राजकारणातील घराणेशाही

jalgaon-digital
6 Min Read

पुण्यातून

राजेंद्र पाटील,  9822753219

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराचे सोपस्कार पार पडले आहेत. आता तितक्याच महत्त्वाच्या खातेवाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामकाजाला कधी गती मिळणार, याबाबत जनतेला प्रतीक्षा आहे. कोणत्याही सरकारच्या मंत्रिमंडळावर नजर टाकल्यास घराणेशाहीचाच प्रभाव जाणवतो. सगळेच राजकीय पक्ष एकमेकांवर घराणेशाहीचा आरोप करीत असतात. महाविकास आघाडीचेही सरकार त्याला अपवाद कसे असेल? वानगीदाखल याच सरकारचा आढावा घेऊया. पिता-पुत्र, मामा-भाचे अशा जोड्या या मंत्रिमंडळात आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘घराणेशाही’ प्रत्येक राज्यात सुरू आहे. घराणेशाहीचा अभ्यासपूर्ण लेखाजोखा शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र! बाळासाहेबांनीच उद्धव यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी नियुक्ती केली. आता नवीन मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आहेत. आदित्य यांच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील व्यक्तीने पहिल्यांदाच निवडणूक लढवली. आदित्य वरळी मतदारसंघातून निवडून आले. मंत्रिमंडळ विस्तारात आदित्य यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. अर्थात, पिता-पुत्र एकाच मंत्रिमंडळात असण्याची देशातील ही पहिलीच वेळ नाही. तामिळनाडूत करुणानिधी-स्टॅलिन, आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू-नारा लोकेश, पंजाबमध्ये प्रकाशसिंह बादल आणि सुखबीरसिंह बादल, तेलंगणात के. चंद्रशेखर राव आणि के. टी. रामा राव तर हरयाणात देवीलाल आणि रणजितसिंह चौटाला या पिता-पुत्रांनी एकत्र काम केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे पुतणे आहेत. जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील हे आमदार आणि मंत्री होते. सहकार चळवळीतील एक अग्रणी नाव म्हणून राजारामबापू पाटील यांच्याकडे पाहिले जाते. 1962 ते 1970 या काळात राजारामबापू पाटील मंत्री होते.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला आहे. बाळासाहेबांचे वडील भाऊसाहेब थोरात आमदार होते. सहकार क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये भाऊसाहेब थोरातांचे नाव घेतले जाते. विश्वासदर्शक ठरावावेळी प्रोटेम स्पीकर म्हणून कामकाज पाहिलेले दिलीप वळसे-पाटील यांचे वडील दत्तात्रय वळसे-पाटील हेसुद्धा आमदार होते. बाळासाहेब पाटील यांचे वडील पी. डी. पाटीलही आमदार होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेही उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असणार आहेत. अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. ते भारताचे माजी अर्थमंत्रीही होते. राजेंद्र शिंगणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे वडील भास्करराव शिंगणे हेही आमदार होते. आमदारकीचा वारसा त्यांनी कायम राखला. याआधीही मंत्रिपदाचा कारभार पाहिलेल्या राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राजेश टोपे हे पाचव्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांचे वडील अंकुशराव टोपे खासदार होते. जालना जिल्ह्यात त्यांनी अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली होती.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख मंत्रिमंडळात असणार आहेत. अमित यांनी यापूर्वी आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. आता उद्धव ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. विशेष म्हणजे अमित यांचे धाकटे बंधू धीरज हेसुद्धा यावेळी आमदार म्हणून निवडून आले आहेत.  भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावा-बहिणीमधील लढत सगळ्यात चर्चित लढतींपैकी एक होती. धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले होते. उद्धव यांच्या मंत्रिमंडळात ते आता कॅबिनेट मंत्री असतील.

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांची राज्यमंत्री म्हणून निवड झाली. 2012 पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आमदार जयंत पाटील यांचे ते भाचे असून माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव आहेत. विदर्भातील आमदार सुनील केदार यांचे वडील बाबासाहेब केदार हे राज्याचे माजी मंत्री होते. आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांच्या कन्या यशोमती ठाकूर यांचाही या मंत्रिमंडळात समावेश आहे. काँग्रेसचे खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांनी यंदाही निवडणुकीत बाजी मारली. नव्या मंत्रिमंडळात त्यांचीही वर्णी लागली आहे. स्व. पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदमसुद्धा उद्धव यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत.

माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभुराजे देसाई यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. अपक्ष आमदार शंकरराव गडाख माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत. महाराष्ट्रातील राजकारण वर्षानुवर्षे घराणेशाहीच्या प्रभावाखाली काम करते. या सरंजामशाही मानसिकतेमागील कारणे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांतील 116 मतदारसंघांत घराणेशाहीचे 94 शिलेदार उभे होते. त्यातील 54 उमेदवार विजयी झाले आहेत. लोकसभेला 14 जिल्ह्यांतील 20 पैकी 9 म्हणजे 50 टक्के शिलेदारांच्या गळ्यात विजयाच्या माळा घातल्या आहेत. यात विधानसभेसाठी भाजपकडून 25, शिवसेनेकडून 11, काँग्रेसकडून 19 तर राष्ट्रवादीकडून 35 उमेदवार; लोकसभेसाठी भाजपकडून 5, सेनेकडून 4, काँग्रेसकडून 2 तर राष्ट्रवादीच्या 7 उमेदवारांचा समावेश आहे.

घराणेशाहीमुळे सत्तासंपत्तीचे केंद्रीकरण होते आणि लोकशाहीचा प्रवाह निकोप राहत नाही. कर्तृत्ववान कार्यकर्त्यांमधील नेतृत्व पुढे येऊ शकत नाही. व्यावसायिकाचा मुलगा तोच व्यवसाय करतो. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो. कला, संगीत यातही घराणी जगन्मान्य आहेत, मग राजकारण्यांवरच घराणेशाहीचा आरोप का? या प्रश्नाचे उत्तर देताना हा अभ्यास म्हणतो, त्या भागात दुसरे सक्षम नेतृत्व निर्माण होत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे हक्क, ज्येष्ठता डावलून फक्त घराण्याचाच वारसा पुढे आणला जातो. हा पायंडा लोकशाहीला घातक आहे. एकाच घराण्यात सत्ता राहिल्याने निर्माण होणारे दोष, अनिर्बंध सत्तेतून येणारी भ्रष्टता आणि दडपशाही टाळून निकोप लोकशाही रुजण्यासाठी जनजागरण, निवेदने, चर्चा, असे जनजागरण व्हायला हवे. अमेरिकेत जसे दोनदाच अध्यक्ष होता येते त्याप्रमाणे दोन टर्म पदावर असलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी न देण्याची सुधारणाही सुचवतो.

आता आणि तातडीची गरज आहे ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि जनतेने घराणेशाहीविरोधात ठोस भूमिका घेत आपल्या लोकशाही हक्कांबद्दल निर्भिड भूमिका घेत घराणेशाहीविरोधात आवाज उठवण्याची.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *