महाराष्ट्रात प्रत्येक खेड्यात पुष्पोत्सव व्हावा : महांगडे; नाशिक महापालिकेच्या चार दिवस चालणार्‍या पुष्पोत्सवास प्रारंभ

jalgaon-digital
5 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

चांगली गोष्ट ही मुठभर लोक सुरू करतात, पुन्हा पुन्हा चांगले काम ताकदीने करतात, हेच नाशिक महापालिकेने पुष्पोत्सव 2020 च्या निमित्ताने दाखवून दिले आहे. पर्यावरण जागृतीसाठी फुले – वृक्ष संवर्धनाचे काम याठिकाणी यशस्वी झाल्याचे दिसले. हा पुष्पोत्सव संपुर्ण राज्याने बघावा असा आहे. हा फुलांचा उत्सव खेड्यात होणे गरजेचे आहे, अशा भावना प्रसिध्द अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी आज व्यक्त केल्या.

नाशिक महापालिका मुख्यांलय राजीव गांधी भवनातील पुष्पोत्सव 2020 या पुष्पप्रदर्शनाचे उद्घाटन आज टीव्हीवर गाजत असलेल्या स्वराज्य रक्ष संभाजी मालिकेतील यशस्वी कलाकार राणु आक्का तथा प्रसिध्द अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापौर सतिश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, सभागृह नेते सतिश बापु सोनवणे, भाजपा गटनेते जगदिश पाटील,डॉ. वर्षा भालेराव, शामकुमार साबळे, प्रशांत दिवे, संगिता गायकवाड, हेमलता कांडेकर, सुषमा पगारे, यांच्यासह नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते. पुष्पोत्सवांच्या निमित्ताने बोलतांना अश्विनी महांगडे म्हणाल्या, नाशिक शहरात 60 लाख झाडे असल्याने कौतुक वाटते, प्रत्येक व्यक्ती मागे तीन झाडांची गरज असल्याने प्रत्येकांने आपल्या हक्काची तीन झाडे लावली पाहिजेत.

आपण याठिकाणाहून जातांना हीच गोष्ट घेऊन जाणार असुन प्रत्येक ठिकाणी आपण झाडे लावण्यासंदर्भात आवाहन करु. सध्या मुलांना मोबाईलचे व्यसन लागले असुन आता मोबाईलमुळे घराबाहेर जात नाही. आता पुष्पोत्सवाच्या निमित्ताने याठिकाणी मुले येतील, फुले -झाडांचा अभ्यास करतील. कोणती झाडे किती ऑक्सीजन देतात, याची माहिती मुलांना मिळेल. नवीन पिढीला पुस्तकाशिवाय फुले – झाडांचे मुल्य काय आहे, हे आज शिकविण्याची गरज असल्याचेही शेवटी महांगडे यांनी सांगितले.

नाशिक शहर सात टेकड्यावर वसलेले शहर असल्याने पर्यावरणाने समृध्द असलेल्या शहरातील थंड हवामान राखण्यासाठी महापालिकेकडुन विविध प्रकारे प्रयत्न केले जात असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले. याचाच एक भाग हा पुष्पोत्सव असल्याचे सांगत महापौर म्हणाले, उद्याच्या शिवरात्रीच्या निमित्ताने महापालिकेच्यावतीने तीन हजार बेलाची झाडांचे वाटप केले जाणार आहे. फुले व झाडांसंदर्भात जनजागृती व्हावी, याकरिता नाशिककरांनी पुष्पोत्सवास भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर पुष्पोत्सवात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल सभागृह नेते सतिश सोनवणे यांनी त्यांचे आभार मानले.

महापालिका व नशिककरांत समन्वय असावा म्हणुन हा उपक्रम असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य चंद्रकांत खाडे यांनी नाशिक शहरात प्रत्येक व्यक्तीमागे तीन झाडे असावीत म्हणुन महापालिकेकडुन प्रयत्न सुरू असल्याचे सांगत गोदावरी कृती आराखड्यात गोदाकाठालगत देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचेही त्यांनी सागितले. तर शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी नाशिकच्या गुलशनाबाद या जुन्या नावाचे स्मरण करुन दिले. थंड शहर अशी ओळख असलेल्या शहरात पर्यावरण समतोल राखण्याचे काम महापालिका करीत असुन यात सहभाग म्हणुन वृक्ष रोपण व जतनासाठी नाशिककरांनी पुढे यावेत असे आवाहन शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभ वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य अ‍ॅड. अजिंक्य साने यांनी उद्यान विभागाकडुन शहरात केली जाणारी कामे आणि पुष्पोत्सवाची माहिती आपल्या प्रास्तावीकात दिली.

महांगडेचे दुसरे घर नाशकात असणार…

आज पुष्पोत्सवांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रथमच नाशिकला आलेल्या अभिनेत्री महांगडे या पुष्पप्रदर्शन पाहुन भारावून गेल्या. महापालिकेतील फुले, रोपे व झाडांनी भरलेल्या वातावरणामुळे आपली नाशिकसोबत नाळ जोडली गेल्याचे त्यांनी भाषणात सांगितले. हे सांगतांनाच आपल्या मनात दुसरे घर कुठे असावेत, असा प्रश्न आल्यानंतर नाशिकमध्ये असे उत्तर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या शहरात नेहमी चांगल्या गोष्टी घडत असल्याने आपला नाशिक शहरासोबत स्नेह जोडला असल्याचे त्यांनी सांगितले. स्वराज्य रक्षक संभाजी गाजलेल्या मालिकेतील राणु आक्का यांचा गाजलेला संवाद महांगडे यांनी उपस्थितांच्या आग्रहास्तव म्हटला. यावेळी उपस्थितांनी त्यांना दाद दिली.

जुन्या ठेकेदाराचे प्रवेशद्वाराजवळ उपोषण

मागील वर्षी पुष्पोत्सवाच्या नियोजनाचा ठेका घेणारे अशिष दिवेकर यांनी मागील वर्षाचे बिल न दिल्याने महापालिकेच्या निषेधार्थ राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वाराजवळच पत्नीसह उपोषण सुरू केले आहे. त्यांनी उपोषणाच्या जागेला स्टॉलचे स्वरुप दिले आहे. पुष्पप्रदर्शन पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांचे दिवेकर लक्ष वेधून घेत आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसचा निषेध अन् आतातायीपणा

पुष्पोत्सवाचे उद्घाटन सुरू असतांनाच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक, उपाध्यक्ष, रायुकॉ अध्यक्ष यांनी आठ दहा कार्यकर्त्यासह अचानक कार्यक्रमात येऊन महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे उपस्थित नागरिक व पाहुण्यात चलबिचल झाली. जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्ते महापालिकेचा निषेध करीत असतांना येथील सुरक्षा रक्षकांनी त्यांनी जुमानले नाही. यामुळे आपल्या निषेध महापौरांनाकडे नोंदविण्यासाठी या कार्यकर्त्यांनी पत्रक महापौरांना पाठविले.

यावेळी महापौरांनी उद्यान विभाग उपायुक्त शिवाजी आमले यांना समजुत काढण्यासाठी पाठविले. काही दिवसापुवीर्र्च पालकमंत्री छगन भुजबळ यांना येवला येथे जाऊन पुष्पोत्सवाचे निमंत्रण दिले आणि त्यावेळी त्यांनी आजच्या दुसरीकडे कार्यक्रम असल्याने येता नाही असे सांगितल्याचा खुलासा आमले यांनी कार्यकर्त्यांसमोर केला. यानंतर हे कार्यकर्ते गुपचुप निघुन गेले. अशाप्रकारे कोणताही माहिती न घेता चर्चेत राहण्यासाठी आंदोलन करणार्‍यांचा आतातायीपणा याठिकाणी दिसुन आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *