Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedराहत इंदौरी - एक बुलंद शायर

राहत इंदौरी – एक बुलंद शायर

नाशिक | अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा

उर्दू दुनियेमध्ये राहत इंदौरी यांचा तरक्कीपसंद (प्रगतीशिल) शायरांमध्ये समावेश होतो. राजनिती, मानवी जीवनमूल्ये, विद्रोह, परिवर्तन, राष्ट्रभक्ती आणि सामान्य माणसाची सुखदु:खे या व इतर अनेक विषयांवर त्यांनी गजला लिहिल्या आहेत.

- Advertisement -

भारतामध्ये ज्या ज्या गावांमध्ये उर्दूचे मोठमोठे मुशायरे होत असतात त्या सर्व ठिकाणी राहत साहेबांनी हजेरी लावून स्वत:च्या नावाचा डंका पिटला. ते प्रसिद्ध शायर मिरचा हवाला देत असत. 200 वर्षांपूर्वी मिरने असे सांगितले की, ज्या भाषेत आपली गुफ्तगू (संवाद) होतो.

तीच भाषा शायरीची भाषा असली पाहिजे. राहत साहेबांची शायरी समजण्यासाठी शब्दकोषाची कधीही गरज पडत नाही. ते श्रोत्यांच्या भाषेतच अशआर लिहितात. ते केवळ मुशायर्‍याचे शायर नव्हते. त्यांच्याकडे सर्व प्रकारची शायरी असल्यामुळे कोणत्या श्रोतु वर्गापुढे कोणते शेर सादर करावयाचे हे त्यांना चांगले माहित होते. मुशायर्‍याचे शायर म्हणून प्रसिद्धी पावल्याने सामान्य लोकांना आवडतील असे अनेक शेर त्यांनी लिहिले व सादर केले. परंतु तितकीच दर्जेदार शायरी देखील त्यांनी केली.

किसने दस्तक दी दिल पे, ये कौन है?

आप तो अंदर है, बाहर कौन है?

राहत साहेबांनी शायरी करतांना कोणाचीही बदनामी केली नाही. अगर स्वत:ही बदनाम झाले नाही. त्यांनी त्यांचा आवाज कायम बुलंद ठेवला. सत्ताधारी लोकांच्या विरुद्ध लिहिण्यास ते कधीही घाबरले नाही. सत्याच्या मार्गावर ते चालत राहिले. त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती त्यांच्या शायरीमध्ये वारंवार दिसून येते-

हम अपनी जान के दुश्मन को, अपनी जान कहते है।

मोहब्बत की इसी मिट्टी को, हिंदुस्थान कहते है॥

स्वत:चा आत्मसन्मान व अस्मिता जपणे हा त्यांचा स्वभावधर्म होता. परंतु त्याचा विपरित अर्थ लावून अहंकारी म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यांच्या खुद्दारीचा एक नमुना पहा –

बादशाहों से भी फेंके हुए सिक्के ना लिए।

हमने खैरात भी मांगी है, तो खुद्दारी से ॥

निवडणुका जवळ आल्यानंतर राजकारणी लोक वेगवेगळे तंत्र अवलंबून मतांचा गठ्ठा मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी राहत साहेब लिहितात-

सरहदों पर बहोत तनाव है क्या?

कुछ पता तो करो, चुनाव है क्या?

सामान्य माणसाचा उत्साह आणि हौसला वाढविण्यासाठी त्यांनी अनेक शेर लिहिले.

राह के पत्थर से बढकर कुछ नही है मंजिले।

रास्ते आवाज देते है, सफर जारी रखो॥

राहत साहेब एक कलंदर शायर होते. कोणाला काय वाटेल याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. त्यांना ते योग्य वाटले ते लिहित गेले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. बंधुभावाला त्यांनी फार महत्त्व दिले. ते एके ठिकाणी म्हणतात-

मेरी ख्वाईश है की, आंगन में न दीवार उठे।

मेरे भाई, मेरे हिस्से की जमीं तू रख ले॥

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेत त्यांनी उर्दू साहित्यात पीएचडी केली. त्यांच्या शायरीची अनेक पुस्तके प्रकाशित झाली.

त्यांनी 50 पेक्षा अधिक सिनेमांसाठी गीते लिहिली. त्यामध्ये प्रेम अगन, हिरो हिंदुस्थानी, हिमालय पुत्र, तमन्ना, मिशन कश्मिर आणि मुन्नाभाई एमबीबीएस यांचा समावेश आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी इंदूरच्या कॉलेजमध्ये 16 वर्षे अध्यापनाचे काम देखील केले होते. परंतु नंतर शायरी हे एकमेव कार्य त्यांनी चालू ठेवले.

राहत साहेब आपल्यातून उठून निघून गेलेल असले तरी त्यांच्या शायरीतून ते सदैव जिवंत राहतील. अशा या बुलंद शायराला सलाम करू या.

अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा, 9822195471

- Advertisment -

ताज्या बातम्या