘कोई यहाँ नाचे नाचे’, ‘नाकाबंदी’, ‘लॉकेट’, ‘मैं आ गई, सुपरस्टार…’ अशी एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी आम्ही केली. आम्ही केलेले प्रत्येक गाणे यशस्वी ठरले, खूप गाजले. म्हणूनच माझ्यासोबत काम करायला ते नेहमीच खूप उत्सुक असायचे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर आमची जोडी सर्वोत्तम होती. आम्ही जोडी नंबर वन होतो.

माझ्यासोबत ‘हरी ओम हरी’, ‘रांबा हो’ आणि ‘कोई यहाँ नाचे नाचे’सारखी सुपरहिट गाणी केल्याचा त्यांना प्रचंड अभिमान वाटायचा. 38 ते 40 वर्षांच्या गायन कारकीर्दीत जवळपास प्रत्येक वर्षी बप्पीदांसोबत माझे एक तरी गाणे असायचे. करोनाकाळात मी सादर केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमांमध्येही बप्पीदांची गाणी अग्रस्थानी असायची. बप्पीदा खर्‍या अर्थाने भारताचे डिस्को किंग होते.

- Advertisement -

त्यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून डिस्को हा प्रकार भारतात प्रचलित केला. बप्पीदांनी सुमधूर गाणी दिली. ‘चलते चलते’, ‘माना हो तुम बेहद हसीं’ ही त्यांची गाणी मैलाचा दगड ठरली. त्यांनी हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात बरेच काम करून ठेवले आहे. त्यांचे संगीत क्षेत्रातले योगदान कधीही विसरता येणारे नाही. बप्पीदांनी मोठ्या नायकांसाठी गाणी केली. ती गाणी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आणि यातच बप्पीदांचे मोठेपण सामावले आहे.

बप्पीदा प्रयोगशील संगीतकार होते. त्यांनी उडत्या चालीच्या गाण्यांसोबतच सुमधूर गाणीही दिली. बप्पीदांनी ‘रांबा हो’च्या वेळी पहिल्यांदा सिंथ ड्रम्सचा वापर केला होता. गाणे सुरू होण्याआधी या ड्रम्सचा एक वेगळाच आवाज कानी पडतो. बप्पीदांनी केलेला हा प्रयोग तुफान गाजला. हा अनोखा आवाज प्रत्येकाला आवडला. त्यानंतरच्या काळात प्रत्येक दिग्दर्शकाला, गायकाला आणि नायकाला आपल्या गाण्यांमध्ये हा आवाज असावा, असे मनापासून वाटायचे आणि अशा आवाजाची मागणी केली जायची. या गाण्याच्या वेळी त्यांनी रिपिट मशीनही वापरले होते. म्हणजे प्रत्यक्षात मी ‘रांबा हो’ एवढेच म्हटले होते.

त्यानंतरचे ‘हो हो हो’ हे शब्द या मशीनमधून बाहेर पडायचे. ‘रिपिट मशीन’ हा प्रकार पहिल्यांदा बप्पीदांनीच हिंदी चित्रपट संगीतात आणला. त्यांच्या या कल्पकतेचे खूप कौतुक झाले. बप्पीदा अशा पद्धतीचे नवनवे प्रयोग करायला कधीही कचरले नाहीत. मला ‘रांबा हो’च्या रेकॉर्डिंगचे दिवस अगदी लख्ख आठवतात. त्यावेळी आम्ही मेहबूब स्टुडिओमध्ये होतो. त्यावेळी ‘सीरिल’ नावाचा बप्पीदांचा एक सहकारी हे रिपिट मशीन हाताळायचा. सगळे काही व्यवस्थित जुळून येईपर्यंत बप्पीदांनी अनेकदा ‘रांबा हो’चे रेकॉर्डिंग केले. ‘रांबा हो’च्या यशानंतर प्रत्येकालाच अशा पद्धतीने गाणे करावेसे वाटू लागले. रिपिट मशीनचा वापर करावासा वाटू लागला. त्यामुळे बप्पीदा हे चित्रपटसृष्टीतले ‘ट्रेंड सेटर’ होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

बप्पीदा अत्यंत हसतमुख आणि साधे होते. त्यांनी मला नेहमीच मोकळेपणाने गाऊ दिले. उषाजी, तुम्ही तुमच्या पद्धतीने गाणे म्हणा, असे ते मला नेहमी म्हणायचे. बप्पीदांचे संगीतावर खूप प्रेम होते. गाणे आतून अनुभवायचे आणि मग गायचे असे त्यांचे म्हणणे असायचे. गाणे आधी आत्म्यापर्यंत पोहोचू द्यायचे आणि मग सादर करायचे. अशा पद्धतीने समरसून गाणे म्हटले की लोकप्रिय होणारच, असे ते म्हणायचे. त्यांचे हे शब्द माझ्या मनावर अक्षरश: कोरले गेले. बप्पीदा म्हणजे गुणवत्तेची खाण होते. त्यांना अजून बरेच काही मिळायला हवे होते. बप्पीदांच्या क्षमतेचा पूर्ण वापर झालाच नाही. त्यांना फक्त डिस्को गाण्यांपुरते मर्यादित ठेवण्यात आले. ही बाब मला नेहमीच खटकत आली आहे. बप्पीदा नेहमीच सोन्याने मढलेले असायचे. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू होता. यावरून काहीवेळा त्यांची खिल्लीही उडवली जायची. पण बप्पीदांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केले. ते मनस्वी आयुष्य जगले. बप्पीदांना रॉकस्टार व्हायचे होते. आपले हे स्वप्न त्यांनी पूर्णही केले. बप्पीदा आयुष्यभर रॉकस्टारप्रमाणे वावरले.

हिंदी चित्रपटसृष्टीने त्यांना पुरते ओळखले नाही, याची मला कायम खंत राहील. एवढी सुरेल गाणी देऊनही हिंदीतल्या संगीतकारांमध्ये बप्पीदांचे स्थान दुय्यमच राहिले. बप्पीदांसारखा एवढा प्रतिभावान संगीतकार काहीसा उपेक्षितच राहिला. बप्पीदांनी गाण्यांची नक्कल केली, असेही म्हटले गेले. त्याऐवजी एखाद्या गाण्यातून किंवा संगीतातून प्रेरणा घेऊन रचना साकारली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरते. बप्पीदांची गाणी सदाबहार आहेत आणि हीच त्यांच्या संगीताची जादू आहे. हाच बप्पीदांचा करिश्मा आहे. कोणत्याही संगीताची किंवा गाण्यांची कधीही तुलना होऊ नये, असे मला वाटते. कारण शेवटी गाणे हे गाणे असते. बप्पीदांनी संगीत तयार केले आणि ते जगभरात पोहोचले. संगीताच्या माध्यमातून बप्पीदा जगभरातल्या चाहत्यांशी जोडले गेले. त्यांच्या रचना कालातीत आहेत, यात अजिबात शंका नाही.

बप्पीदांशी माझे साधारण सहा महिन्यांपूर्वी फोनवर बोलणे झाले होते. त्यांनीच मला फोन केला होता. तू सध्या घराबाहेर पडतेस का? असे त्यांनी मला विचारले होते. त्यावर गेले दीड वर्षे मी कुठेही गेले नसून फारशी घराबाहेर पडत नसल्याचेही मी सांगितले होते. त्यावेळी तुमच्यासाठी दोन-तीन गाणी असल्याचेही ते मला म्हणाले होते. ही गाणी मला म्हणायची आहेत, दुसर्‍या कोणालाही ती देऊ नका, असे मी त्यांना म्हणाले होते. त्यांनीही मग ही गाणी फक्त तुमच्यासाठी असल्याचे आणि तुमच्यासाठी थांबणार असल्याचे मला सांगितले होत. आपली जोडी सर्वोत्तम आहे.

त्यामुळे आपण ही गाणी करूया, असे ते मला म्हणाले होते. पण दुर्दैवाने ही गाणी होऊ शकली नाहीत. खरे तर बप्पीदा होते असे म्हणणे, त्यांचा उल्लेख भूतकाळात करणे हे माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे. बप्पीदांचे जाणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. ते आपल्यातून खूप लवकर निघून गेले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. बप्पीदा शरीराने आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांचे संगीत अमर आहे. गाण्यांच्या माध्यमातून ते आपल्यात राहणार आहेत. त्यांचा आवाज कायम आपल्या कानांमध्ये घुमत राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या