Wednesday, April 24, 2024
Homeनगरनिवडणुकांच्या तोंडावर नेत्यांकडून निळवंडेचा आलाप सुरू

निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांकडून निळवंडेचा आलाप सुरू

राहाता |का. प्रतिनिधी|Rahata

करोनाचा प्रकोप कमी होत असताना निळवंडे लाभक्षेत्रातील निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर नेत्यांची निळवंडेची माळ जपण्यासही सुरूवात झाल्याचे दिसत आहे. दरवेळी लाभक्षेत्रात होणार्‍या लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परीषदा, पंचायत समित्या निवडणुकामध्ये केंद्रस्थानी असलेला निळवंडेचा विषय होवू घातलेल्या निवडणुकांगध्ये अग्रस्थानी राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisement -

50 वर्षापूर्वी उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती व कायमच दुष्काळी असलेल्या टापुला शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरणाचा प्रस्ताव करण्यात आला. पन्नास वर्षात धरण बांधून झाले पण कालवे नसल्याने शेतकर्‍यांना शेतीला पाणी मिळालेले नाही. शेतकर्‍यांना अद्याप धरणाचा प्रत्यक्ष पाण्याचा फायदा झालेला नसला तरी लाभक्षेत्रातील सर्वच राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांनी मात्र राजकारणासाठी निळवंडेचा पुरेपुर वापर करून घेतल्याचा इतिहास आहे.

लोकसभा निवडणुकीपासून लाभक्षेत्रातील अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, राहुरी या पाचही विधानसभा मतदार संघात निवडणूक काळात निळवंडेचीच चर्चा असते. सर्वच पक्षाच्या व पुढार्‍यांच्या अजेंड्यावर निळंवडे हा एकमेव विषय असतो. विधानसभा निवडणुकानंतर होवू घातलेल्या पाचही तालुक्यातील नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकामध्येही याच विषयावर मतांचा जोगवा मागितला जातो असाच इतिहास आहे. आताही येत्या काही महिन्यात सर्वच तालुक्यातील जिल्हा परीषदा, पंचायत समित्या व नगर पालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी प्रारूप मतदार यादया प्रसिध्द होत आहेत. त्यामुळे निवडणुकाचां अंदाज घेवुन निळवंडेबाबत पत्रकबाजीही सुरु झाल्याचे दिसत आहे.

कोपरगाव शहरासाठी निळवंडेतून थेट बंदीस्त पाईपलाईनची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. तांत्रिक मंजुरी असलेल्या योजनेबाबत कोपरगावात श्रेयवाद सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यातच संगमनेर शहरासाठी थेट निळवंडेतून आणलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सत्ताधार्‍यांना जमेची व प्रचाराचा मुद्दा राहणार आहे. राज्यातील सरकार बदलल्यामुळे शिर्डीची निळवंडेतील पाणी योजना रेंगाळल्याचे म्हणत सत्ताधार्‍यांना विरोधकांवर अपयशाचे खापर फोडता येणार आहे.

जिल्हा परीषद व पंचायत समित्यामध्येही जसा गण व गट असेल तशी दर निवडणुकीप्रमाणे निळवंडे बाबत भूमिका घेतली जाणार आहे. सत्ताधारी आंम्ही किती निधी दिला व किती तत्परतेने काम करतो आहोत याचे पाढे वाचताना दिसतील तर सत्तेबाहेर बसलेले सत्ताधार्‍यांमुळेच प्रकल्प रेंगाळल्याचे आकडेवारीसह पटवून देतील व निवडणुकांमध्ये यावेळीही आपले राजकीय साध्य पूर्ण करून घेतील.पाण्याची वाट पाहणार्‍या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या तिसर्‍या पिढीला निळवंडेच्या पाटपाण्याच्या नावाखाली लाभक्षेत्रातील पुढारी पुन्हा एकदा वातावरण निर्मिती करून दर निवडणुकांप्रमाणे टोपी घालून अलगत आपले काम साधून घेतील अशीच परीस्थिती आहे.

या पंचवार्षिकला शेतकर्‍यांना पाणी देणारच ही भूमिका घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत खा. सदाशिव लोखंडे यांना तर विधानसभेला संगमनेर मतदार संघातून ना. बाळासाहेब थोरात व शिर्डीतून माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना निळवंडे लाभक्षेत्राने विक्रमी आघाडी दिली. कोपरगाव मतदार संघातून आ. आशुतोष काळे यांना व राहुरीतून ना. प्राजक्त तनपुरे यांना निळवंडे लाभक्षेत्रातील जिरायती गावांनी निर्णायक मताधिक्य देवून विजयी आघाडी दिलेली आहे.

लाभक्षेत्राबाहेरही निळवंडे इफेक्ट

कोपरगाव, शिर्डी, संगमनेर हे तिनही शहर निळवंडे लाभक्षेत्रातील नाहीत. शिर्डी, कोपरगाव गोदावरी खोर्‍यातील असून दारणा धरण समुहातून त्यांना पाणीही मिळते तर संगमनेर शहर भंडारदरा लाभक्षेत्रातील आहे. मात्र संगमनेरने यापूर्वीच निळवंडेतून पाईपलाईन आणली आहे तर शिर्डी व कोपरगावला निळवंडेतून पाईपलाईनसाठी मागील सरकारने तांत्रीक मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे या तिनही शहरांच्या निवडणुकीत निळवंडेचा प्रचार अग्रस्थानी राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या