कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे पाचेगावात ‘शासन आपल्या दारी’चा फज्जा!

jalgaon-digital
3 Min Read

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याबाबत 28 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने गावागावात शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत गावातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पाचेगाव येथे मात्र या उपक्रमाच्या दिवशी अनेक कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने या शासकीय उपक्रमाचा शासकीय कर्मचार्‍यांमुळेच फज्जा उडाला.

या अभियानांतर्गत नागरीकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तावेज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली गावनिहाय एकत्र येऊन शिबिराचे आयोजन करून विविध योजनांचे लाभ नागरिकांना होईल या अनुषंगाने मंगळवारी पाचेगाव येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळपासूनच शासकीय आधिकर्‍यांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला एक प्रकारे केराची टोपली दाखवली.

ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्तरावर सर्व शासकीय विभागाच्या सर्व योजनांची माहिती लाभार्थी यांना लाभ मिळणेसाठी फ्लेक्स, बॅनर तयार करून ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात लावणे अशा कितीतरी गोष्टी या शिबिरात उपलब्ध करून दिले जाईल असे सांगण्यात आले होते.

ग्रामस्थांनी या शिबिराला एकत्र येत शासकीय कर्मचार्‍यांच्या आगमनासाठी किती वेळ वाट ताटकळत बसायचे हाच खरा प्रश्न उपस्थित झाला. ग्रामविकास अधिकारी, तलाठी, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी, पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी,अंगणवाडी सेविका हे सर्व यावेळी हजर होते. शेतकर्‍यांच्या विजेच्या समस्या ऐकण्यासाठी महावितरणचे कर्मचारी, कर्जाबाबत बँकेचे कर्मचारी, नेवासा येथील सेतू चालक, नेवासा येथील महसुल कर्मचारी आदी गैरहजर असल्याने महिलांचे बंद पडलेले डोल, नवीन डोल, रेशन कार्ड मध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, नाव कमी करणे या संदर्भात नागरिकांच्या व्यथा ऐकण्यासाठी उपलब्ध नव्हते. पंचायत समितीचे विस्तारअधिकारी व पाचेगाव ग्रामपंचायत वर प्रशासक हे मात्र सर्व ग्रामस्थ निघून गेल्यानंतर निवांत आले.

गावात कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी, तलाठी आणि वैद्यकीय अधिकारी हे कर्मचारी उपस्थित असतात. पण या व्यतिरिक्त इतर विभागाच्या कामासंदर्भातील कोणीही शासकीय कर्मचारी हजर नसल्या कारणाने ‘शासन आपल्या दारी’चा फज्जा उडाला.

यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व पाचेगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक सुवर्ण चव्हाण, कृषी सहाय्यक अधिकारी सुनीता दहातोंडे, महसूल विभागाच्या सर्कल तृप्ती साळवे, महावितरण विभागाचा वायरमन, पोलीस पाटील, सेतु चालक यांनी या उपक्रमात सरळ पाठ फिरवली.

या उपक्रमात ग्रामविकास अधिकारी शिवाजी वाहूरवाघ, तलाठी राहुल साठे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ भालेराव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मनोज पवार, स्वस्त धान्य दुकानदार नंदराज शिंदे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, बचतगट महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासन आपल्या दारी ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरू केली. ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल हा हेतू शासनाचा आहे, पण जर शासनाच्या काही कर्मचार्‍यांनीच या योजनेत आपला सहभाग न नोंदवता गैरहजर राहून या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मग ग्रामीण भागातील नागरिकांनी आपली व्यथा कोणाकडे मांंडावी असा प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *